सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष हा उत्तर महाराष्ट्रातील धुळे ,नंदुरबार, नाशिक तसेच संभाजीनगर,पुणे जिल्ह्यात कष्टकरी शेतकरी आदिवासींच्या शेती, जल ,जंगल, जमीन व रोजगार हक्काच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत आला आहे. 1978 सालापासून ते 2023 च्या नंदुरबार ते मुंबई पायी बिढार मोर्चा पर्यंत हा संघर्ष चालूच आहे. सत्यशोधक ने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व शेतीमालाला रास्त भाव या प्रश्नांवर सातत्याने अगदी दिल्लीच्या संयुक्त किसान मोर्चापर्यंत विविध आंदोलनात सहभाग पुढाकार घेतला आहे. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने साक्री व नवापूर विधानसभा निवडणूक सातत्याने लढवल्या आहेत व दखलपात्र मतदान घेतलेले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये लाल निशान पक्षाच्या समवेत नंदुरबार व धुळे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने नंदुरबार मध्ये 22 व धुळे लोकसभा क्षेत्रात 19 छोट्या-मोठ्या सभा संघटित करून संविधान वादी विचार व इंडिया आघाडीचा प्रचार गावोगाव पोहोचवला ,हे निकालात दिसलेच.
नंदुरबार लोकसभा क्षेत्रात एडवोकेट गोवाल पाडवींना साक्री 55000 व नवापूर मध्ये 63 हजार एवढे मताधिक्य मिळवून देण्यात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर शोभा बच्छाव फक्त 3000 मतांनी निवडून आल्या आहेत, त्यातही बागलाण, धुळे ग्रामीण व शिंदखेडा येथील सत्यशोधक आदिवासी व दलित मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे . याला काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाउ पटोले व इतर नेते स्वतः साक्षी आहेत. सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाशी लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसच्या धुळे व नंदुरबार जिल्हा कमिटी यांनी राज्य नेत्यांसमोर लेखी करार केला होता. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या या करारात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षासाठी साक्री विधानसभा मतदारसंघ सोडण्यात येईल व त्याला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील असे कलम तीन व चार मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. या करारावर नंदुरबार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक व एड. गोवा पाडवी यांच्या वतीने माजी मंत्री एडवोकेट के सी पाडवी,नंदुरबार जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष माननीय दिलीप नाईक, शिवसेना नंदुरबार संपर्कप्रमुख विद्याताई साळी तसेच राज्य कार्याध्यक्ष आमदार कुनालबाबा पाटील यांच्या समोर धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर आणि डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या सामंजस्य करारा ची अंमलबजावणीची मागणी लोकसभा निवडणुकीनंतर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने सातत्याने केली. शरद पवार यांची दिल्ली येथे कम्युनिस्ट पक्ष मालेच्या कॉम्रेड राजाराम सिंग व कॉम्रेड सुदामा प्रसाद यां दोन खासदारांसह भेट घेतली त्यानंतर नानाभाऊ पटोले ,बाळासाहेब थोरात, डॉ सुधीर तांबे, सेनानेते आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे या सर्वांची भेट घेऊन महाविकास आघाडीकडे साक्री व बागलाण या दोन विधानसभा मतदारसंघांची मागणी केली. कराराच्या प्रती सर्व नेते मंडळींना पुन्हा आठवणीसाठी देण्यात आल्या. काँग्रेसचे ज्येष्ठ निरीक्षक रमेश चैनीतलाजी यांनाही या कराराची प्रत देण्यात आली. परंतु या आठवणीनंतरही लोकसभा निवडणुकीतील डाव्या पक्षांचा पाठिंबा, त्यांनी कोणत्याही साधन साधनसामुग्रीची वाट न पाहता केलेल्या प्रचार याकडे काँग्रेस पक्षाने कानाडोळा केला व छोट्या पक्षांना विशेषता डाव्यांना विचारात न घेता तिकीट वाटप करत आहेत.
आज ते भाजपमधून आलेल्या आयाराम गयारामांना किंवा मागील निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्यांना उमेदवारी देत आहेत. परंतु जातीयवादाच्या विरोधात जीवाचं रान करणाऱ्या प्रसंगी बलिदान करणाऱ्या डाव्यांना नाकारत आहेत.काँग्रेसने याच पद्धतीचा व्यवहार हरियाणा मध्ये केला आहे. त्याचा परिणाम ते विसरलेले दिसतात.आयाराम गयारामांना प्रोत्साहन, खोक्यांवर विकले गेलेल्यांना परत तिकिटे, जातीयवाद्यांशी संगनमत करणाऱ्यांना तिकिटे आणि समतावादी डाव्या आंबेडकरवादी पक्षांना स्थान नाही असा व्यवहार महाराष्ट्रात केल्यास महाराष्ट्राचाही हरियाणा झाल्याशिवाय राहणार नाही. लेखी करार करून तो न पाळणे हा लोकशाहीशी विसंगत व्यवहार आहे . काँग्रेसच्या लोकशाही विरोधी व्यवहाराचा निषेध करीत आहोत.
सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आज साक्री--कॉम्रेड यशवंत देवमन मालचे,बागलाण-- संजय संजय भिका निकम व नवापूर-- रणजीत वंत्या गावित या तीन उमेदवारांची घोषणा करीत आहे या व्यतिरिक्त धुळे ग्रामीण व शिंदखेडा, कन्नड, नंदुरबार या ठिकाणी उमेदवार उभे करणे किंवा वेळप्रसंगी मतदान संविधानवादी अपक्षा कडे वळवणे हा पर्याय आहे. जनतेनेही जातीयवादी,खोकेवादी उमेदवारांना जेथे महविकास आघाडीने तिकिटे दिली त्या काँग्रेस उमेदवारांऐवजी डाव्या फुले आंबेडकरवादी समाजवादी विचारांचा पर्याय स्वीकारावा व निषेध व्यक्त करावा. असे आवाहन सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड किशोर ढमाले नंदुरबार जिल्हाध्यक्ष गावित व धुळे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश मोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले .
0 टिप्पण्या