पुण्यात दररोज अपघाताचे सत्र सुरूच आहे. ते काही थांबण्याचं नाव घेईना, थोड्याश्या पावसात रस्ते तुंबत आहेत. आता तर थेट रस्ताच खचून भलामोठा खड्डा पडल्याने नागरी सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाला असल्याने नागरीक हवालदील झाले आहेत. पुण्यातील समाधान चौक परिसरातील सिटी पोस्ट आवारामध्ये पेव्हिंग ब्लॉकचा रस्ता अचानक खचला. त्यामुळे पडलेल्या खड्ड्यामध्ये संपूर्ण ट्रकच कोसळला. हा ट्रक पुणे महापालिकेचा आहे. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. ट्रकसोबत आणखी दोन दुचाकी सुद्धा खड्ड्यात पडल्याची माहिती मिळत आहे. हा रस्ता पेव्हिंग ब्लॉकने तयार केलेला असताना सुद्धा भलामोठा खड्डा पडून संपूर्ण ट्रकच खड्ड्यात पडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोरखंडाच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र खड्डा खूप खोल असल्याने व ट्रक पुरता अडकल्याने दोरखंडाने बाहेर काढणे, आव्हानात्मक बनले आहे. यामुळे जेसीबी बोलावण्यात आला असून जेसीबीच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतका मोठा खड्डा शहरात यापूर्वी कोठेही पडला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक काही सामान घेऊन समाधान चौकात आला होता. ट्रक मागे घेत असताना पेव्हर ब्लॉक खचून ४० ते ५० फूट खोल खड्ड्यात हा ट्रक कोसळला. जिथे दुरुस्तीचं काम सुरू होतं. ट्रक जेव्हा तिथे आला त्यावेळी तेथील पेव्हर ब्लॉक खचले आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गाडला गेला. ट्रक मागे घेत असताना ४० ते ५० फूट खाली खड्ड्यात पडल्याने व पाहता पाहता संपूर्ण गाडला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव बचावला. या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे दृश्य तेथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात ज्या ठिकाणी हा खड्डा पडला त्याच्या खाली मोठा नाला असल्याने ट्रक थेट नाल्यात गेला.
0 टिप्पण्या