.गांधी जयंती व लाल बहाद्दुर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून इंडिया आघाडी व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान ते महात्मा गांधी पुतळा अशी अहिंसा रॅली काढली. या रॅलीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, शिवसेना खासदार अरविंद सावंत, समाजवादी पक्षाचे आ. अबु आझमी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष राखी जाधव, भाकपाचे प्रकाश रेड्डी, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, प्रवक्ते सचिन सावंत, युवराज मोहिते,सुरेशचंद्र राजहंस, अभिनेत्री स्वरा भास्कर, फिरोज मिठीबोरवाल, मा. आमदार अशोक जाधव, तुषार गायकवाड, संदीप शुक्ला, कचारू यादव आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, देशात फुटीरतावादी शक्तींनी डोके वर काढले असून देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जातीच्या व धर्माच्या नावावर समाजात फुट पाडून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सातत्याने केले जात आहे. अशावेळी गांधीजींच्या विचारांची देशाला नितांत गरज आहे. देशाला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेण्याचा आणि फुटीरतावादी शक्तींचा पराभव करण्याचा आमचा संकल्प आहे. ज्यातील सामाजिक सलोखा भंग करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत तसेच महिला अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, या दोन मुद्द्यांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व समाजात जागृती करण्याच्या उद्देशाने ही अहिंसा रॅली काढण्यात आली. महिला अत्याचारात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे शिव, शाहु फुले, आंबेडकर विचाराच्या राज्याला शोभा देणारे नाही. राज्यातील भाजपा-शिंदे सरकार या समस्यांकडे लक्ष देत नाही, केवळ टेंडर काढून मलई खाणे याच कामात या सरकारला जास्त रस आहे. झोपी गेलेल्या भाजपा सरकारला सद्बुद्धी येवो व सामाजिक शांतता व सौहार्द कायम रहावे व महिला सुरक्षेकडे गांभिर्याने लक्ष द्यावे हाच या रॅलीचा उद्देश आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
0 टिप्पण्या