निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकसभा निवडणुकीत काय काय उद्योग केले हे जनतेला माहित आहेत. भाजपा सरळ व प्रामाणिकपणे निवडणुका जिंकू शकत नाही म्हणून मतदार याद्यातून महाविकास आघाडीच्या मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे प्रयत्न करत असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेले आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत, असे प्रत्त्युत्तर देत मतदारयाद्यात भाजपाकडून हेराफेरी केली जात आहे याकडे निवडणूक आयोगाने गंभीरपणे लक्ष द्यावे, असे काँग्रेस प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेत सुरेशचंद्र राजहंस म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा कोणत्या थराला जावू शकतो हे जगाने पाहिले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरपावर करून भाजपाने निवडणुकीत घोटाळे केल्याचे याआधीही अनेकवेळा उघड झालेले आहे. चंदिगडच्या महापौरपदाच्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यानेच भाजपाला विजय करण्यासाठी काय उद्योगधंदे केले हे सीसीटीव्हीतून सर्वांनी पाहिले, न्यायालयात त्याचे काय झाले हे बावनकुळे यांनाही माहित असेलच. पश्चिम बंगाल व विरोधी पक्षाच्या राज्यात निवडणुका असताना तेथील पोलीस महासंचालक बदला अशी भाजपा मागणी करताच निवडणूक आयोग बदली करतो पण महाराष्ट्रात मात्र हाच निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकची बदल करत नाही. निवडणुक आयोगही भाजपाच्या दबावाखाली काम करत आहे हे स्पष्ट दिसत आहे. पण अशी कटकारस्थाने करून निवडणूक आयोग व प्रशासनाच्या मदतीने महाराष्ट्राची निवडणूक जिंकू शकतो असे भाजपाला वाटत असेल पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राची जनता ते कदापी होऊ देणार नाही."२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची नावे मोठया संख्येने गायब कशी झाली? कुणाच्या आदेशाने गायब झाली?" असे प्रश्न भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे विचारत आहेत. दिल्लीत व राज्यातही भाजपाचाचे सरकार असताना मतदार याद्यातील नावे विरोधक गायब व गहाळ करू शकतात असे चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणायचे असेल तर हा एक मोठा विनोदच म्हणावे लागले. कटकारस्थाने करून आमदार विकत घेऊन राज्यपाल व सरकार यंत्रणांच्या मदतीने मविआचे सरकार पाडण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चोरणाऱ्या भाजपाने विधानसभेला कोणताही मार्ग अवलंबला तरी त्यांचा पराभव अटळ आहे हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही सुरेशचंद्र राजहंस यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या