Top Post Ad

भटकंती मंडणगडची .... लेणी, गड किल्ल्यांची ...

 लेणी संवाद लेख क्र 31

१५-१६ सप्टेंबरच्या कऱ्हाड -वाई या दोन दिवसाच्या लेणी अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी नियोजना नंतर आम्ही दि १२-१३ ऑक्टोबर २०२४ रोजी एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह महाराष्ट्र राज्य चे ८ लेणी संवर्धक हे मंडणगड येथील लेण्यांचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. संस्थापक अध्यक्ष - सारिश डोळस , बबन ओव्हाळ, राजेश सकपाळ, ऍड खांदेश बगाटे , अभिजित बनसोडे, शैलेश पवार, राकेश पवार आणि प्रफुल्ल पुरळकर यांनी या दौऱ्यात सहभाग घेतला होता . शनिवार दि ११/१०/२०२४ ला रात्री १२ नंतर कळंबोली येथून प्रवास सुरू करून दि १२/१०/२०२४ रोजी सकाळी ६ वा आम्ही मंडणगड येथे पोहचलो .. स्थानिक मित्र आयु किशोर कासारे (शिक्षक ) यांनी आमची सकाळच्या नाश्त्याची व फ्रेश होण्याची सोय केली होती . त्यांच्याकडून आम्ही सकाळी नाश्ता करून १० वा. कोंझर येथील लेणी समूह अडखळ गावचे स्थानिक नागसेन लोखंडे दादा यांच्यासोबत पाहिला . कोंझर लेणी येथे सध्या २ लेण्यांचे अवशेष सध्या पाहायला मिळतात . एके काळची हि बौद्ध विहार लेणी ज्याला एकाक्ष्म लेणी देखील म्हटले जाते . वर्षावासातील ध्यानसाधनेसाठी अशा प्रकाच्या विहार लेणी कोरल्या जात होत्या. लेणीच्या जवळच नदी असून त्याचे पाणी येथील भिक्षु वापरत होते . सध्या ह्या विहारात जैन तीर्थंकर महावीर यांची मूर्ती आहे. हि मूर्ती मध्ययुगीन काळात इथे आणून ठेवली आहे असे स्थानिक सांगतात . गर्दे हिरव्या झाडीमध्ये, धबधबा , तेथील छोटी नदी खूप सुंदर वातावरणात हि लेणी पाहायला मिळाली. अडखळ व कोंझर गावच्या सीमा भागात जी नदी आहे त्याच्या शेजारीच लोखंडे यांचे घर त्या लेणीजवळच (त्यांच्या मोठ्या बागेत ) असून आजूबाजूचा परिसर सुंदर आहे. त्यांनी आम्हाला खीर दान व चहा देऊन आम्हा सर्वांचे स्वागत केले, आम्ही त्यांचे आभार मानून मंडणगड किल्ल्यावर पोहचलो ..
मंडणगड : गडावर पूर्ण सपाटी असून गडाला बालेकिल्ला नाही. गडावर गाडी जाण्यासाठी रस्ता आहे . गडावर गणेश मंदिर असून ते पायथ्याच्या मंडणगड गावातूनदेखील सहज दिसते. मंदिराचे नुतनीकरण झाल्याचे दिसून येते. मंदिराला लागूनच खालच्या बाजूला मोठा तलाव आहे. या तलावात बारमाही पाणी असते. तलावात उतरण्यासाठी पश्चिमेकडून पायऱ्या बांधलेल्या आहेत. या पायऱ्यांच्या वाटेवर पूर्वी दरवाजा असावा, असे तेथील अवशेषांवरून दिसून येते. गडावर आणखी एक कोरडा मोठा तलाव दिसून येतो. दोन तलावांमधून पुढे गेल्यावर उजवीकडे एक कबर आहे. कबर ज्या जोत्यावर आहे ते जोते एखाद्या मंदिराचे असावे, असे वाटते. ही कबर छ. शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ दर्यावर्दी आणि मराठी आरमाराचा प्रमुख दौलतखान याची असावी असे स्थानिक सांगतात . गडावर एक तोफ देखील आहे. गडावरून तालुक्याचा परिसर विलोभनीय दिसत होता. प्राचिनकाळी कोकणातील समुद्रातून छोट्या गलबतांमधून व्यापार चालत असे. अशी गलबते नदीतून खोलवर आत आणता येत. समुद्राच्या तुलनेत नदीचे पाणी स्थिर असल्यामुळे नदीच्या काठावरुन मालाची चढ उतार करणे सोपे जात असे. सावित्री नदी बाणकोट जवळ समुद्राला मिळते. या भागात नदीचे पात्र रुंद आहे. त्यामुळे प्राचिन काळी या नदीतून परदेशांशी व्यापार चालत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी बाणकोट व मंडणगड या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती. किल्ल्यावर सर्वानी उत्कृष्ट फोटोग्राफी चा आनंद घेतला , कारण तेथील लोकेशन जबरदस्त होते .
