महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाचा दावा याचं कोडं मात्र अद्यापी सुटलेलं नाही. एक्झीट पोल प्रमाणे सध्या प्रत्येक जण मत नोदवत आहे. मात्र अचानक महाराष्ट्राचा निकाल जसा अनपेक्षित लागला तसाच मुख्यमंत्री पदाचा निकालही अनपेक्षित असेल काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे या दोघांच्या नावाची चर्चा मात्र सुरु आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दिला आहे तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मान्यता दिली आहे, अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. महायुतीमधील सुत्रांनी ही माहिती दिलेली आहे.
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी अजित पवार गट आग्रही असल्याचे सांगितले जातंय. रविवारी झालेल्या बैठकीत अजित पवार आणि त्यांच्या सर्व आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यास पाठिंबा दिला. अजित पवार गट शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या बाजूने नाही, असे सुत्रांकडून सांगितले जातंय. अजित पवार यांची स्वतः ची इच्छा आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत. भाजपासोबत अजित पवार गट आल्याने शिंदे गटाला एक पाऊल मागे घेण्याची वेळ आल्याची चर्चा आहे. शिंदे यांनी पाठिंबा काढून घेतला तरी देवेंद्र फडणवीस हे अजित पवार गटाच्या मदतीने सहज मुख्यमंत्री होऊ शकतात. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पारडे जड असल्याचे बघायला मिळतंय. अजित पवार गटाचे 41 उमेदवार विधानसभेत निवडून आले आहेत. लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाऊ शकते.
शिंदे गटाची देखील इच्छा आहे की, परत एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे. मात्र महायुतीमधील बडे नेते हे मुख्यमंत्रीपदाबद्दल भाष्य करणे टाळत आहेत. एकनाथ शिंदे यांना देखील मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारण्यात आले. पण त्यांनी त्यावर काहीच भाष्य न करता निघून गेले. मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ते वाटाघाटी करत आहेत. पण शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद आणि १२ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात काही महत्त्वाची खाती असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदं मिळतील. भाजप स्वत:कडे २१ मंत्रिपदं ठेवणार आहे. गृह, अर्थ, शहर विकास, महसूल ही महत्त्वाची खाती मित्रपक्षांना सोडण्यास भाजप सुरुवातीला तयार नव्हता. पण आता यातील काही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे. गृह आणि अर्थ खाती आपल्याकडेच असावीत असा भाजपचा आग्रह आहे. यासाठी सध्या वाटाघाटी सुरु आहेत. अखेरच्या क्षणी मंत्रिपदांमध्ये, विभागांमध्ये बदल होऊ शकतो, असं सुत्रांनी सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटू शकतो. राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्रिपदांचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे, फडणवीस आणि पवार हजर असतील. यामध्ये मुख्यमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदांवर चर्चा करण्यात येईल. मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक वाटा देण्यात येईल, असा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून शिंदे, पवारांना देण्यात आला आहे.
दरम्यान मुख्यमंत्रिपद भारतीय जनता पक्षालाच जाणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. आपली नाराजी त्यांनी पक्षाच्या आमदारांपर्यंत पोहोचवलेली आहे. संध्याकाळनंतरच्या सगळ्या गाठीभेटी त्यांनी रद्द केल्या आहेत. वर्षावर पोहोचलेल्या आमदारांदेखील शिंदे भेटलेले नाहीत. महायुतीला शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभेत नेत्रदीपक यश मिळाल्यानं मुख्यमंत्रिपद त्यांच्याचकडे ठेवण्यात यावं, अशी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची आग्रही मागणी होती. पण ती पूर्ण होताना दिसत नाही. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी एकनाथ शिंदे गेल्या ३६ तासांपासून भाजपच्या नेतृत्त्वाशी वाटाघाटी करत होते. भाजपनं १३२ जागा जिंकल्यानं आमदार, नेत्यांचा मुख्यमंत्रिपदासाठी दबाव वाढलेला आहे. मागील ५ वर्षे सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही भाजपला मुख्यमंत्री मिळालं नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपद सोडू नये, अशी राज्य भाजपमधील नेत्यांची भूमिका आहे. त्यांच्या भावना समजून घेत पक्षानं मुख्यमंत्रिपद न सोडण्याची ठाम भूमिका घेतली आहे.
२०१४ मध्ये भाजपनं १२२ जागा स्वबळावर जिंकल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्यांना कमी महत्त्वाच्या खात्यांसह सत्तेत जावं लागलं. शरद पवारांच्या खेळीमुळे भाजपला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची गरज भासली नाही. उलट शिवसेनेलाच सत्तेत जायचं असल्यानं त्यांना भाजप देत असलेली खाती पदरात पाडून घ्यावी लागली. आता भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या आहेत. बहुमतापासून पक्ष अगदी जवळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असलेल्या शिंदेंकडे फारसे पर्याय नाहीत. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देत शिंदेंच्या शिवसेनेचं मूल्य कमी केलं आहे. २०१४ मध्ये काकां शरद पवार यांनी केलेली खेळी आता अजित पवारांनी केली आहे. यासाठीच कदाचित मागच्या वेळेस शिंदेंसोबत बहुमताचा आकडा असतानाही भाजपाने अजित पवारांना सोबत घेतले होते. पुढच्या टर्मची तयारी भाजपने आधीपासूनच केली होती. यालाच म्हणतात दूरदृष्टी.... सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर ,पंकजा या ओबीसी नेत्यांचा भाजप मुख्यमंत्री पदासाठी विचार करणार ? की भाजपमधील ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षा होणार? मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवताना त्याच त्या नावावर खल का व्हावा? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तरी भाजपा शिंदे, अजित पवार यांना इतक्यात दुखावणार नाही असे दिसते, - सुषमा अंधारे ( X पोस्ट)
0 टिप्पण्या