शिवसेनेच्या बाबुराव मानेंना किती काळ कुजवणार?
मुंबईतील धारावी ही विधानसभेची जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. तिथल्या काँग्रेसच्या आमदार प्रा. वर्षा गायकवाड या आता भाजपच्या ॲड. उज्ज्वल निकम यांना पराभूत करून लोकसभेत खासदार म्हणून गेल्या आहेत. त्यापूर्वी त्यांनी २००४ पासून धारावीतून चार वेळा विधानसभेवर जावून दोन वेळा कॅबिनेट मंत्रीपद उपभोगले आहे. त्यांच्या आधी त्यांचे वडिल दिवंगत काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे धारावीतून १९८५ पासून पुढील तब्बल २५ वर्षे आधी विधानसभेत आणि नंतर दोनदा लोकसभेतही निवडून गेले. त्यांनीही राज्यात दोनदा मंत्रीपद उपभोगले होते. त्याला अपवाद फक्त आमदारकीच्या फक्त एका टर्मची संधी मिळालेले शिवसेनेतील चर्मकार नेते बाबुराव माने यांच्या १९९५ - २००० या पाच वर्षांच्या कालखंडाचा आहे. म्हणजे, एकनाथ गायकवाड यांच्या एकाच कुटुंबाला मिळालेला सत्तेचा परमोच्च लाभ हा संपृक्तिकरणाच्या प्रकारात मोडणारा, saturation point गाठणारा ठरला आहे. त्यामुळे आताच्या निवडणुकीत धारावीची जागा शिवसेनेला सोडून बाबुराव माने यांना संधी देण्याचे औदार्य जागा वाटपात ' शतक ' पार करणाऱ्या काँग्रेसने दाखवायला हवे होते.
पण काँग्रेसने तिथे खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांची ' लाडकी बहिण ' डॉ. ज्योती गायकवाड यांना आणण्यात धन्यता मानली आहे. परिणामी: धारावी मतदारसंघातील शिवसैनिकांच्या दबावामुळे आणि विशेषत: विविध पक्ष - संघटनांच्या दलित सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे बाबुराव माने यांनी आपला उमेदवारी अर्ज धारावीतून दखल केला आहे. त्या मतदारसंघातील काँग्रेसची ' घराणेशाही ' आता सुवर्ण महोत्सवाच्या उंबरठ्यावर आहे. मग बाबुराव माने यांच्या सारख्या प्रामाणिक, निष्ठावंत आणि लोकप्रिय कार्यकर्त्यांची यापुढेही कुजवणुक होवू न देण्यासाठी शिवसेना ताठर भूमिका घेणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे. बाबुराव माने हे माजी आमदार असलेले शिवसैनिक असले तरी त्यांचा संवाद, संपर्क, वावर हा शिवसेनेपुरता आणि धारावीपुरता नाही. चर्मकार समाजाला शिवसेनेशी जोडण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. तसेच राज्यातील दलित आणि पुरोगामी चळवळीची पाठराखण करणारा चेहरा म्हणून ते सर्वपरिचित आहेत.
*घोलप - माने यांच्यातील फरक*- नाशिकचे एक माजी मंत्री बबनराव घोलप हेसुद्धा चर्मकार समाजातीलच आहेत. त्यांचा मुलगा योगेश घोलप यांना देवळालीची जागा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुतीतून मिळवून दिली आहे. खरे तर, घोलप हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून परतले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनाही आधी भेटले होते. त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास पवार राजी झाले असते तर घोलप हे आता राष्ट्रवादीत दिसले असते. घोलप आणि बाबुराव माने यांच्यातील फरक हाच आहे.
*सुशीलकुमार यांच्या कन्येला वेगळा न्याय*- तर, दुसरीकडे, काँग्रेसने ' धारावी ' धोरण ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सोलापूर मध्य या विधानसभा मतदारसंघात अनुसरण्याचे मात्र कटाक्षाने टाळले आहे. तिथे शिंदे घराण्याचा ' ठसा ' मिटवून टाकण्याच्या नादात त्या मतदार संघात चर्मकार आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचा रोष ओढवून घेण्याचीही तमा काँग्रेसच्या नेतृत्वाने बाळगलेली नाही. सोलापूर मध्य या खुल्या जागेवर चर्मकार आणि मुस्लिम समाजाची उमेदवारीची मागणी धुडकावून लावत काँग्रेसने तिथे चेतन नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. ते धनगर समाजातील आहेत.
*शिवसेनेची घसरण* - १९९० सालात विधानसभेच्या १८३ जागा लढवलेली शिवसेना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ९६ जागांवर आली आहे. फरक इतकाच की, १९९० सालात शिवसेनेची युती भाजपसोबत होती. अन् आता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीत आहे. भाजप सोबतच्या प्रदीर्घ युतीमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा १९९५ मध्ये जिंकल्या होत्या. तर, २०१४ मध्ये भाजपने युती वाऱ्यावर सोडून दिल्यावरही शिवसेनेने राज्यात स्वबळावर ६३ जागा जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ३० जागा जिंकलेल्या महा विकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाला ९ जागांवर विजय मिळालेला आहे. अर्थात, त्याचे कारण पक्षात पडलेली फूट आणि बदललेले निवडणूक चिन्ह हे आहे.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
🔘 *दिवाकर शेजवळ
0 टिप्पण्या