किल्ला पाहून आम्ही मंडणगड येथील विश्वरत्न प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे बौद्ध समाज सेवा संघ आयोजितअशोका विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन, तसेच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व महामाता रमाई (५ वि आवृत्ती ) - लेखक नथुराम जाधव यांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो . बौद्ध समाज सेवा संघ यांनी आमच्या एकजूट टीम चा सत्कार व ५ मिनिटे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली . लेणी संवाद चे प्रफुल्ल पुरळकर व बबन ओव्हाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले व एकजूट ची माहिती पत्रके उपस्थिताना देण्यात आली . संपूर्ण कार्यक्रम व जेवण झाल्यानंतर आम्ही मंडणगड येथील पणदेरी लेणी पाहण्यासाठी गेलो . हि लेणी देखील गर्द हिरव्या झाडीत असून तिथे जाण्यासाठी आम्हाला एका ९ वर्ष्याच्या राहुल पणदेरीकर या मुलाने मदत केली . त्याचसोबतच आम्ही हा लेणीसमूह पहिला . एके काळच्या बौद्ध लेणीच्या परिसरात आता शिवलिंग पाहायला मिळतोय . निसर्गाच्या सानिध्यात कोरलेल्या लेणीजवळ एक छोटी नदी आहे . या लेणीचे उत्तखनन होणे गरजेचे आहे . लेणी अभ्यासकांनी कोंझर व पणदेरी लेणीवर संशोधन करायला हवे . हि लेणी पाहून आम्ही मंडणगड येथील आंबडवे गावातील प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव व स्मारक पाहण्यासाठी गेलो . तेथील स्मारक आम्ही सर्वानी पहिल्यांदाच पाहिले . बुद्धवंदना घेऊन आम्ही फोटोग्राफी देखील केली. तिथे आम्ही एक जुना पंचशील ध्वज काढून त्या जागी नवीन पंचशील ध्वज लावला .. बाबासाहेबाच्या मूळ गावाच्या आठवणी घेऊन आम्ही मंडणगड येथील पाले या गावी म्हणजेच ( महामाता रमाई (५ वि आवृत्ती ) - लेखक नथुराम जाधव ) यांच्या गावी आलो .. त्यांनी आमच्या रात्रीच्या मुक्कामाची सोय केली होती . संध्याकाळचा चहा - नाश्ता व रात्रीचे जेवण , चर्चा करून, थंडगार वातावरणात रात्रीचा आराम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पुनः एकदा फ्रेश होऊन पाले गावचा निसर्ग पाहिला . हे गाव देखील डोंगरांच्या कुशीत वसलेले असून आजूबाजूला गर्द हिरवेगार जंगल पाहून या गावी पुन्हा एकदा यायचे असे ठरवून आम्ही दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला सुरुवात केली .
दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी आम्ही वेळास व बाणकोट बीच पाहिला . या गावाच्या दोन्ही बाजूला सावित्री नदी व भारजा नदी वाहते. वेळास बीच हा कासवांच्या प्रजातीच्या उत्पत्ती साठी प्रसिद्ध असून येथे नोव्हेंबर-एप्रिल मध्ये येथे “कासव महोत्सव“ कार्यक्रम आयोजित केले जातात . ज्याला महाराष्ट्रासह देशभरातून निसर्गप्रेमी हजेरी लावतात. वेळास गावातील समुद्री कासवांच्या प्रजननाची प्रक्रिया आणि अरबी समुद्रात लहान कासवांच्या प्रगतीच्या स्मरणार्थ हा महोत्सव साजरा केला जातो. २००६ पासून हा महोत्सव सुरु असून स्थानिक लोकांच्या सहभागाने कासवांचे संवर्धन करणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. गावात ‘कासव मित्र मंडळाची’ स्थापना देखील करण्यात आली आहे. हा दिड किलोमीटर चा समुद्र किनारा असून २०१५ मध्ये दापोली तालुक्यातील आंजर्ले -केळशी गावातल्या किनाऱ्यावर देखील कासव महोत्सवास सुरुवात करण्यात आला आहे. या बीचवरील फोटोग्राफी करून आम्ही बाणकोट किल्यावर पोहचलो .
