बदलापुरात दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचारानंतर महिला सुरक्षेसाठी मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच त्या वल्गना ठरल्या. ठाण्यातील भंडार आळीत एका ११ वर्षीय चिमुकलीचा उपविभागप्रमुख सचिन यादव यानेच विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. भंडारआळी परिसरातील पिडीत मुलगी सातवीत शिकत असून हा पदाधिकारी सचिन यादव देखील भंडारआळी परिसरात राहतो. दुपारी दीडच्या सुमारास सचिनने पीडित मुलीच्या इमारतीतच तिचा विनयभंग केला. यावेळी त्याला रहिवाशांनी रंगेहाथ पकडले. यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिनला अटक केली. मात्र थातूरमातूर गुन्हा दाखल केल्याने या नराधमाची लगेच सुटका झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ठाण्यातील बड्या नेत्यांचा वरदहस्त असलेल्या माजी नगरसेवकाचा सचिन यादव हा निकटचा साथीदार असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. गेल्या अनेक दिवसापासून तो चिमुरड्या मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य करत होता. मात्र जिवाच्या भीतीने तिने घाबरून ही घटना कोणालाही सांगितली नाही. . या नराधमाला तत्काळ जामीन झाल्याने भाजप, शिवसेना (उबाठा) च्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन या विकृतावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
पोलिसांनी थातूरमातूर कलमे लावल्याने नराधमाला जामीनही मिळाला. या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली असून या नराधमाला जामीन झाला कसा? असा संतप्त सवाल पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे. सचिन यादव याच्यावर पोक्सो अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नराधमाचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात अपील करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने तसेच अटक केलेल्या यादवला जामीन मिळाल्याच्या निषेधार्थ नराधम आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी संपुर्ण ठाणेकरांनी मोर्चा आयोजित केला आहे. सायंकाळी 6 वाजता भंडारआळी येथून या मोर्चाची सुरुवात होणार असल्याचे बॆनर शहरात लावण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या