बदलापूर येथील आदर्श विद्यामंदीर शाळेतील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकावर १० तास रेल रोको करण्यात आले होते. तेव्हा संतप्त जमावाने त्याला तातडीने फाशी देण्याची मागणी देखील केली होती. मात्र आता या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याची घटना समोर आली आहे. अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीतून स्वत: वर गोळी झाडली. अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जाताना त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अक्षय शिंदेवर
बदलापूर येथील शाळेत केलेल्या अत्याचाराशिवाय अन्य दोन बलात्काराचे गुन्हे होते. याबाबत कोर्टातून त्याची पोलिसांनी कस्टडी मिळवली होती. त्याला तुरुंगातून पुन्हा पोलीस कस्टडीत नेत असताना हा प्रकार घडला. बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर चौकशीत अक्षय शिंदे बाबत अन्य दोन बलात्काराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यासंदर्भात अक्षयवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एका खटल्यात कोर्टाने आज (सोमवार) त्याला पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर पोलिसांची एक टीम त्याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात आली होती. तुरुगांतून चौकशीसाठी अक्षय शिंदेला घेऊन जात असताना त्याने शेजारी बसलेल्या अधिकाऱ्याची पिस्तुल हिसकावली आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. या घटनेत आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. पोलीस अधिकारी निलेश मोरे यांना गोळी लागली असून ते जखमी आहेत. अक्षय शिंदेने निलेश मोरे यांचीच बंदूक खेचली होती. मुंब्रा बायपासजवळ हा सगळा प्रकार घडला.बदलापूर घटनेतील अत्याचारग्रस्त मुलीच्या व तिच्या परिवाराच्या बाजूने वकीलपत्र दाखल केल्यापासून मी एक वेगळाच दबाव बघतोय. आरोपीला जेलमधून थेट न्यायालयात नेणे आवश्यक असतांना त्याला बदलापूर पोलीस स्टेशनला का नेण्यात आले?, पोलिसांची बंदूक साधरणतः लॉक असते ती आरोपीने कशी वापरली?, कारण, आरोपी अक्षय शिंदे यांने पोलिसांची बंदूक हिसकावल्यानंतर त्याचा लॉक तोडून पोलिसांवर फायरींग केली का,'' अॅड असीम सरोदे
बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदे याला तपासासाठी नेलं जात होतं. त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्याने चौकशासाठी नेलं जात होतं. यादरम्यान त्याने पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार केला. त्यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अन्य पोलीसही जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला अशी प्राथमिक माहिती आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल, मुलीवर अत्याचार केल्यानंतर विरोधक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत होते. पण आता माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्याची बाजू घेत असतील तर ते दुर्दैवी आहे. हे निंदाजनक असून, निषेध करावा तितका थोडा आहे. विरोधी पक्षाला जे हवं ते बोलण्याचा अधिकार आहे.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .
एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आहे. पोलिस आणि राज्याच्या गृहखात्यात नक्की चाललंय तरी काय? बदलापूर प्रकरणात याआधीच पोलिसांवर प्रकरण दडपण्याचे, गुन्हा नोंदवण्यास उशीर करण्याचे गंभीर आरोप झालेले आहेत. या प्रकरणातील शाळेचे संस्थापक तुषार आपटे यांचे भाजपाशी संबंध असून तो अजूनही फरार आहे. त्याला अजून पोलीस का पकडू शकले नाहीत? आरोपीच्या आईने आणि भावाने दिलेले जवाब कसं दुर्लक्षित करता येतील?त्यामुळे जागच्या जागी हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी आणि या प्रकरणाचे धागे दोरे ज्यांच्या दिशेने जात आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी तर अक्षय शिंदेची हत्या करण्यात आलेली नाही ना? याची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा तीन तेरा वाजलेत, पण राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे सत्ताकारणात व्यग्र आहेत. खरं तर या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. - खासदार वर्षा गायकवाड
हे एन्काऊंटर आहे. हैदराबाद प्रकरणातील आरोपींचे अशाच प्रकारे एन्काऊंटर झाले होते. खरंच ते आरोपी होते का? हे पाहिले नाही आणि फाईलच बंद करण्यात आली. आता अक्षय शिंदेच्या बाबतीतही तेच झालाय. स्वसंरक्षणाचा बनाव म्हणत एन्काऊंटर केला गेलाय. अक्षय शिंदेचा आवाज बंद करुन कोणाला वाचवलं जातंय? जर अक्षय शिंदे जर हिंस्र होता, त्याने 2 राऊंड फायर केले असं म्हणतायत, तो इतका तरबेज होता तर तशी व्यवस्था का नव्हती? आपण कसाबवर देखील खटला चालवला होता. पहिल्या दिवसांपासून पोलिसांची भूमिका संशयास्पद राहिली आहे. अक्षय शिंदेचा आवाज बंद करुन कोणाला फायदा? आपल्याकडे गुन्हेगाराला बाजू मांडायला मिळते. जे कोणी पोलीस ड्युटीवर होते, ते तात्काळ निलंबित झाले पाहिजेच. ज्यांनी ड्युटी लावली त्यांची चौकशी केली पाहिजे - सुषमा अंधारे
अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?, अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली?, आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का?, त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे, बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदेसोबत अजून कोण आरोपी होतं, या गोष्टीच्या तळापर्यंत जाणं गरजेचं होतं. सत्य बाहेर येऊन खऱ्या दोषीला शिक्षा व्हायला हवी होती. आता त्याचा एन्काऊंटर झाल्यामुळे हे कधीही समोर येणार नाही. आरोपीला मारण्यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे हे तपासलं पाहिजे. हे एन्काऊंटर बोगस असून या प्रकरणातील इतर आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी हे घृणास्पद कृत्य केले. राज्याचे गृहमंत्र्यांनी कुणाला वाचवण्यासाठी पोलिसांना हे आदेश दिले. इतर कोणत्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याचा आवाज बंद केला .आज जी गोष्ट झाली त्यावरून राज्यातमध्ये काही कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न पडतोय. अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर या प्रकरणात कोण संस्थाचालक आणि आरोपी होते हे कधीही बाहेर येणार नाही. बदलापूर प्रकरणी राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीमध्ये या घटनेची सखोल चौकशी करण्याऐवजी आरोपीला मारून टाकले जाते. गृहमंत्र्यांचे काही वचक आहे की नाही? गृहमंत्र्यांना ताबडतोब काढून टाकलं पाहिजे, कधी नव्हे ती महाराष्ट्राची बदनामी होत आहे. या एन्काऊंटरमुळे पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभारलं जात आहे. राज्यातली पोलिस यंत्रणा इतकी कूचकामी झाली आहे का? काय चाललंय का महाराष्ट्रात? - पृथ्वीराज चव्हाण
0 टिप्पण्या