गेल्या आठ वर्षांपासून नोकरी निमित्त अमेरिकेत स्थायिक व्हावे लागले. व्हिसाच्या रोलरकोस्टरमध्ये जेव्हा तुम्ही गतिमान वेगाने फिरत असता तेव्हा फक्त आणि फक्त भौतिक गोष्टींचा आणि व्यवहारी विचार करुन तुम्ही नकळतपणे आपल्या आईवडिलांच्या भावनांना दुय्यम स्थान देत राहता. पर्यायच नसतो. चार महिन्यांपूर्वी आई म्हणाली, माझ्या मरणाच्या आधी तरी तुझा चेहरा दाखवशील का? काय आई सकाळी सकाळी निगेटिव्ह बोलत आहेस तू? इतकी का रडतेस? माझाही दिवस खराब व्हावा असे वाटते का ग तुला? मीही त्या तिच्या बोलण्याने अस्वस्थ झाले. समजावले तिला मी. कदाचित ती माझ्यासाठीच शांत झाली असावी. ऊगा आपल्यामुळे आपल्या मुलीला का त्रास? घार उडते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी तिच्या तोंडून हजार वेळा ऐकलेय!
आई अशीच असते म्हणूनच ती माउली असते... आई असते. आज आई जाऊन १३ दिवस होत आलेत, ना मी भारतात येऊ शकले, ना तिला डोळेभरून पाहू शकले. सगळे अजूनही भासच वाटतात. पप्पा म्हणतात ती शरीराने गेली असली तरी मनाने कायम जवळ आहे. नेमके खरे काय? की नुसती आपणच आपली समजूत घालत राहतो. ती फारच वेगळी होती. वेगळ्या धाटणीची वेगळ्या मातीची! मी अकरावीला असताना तिने माझ्याच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. आई आणि मुलगी एकाच कॉलेजमध्ये इतके सोपे होते का ते? कुंकू साडीवरची स्त्री सायकलवरुन कॉलेजला जाते आणि तीन मुलांचा संभाळ करत करत इकोनॉमिक्सची फर्स्ट क्लास डिग्री हातात घेते. तिची मेहनत मी पहिलीय. दिवसभराची कामे, कॉलेज, अभ्यास ...
माझ्या घरी बाराही महिने रांगोळी आणि तूळशी समोरचा मोठ्ठा मातीचा दिवा... ओट्यावर काढलेली तिची रोज नवीन नक्षीदार रांगोळी, तिचा सुरेल आवाज, माझ्यासाठी गात आलेली अंगाई, भांडी घासत असताना तिने गायलेली शेकडो गाणी, तिने तयार केलेली वेगवेगळ्या प्रकारची लोणची, पापड, जुन्या साडयांच्या तयार केलेल्या गोधड्या, शिकवलेले श्लोक, रुजवलेली माणुसकी या सगळ्यांना माझ्याकडे आता ऑप्शन कुठेय? तिने चांगले इंग्रजी शिकून घेतले. का तर भावाच्या मुलाचा इंटरनॅशनल स्कूलचा अभ्यास घेता यावा म्हणून. काही शब्द अडले की फोनवर विचारायची. रांगोळीतही इंग्रजीत शुभेच्छा (सण असला की ) ! तिने आताच्या या नव्या शिक्षणाचा आणि तिने घेतलेल्या गावच्या शाळेतील शिक्षणाचा संगम कसा घडवून आणला?
तिच्यासाठी तीन-एक महिन्यांपूर्वी खाली दिलेली कविता लिहिली होती. पण ती कविता वाचून दाखवायची राहिली... तिच्या मांडीवर डोकं ठेऊन तिच्या सायीसारख्या हातांचा स्पर्श अनुभवायचा राहिला... केस किती खराब केलेस म्हणून तेल लावून वेणी घालून घ्यायची राहिली.... तिच्या हातची मेथीची भाजी आणि भाकरी माझं फेव्हरेट जेवण जेवायचे राहिले.... तिच्या बाजूला झोपून निल आणि निहान विषयीच्या गप्पा मारायच्या राहिल्या.... तिला भेटून यायचे राहिले....
मुलींना असतो बाप जास्त प्यारा
आईने कितीही जीव लावला तरीही
मी तरी कुठे अपवाद आहे याला
दिवसभर धुण्या भांड्यात
स्टोव्हच्या घामट, कोंदट भगभगणारया आवाजात
दहा बाय बाराच्या खोलीमध्ये
भाकऱ्या थापणारी माझी आई
गोल गोल गरगरीत टम्म फुगणाऱ्या
पातळ पापुद्रयाच्या मऊसूत भाकऱ्या
तर्रीदार खोबऱ्याचं वाटण घालून केलेल्या कालवणात
आपसूक विरघळून जायच्या...
हळदीच्या रंगाची
केवड्याच्या अंगाची
पितवर्णी तैलदार
हातातल्या हिरव्याशार बांगड्या
किणकिण वाजत रहायच्या
घराला घरपण देत
मोठ्ठं कपाळभर कुंकू
घामान ओघळत रहायचं
नाकाच्या शेंड्यापर्यन्त
साध्या गबाळ्या वेशातही
दिसायचीस तू
मायेने भरलेली
बुद्धाची तेजस्वी मूर्ती...
गार गार वाऱ्याची झुळूक यावी
तसं शांत शांत होत जायचं माझं मन
जेव्हा केसांना तेल लावून
माझी वेणी बांधायचीस पल्लेदार घट्ट
चहाचे कप किणकिणत रहायचे दिवसभर....
आपल्या घरात शेजारी-पाजारी, मावश्या, काक्या, भाजीवाली,
दूधवाली अमकी ठमकीसाठी ना त्या चहाच्या कपांना आराम
ना तुलाही...
शाळा, कॉलेज, आमची लग्नं, नातवंड
वर्ष आणि वर्ष निघून गेली
पण तू आहेस अजूनही तशीच
स्थिर, स्थितप्रज्ञ, हिमालयासारखी कणखर, सोशिक, सात्विक
आपल्या अंगणात रोज तू काढलेल्या नक्षीदार रांगोळी सारखीच
तुळशीला पाणी घालून त्या समोर लावलेल्या मोठ्या दिव्याच्या वातीसारखीच
तुझ्या हातच्या गोल गरगरीत मऊशार भाकरीसारखीच
रोज सकाळी न चुकता मला येणाऱ्या मोबाईलच्या रिंग सारखीच
कसं जमतं गं तुला निरपेक्ष राहून
सतत मुलांवर, नातवंडांवर माया करत राहणं
देवकन्या आहेस तू...
- पल्लवी शिंदे-माने
- डेनवर, अमेरिका
0 टिप्पण्या