Top Post Ad

ठाण्याचा गड कोण राखणार... शिवसेनाXशिवसेना... राष्ट्रवादीXराष्ट्रवादी...

ठाणे ‍जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 381 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकूण 334 उमेदवारांचे अर्ज वैध तर 47 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. वैध ठरलेल्या 334 उमेदवारांपैकी आज एकूण 90 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. आता ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 
काही दशकांपूर्वी ठाणे  जिल्ह्यावर जुना जनसंघ आणि सध्याचा  भाजप पक्षाचा दबदबा होता. मात्र आनंद दिघे नावाचं वादळाने एकत्रित शिवसेना वाढवली आणि भाजपसह इतरांचा दबदबा कमी होऊ लागला. २०१४ साली केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आल्यापासून भाजपने एकत्रित शिवसेनेवर नेहमीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र मराठी माणसांची एकूणच शिवसेनेवर असलेली निष्ठा यापुढे भाजपाचा निभाव लागला नाही. तरीही शिवसेनेला टक्कर देण्याचा प्रयत्न भाजपने प्रत्येक निवडणुकीत केला अंबरनाथ , बदलापूर , कल्याण डोंबिवली तसेच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्रपणे शिवसेनेच्या विरोधात लढली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्या मंत्रिमंडळातील दिग्गज मंत्र्यांसह शिवसेनेला आव्हान देण्याचे काम सातत्याने केले, याचमुळे  भाजपचे बळ वाढले. मात्र एकत्रित शिवसेनेपेक्षा जास्त जागा काही ते मिळवू शकले नाहीत. त्यातच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेला टक्कर देण्यासाठी प्रभावी नेतृत्व तयार करण्यासाठी भाजप प्रयत्न करेल अशी अपेक्षा होती.  मात्र गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात तसे प्रयत्नही झाले नाहीत. एकीकडे भाजपचे हे हाल तर दुसरीकडे ठाण्यातील काँग्रेस असूनही नसल्यासारखीच. तीच्या अस्तित्वाची दखलच ठाणेकर घेत नसल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. 
  जिल्ह्यात शिंदे यांचे बळ अधिक असल्याने 
 आपले अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हान  भाजप पुढे असणारच आहे. राज्यात  शिवसेना एकनाथ शिंदे गट, भाजपची युती झाल्याने ठाण्याची विधानसभेची जागा आपल्याच पक्षाला मिळावी यासाठी रस्सीखेच सुरु होती. माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, संदीप लेले, मृणालिनी पेंडसे, राजेश मढवी अशी भाजप नेत्यांची रांग या जागेसाठी तग धरून बसली होती. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर माजी स्थायी समिती सभापती मिलिंद पाटणकर यांनी ठाणे विधानसभेसाठी भक्कम दावेदारी सांगितली होती.  गेल्या काही दिवसात समाज माध्यम आणि विविध माध्यमातून या सर्व मान्यवरांनी आपल्या मनातली इच्छा व्यक्त केली होती. मात्र संजय केळकर यांच्या नावालाच भाजप श्रेष्ठींनी पसंती दिल्यामुळे अनेकांना हिरमुसले व्हावे लागले.  केवळ भाजपामध्येच नव्हे तर शिंदे गटातील देखील अनेकजण गुडघ्याला बांशींग बांधून या मतदारसंघासाठी तयार होते. त्यामध्ये सर्वात प्रथम माजी महापौर मिनाक्षी शिंदे होत्या.  पक्षाने तिकीट नाही दिले तर अपक्ष म्हणून उभे राहणार असल्याचेही त्यांनी जाहिर केले होते. मात्र त्यांना शांत करण्यात आले आहे.

संजय केळकर हे सध्या ठाणे विधानसभेचे आमदार आहेत.  केळकर हे एकदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर सलग दोनवेळा ते विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. आता तिसऱ्या वेळेस ते ठाणे विधानसभेच्या रिंगणात आहेत. एकत्रित शिवसनेच्या ठाणे या गडातून २०१४च्या  विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांचा पराभव केला. रविंद्र फाटक यांचा पराभव अंतर्गत हेवेदावेमुळेच झाला असल्याची चर्चा त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये होती. शिंदे यांचा दबदबा असलेल्या ठाण्याच्या मुख्य बालेकिल्ल्यात शिवसेनेचा पराभव... हे काही कार्यकर्त्यांच्या गळी उतरत नव्हते. मात्र कालांतराने यामागील राजकारण उघड झाले. 