बाणकोट किल्ला : वेळास समुद्रकिनाऱ्यापासून बाणकोट खाडीसमोरील सावित्री नदीजवळच्या टेकडीवर अवघ्या ४ किमी अंतरावर आहे. मध्ययुगीन काळात येथे व्यापार मार्ग होते. महाराष्ट्रातील शिवपूर्वकालीन किल्ला असून मंडणगड या तालुक्याच्या ठिकाणापासून ३५ किमी. अंतरावर आहे. हिम्मतगड तसेच फोर्ट व्हिक्टोरिया या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला विजापूरच्या राज्यकर्त्यांकडे होता आणि नंतर 1548 मध्ये पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. 1700 मध्ये मराठ्यांनी तो ताब्यात घेतला . किल्याकडे जाणारा हा घाट रस्ता दाट आमराईतून बाणकोट टेकडीच्या माथ्यावरील पठारावर जातो. पठारावर प्रथम गडाच्या मागील बाजूचा तट, बुरूज व तटाखालील खंदक दिसून येतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार पठाराच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच उत्तरेला आहे. जमिनीकडील बाजूने सहजासहजी किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये म्हणून १० फूट खोल व १५ फूट रुंद असा खंदक खोदलेले आहेत . अशा प्रकारचा खंदक कोकणातील जयगड, देवगड, यशवंतगड इत्यादी किल्ल्यांवर आहेत . इ. स. १७५५ मध्ये कमांडर जेम्स या इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजी आंग्य्रांकडून बाणकोट जिंकून त्याचे ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ असे नामकरण केले होते . पुढे मराठे-इंग्रज तहानुसार इंग्रजांनी बाणकोट मराठ्यांना परत दिला व मराठ्यांनी ‘फोर्ट व्हिक्टोरिया’ नाव बदलून पुन्हा ‘हिम्मतगड’ असे ठेवले. बाणकोट किल्ला हे ब्रिटीश राजवटीचे कोकणातील पहिले निवासस्थान होते. २०१८ पासून राज्य पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यावर जतन व संवर्धनाचे काम चालू आहे. बाणकोट किल्ला प्रशस्त असून आम्ही संपूर्ण परिसर फिरून फोटोग्राफी केली . फेसबुक लाईव्ह करून त्याची माहिती देखील देण्याचा प्रयत्न केला . बाणकोट किल्ला पाहून आम्ही वेश्वी जेट्टीतून हरिहरेश्वर येथे पोहचलो .
वेश्वी जेट्टीतून पहिल्यांदाच काही जणांनी प्रवास केला त्यामुळे त्यांना एक नवीन अनुभव मिळाला . वेश्वी - बागमांडले जेट्टी हे अंतर वेळास पासून सुमारे 15 किमी अंतर असून त्याच्या पुढे काही अंतरावर हरिहरेश्व्रर मंदिर आहे. हे मंदिर शिव आणि कालभैरव यांना समर्पित आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेल्या या मंदिराजवळील समुद्रकिनारा देखणा आहे . येथील प्रदक्षिणा मार्ग, नेकलेस पॉईंट बघण्यासारखे आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला ज्याला शुक्ल तीर्थ (नेकलेस पॉईंट ) म्हणतात तिथे आम्ही सर्वजण गेलो . ते ठिकाण आम्हाला नाणेघाट ची आठवण करून देत होते. कदाचित हा देखील एक व्यापारी मार्ग असावा असे आमच्या सगळ्यांचे मत झाले. तेथील जुन्या पायऱ्या तशाच ठेवून नवीन पायऱ्या बांधलेल्या पाहायला मिळाल्या. तेथे देखील सर्वानी फोटोग्राफी करून आम्ही मुंबईच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली . माणगाव येथे संध्याकाळचा चहा नाश्ता करून आम्ही नवी मुंबईला (कळंबोली ) साधारण ९ वा पोचलो व तेथून आम्ही आपापल्या घरी सुखरूप पोहचलो. दोन दिवसाच्या अविस्मरणीय भटकंतीच्या आठवणी मनात साठवून ..
प्रफुल्ल पुरळकर
एकजूट लेणी अभ्यास प्रचार समूह

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com