मोरारजी देसाईंना भैय्यासाहेब आंबेडकर यांनी जुनी हत्यारे काढू देऊ नका म्हणून ठणकावले होते,
भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र त्यानंतर बौद्धांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी बौद्धांना आरक्षण मिळवण्यासाठी रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड यांच्यासह भैय्यासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बौद्धांना आरक्षण मिळणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर भैय्यासाहेबांनी संताप व्यक्त करीत आम्हाला लपवून ठेवलेली जुनी हत्यारे काढण्यास भाग पाडू नका, असा गंभीर इशारा दिल्यानंतर बौद्धांना स्वतंत्र आरक्षण लागू झाले, यामध्ये भैय्यासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे, असे असे वक्तव्य भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष भिकाजी कांबळे यांनी येथे बोलताना काढले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाहुवाडी तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील बौद्ध समाजाचा मेळावा दादर येथील आंबेडकर भवन मध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मंचावर भारतीय बौद्ध महासभेचे भंडारे, सुभाष कांबळे, रामचंद्र वारूळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बौद्ध आणि आंबेडकरी चळवळीतील सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावर त्यांचे व्याख्यान झाले त्यावेळी भिकाजी कांबळे पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. माई आंबेडकर यानी नेहमीच बाबासाहेबांसोबत भैय्यासाहेबांची भेट घडली नाही. माई आंबेडकर यांच्यामुळेच बाबासाहेबांना एकुलता एक मुलगा भैय्यासाहेब यांच्या लग्नाला उपस्थित राहता आले नाही, याची खंतही भिकाजी कांबळे यांनी बोलून दाखवली. दादर येथील चैत्यभूमी उभारण्यासाठी भैय्यासाहेब आंबेडकर यांना जनतेतून जाऊन निधी उभा करून त्यांनी परिश्रम घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताने महू ते चैत्यभूमी अशी रॅली काढून त्याला प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद मिळाला. भैय्यासाहेब आंबेडकर यांनी विधान परिषदेत ही प्रतिनिधित्व करून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडले. बाबासाहेब आंबेडकर हे भैया साहेबांना दर महिन्याला मनी ऑर्डर पाठवून त्यांचा खर्च उचलत असत. एवढेच नव्हे तर भैयासाहेब आंबेडकरांना प्रिंटिंग प्रेसचा रोजगारही त्यांनी मिळवून दिला होता. यावेळी शाहूवाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला. अनेक मान्यवरांनी बौद्ध महासभेच्या कामकाजाची स्तुती करतानाच शाहुवाडी तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे काम हे संपूर्ण महाराष्ट्राला आदर्शवत आहे, असे वक्तव्य बौद्ध महासभेचे केंद्रीय एस के भंडारे यांनी बोलताना शाहूवाडी तालुक्याचा गौरव केला. बौद्ध धर्माची पूजा पाठ करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मेळाव्याला महिला आणि लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला होता.
0 टिप्पण्या