 विद्यमान आमदार संजय केळकर त्यांच्यासमोर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तगडे आव्हान यावेळी आहे. खासदारकी उपभोगलेले राजन विचारे हे आमदारकीसाठी उभे आहेत. दोन वेळा खासदार झालेले राजन विचारे यंदा मात्र शिंदे फॅक्टरमुळे पराभूत झाले. तरीही पुन्हा ठाकरे यांनी त्यांच्याच गळ्यात आमदारकीची माळ घालण्याचे मनसुबे रचल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यंदा शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांची महायुती आहे त्यामुळे पुन्हा एकदा भाजप हा गड राखेल असे म्हटले जात असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव हे देखील या मतदार संघात पाय रोवून उभे आहेत. जाधव यांच्या मागे असलेले कार्यकर्त्यांचे जाळे पाहता त्यांनाही कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे ही तिहेरी लढत होणार हे निश्चित. 

   खरे तर ठाणे विधानसभेसाठी केदार दिघे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. खासदारकीसाठी राजन विचारे लढत असताना आमदारकी केदार दिघे मिळवतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात होती.  मात्र केदार दिघे यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत टक्कर देण्यासाठी पक्षस्रेष्ठीनी पाठवले आहे. मु्ख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून संबोधण्यात येणारा त्यांचा मतदारसंघ, याला छेद देण्यासाठी केदार दिघे यांना आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे हे मात्र निश्चित. त्यातच जर कार्यकर्त्यांनी इमाने - इतबारे काम केले तर कदाचित बाजी उलटू शकते. मात्र त्यासाठी सच्चा शिवसैनिकांची निष्ठा लागणार आहे.

  काही महिन्यांपूर्वी प्रताप सरनाईक यांचा मतदारसंघ त्यांच्या हातून जाणार अशा आवया उठल्याने प्रताप सरनाईक आक्रमक झाले होते. मात्र शिंदे यांनी त्यांना सबूरीचा सल्ला दिल्याने ते काही काळ शांत राहिले. आणि  ओवळा-माजिवडा मतदार संघातून पुन्हा एकदा प्रताप सरनाईक यांची उमेदवारी जाहिर झाली आहे.  मात्र  ई.डी.चा ससेमिरा कायम मागे असलेल्या प्रताप सरनाईक यांना यावेळी जनता किती प्रमाणात कौल देते हे पाहण्यासारखे ठरणार . कारण त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवक नरेश मणेरा सारखे व्यक्तीमत्व उभे केले आहे. नरेश मणेरा यांचा दबदबा कायमच या संपूर्ण मतदार संघावर आहे. अनेक प्रकारच्या लोकोपयोगी कार्य त्यांच्या पाठिशी आहे. इतकेच नव्हे तर कार्यकर्त्यांचे बळ देखील त्यांच्या मागे आहे. त्यामुळे या वेळी सरनाईक यांची या मतदारसंघावरील दावेदारी कदाचित संपुष्ठात येईल अशी शक्यता नाकारता येत नाही.   याही ठिकाणी मनसेचे संदिप पाचंगे यांनी आपली उमेदवारी जाहिर केल्याने लढतीमध्ये चूरस निर्माण झाली आहे. 

मुंब्रा कळवा ही जितेंद्र आव्हाडांची मक्तेदारी आहे का असे म्हणत थेट आव्हान देणाऱ्या नजीब मुल्ला यांच्या मुळे जितेंद्र आव्हाडांनी ही निवडणूक काहीशी जड जाण्याची चिन्हे जाणकारांनी व्यक्त केली आहेत.  शरद पवार गटाचे दोन भाग झाल्यामुळे याच गटातील दोन वेगवेगळे उमेदवार आमने सामने असल्याने आता इथे नेमका कोणता गट आपले अस्तित्व टिकवून आहे हे या निवडणुकीत कळेल. एकूणच ठाणे जिल्हा ज्या आनंद दिघे यांची पक्कड होती ती आता सैल होत चालली असल्याचे दिसत आहे. आनंद दिघे यांनी ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नावारुपास आणला तो आज गटातटात विभागल्याने शिवसैनिक देखील सैरभैर झाले आहेत. कोण खरे आणि कोण खोटे याची चर्चा करण्यातच सर्व दिवस जात असल्याने तिकडे नेतेमंडळी मात्र याच आनंद दिघे यांच्या नावाने राजकारण करून आपला स्वार्थ साधत असल्याचे दिसून येत आहे. अशी खंत जुणे जाणते कट्टर शिवसैनिक करत आहेत. तरीही महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कळेल ठाण्याचा गड कोण राखणार...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com