महाभ्रष्ट आणि अकार्यक्षम भाजपा-शिंदे सरकारमुळे गुन्हेगारी फोफावून निष्पाप लोकांचे बळी जातच आहेत पण या सरकारच्या दुर्लक्षामुळे आणखी एक मृत्यूचा सापळा यांनी रचला आहे. भ्रष्ट भाजपा-शिंदे सरकार व बीएमसीच्या दुर्लक्षामुळे एका मुंबईकराला आपला जीव गमवावा लागला आहे. ४५ वर्षीय विमला गायकवाड या महिलेचा रात्री उघड्या मॅनहोलमध्ये पडून झालेला मृत्यू हा अपघात नाही तर शांत डोक्याने घडवून आणलेली हत्या आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ‘मी काम करणारा मुख्यमंत्री आहे’, असे एकनाथ शिंदे सातत्याने सांगत असतात, त्यासाठी सरकारी पैशातून जाहिरातबाजी करून स्वतःची पाठ थोपटून घेतात पण त्यांचे सर्व दावे पोकळ असून सत्य लपून राहत नाही हेच विमला गायकवाड यांच्या घटनेने स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांना घडल्या घटनांचा हिशोब हवा आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बीएमसीने तो हिशोब तात्काळ द्यावा, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
याप्रकरणी भाजपा-शिंदे सरकार व बीएमसीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्सूनपूर्व कामांची पाहणी करण्याची फक्त इव्हेंटबाजी केली, चमकोगिरी करण्यातच मुख्यमंत्री शिंदे यांना फार रस आहे. मुख्यमंत्री खरेच तेवढे कार्यतत्पर आहेत का? तसे असेल तर मग विमला गायकवाड यांना जीव का गमवावा लागला? मॅनहोल उघडे का ठेवण्यात आले होते? त्याठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा सूचना फलक का बसवण्यात आले नव्हते? पावसाळ्यापूर्वी मॅनहोल का झाकले गेले नाहीत? असे प्रश्न विचारत एका मुंबईकराने आपला नाहक जीव गमावला, या घटनेला भाजपा-शिंदे सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त आणि जे प्रशासकीय अधिकारी या दुर्घटनेला जबाबदार आहेत, त्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. यावर्षी जेव्हा-जेव्हा मुसळधार पाऊस कोसळला, तेव्हा-तेव्हा मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, मुंबई ठप्प झाली आहे. मुंबईत ७५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला की त्या प्रत्येक वेळेस मुंबईकरांना त्रास सहन का करावा लागतो? नालेसफाई आणि पावसाळ्यापूर्वीच्या इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचे काँग्रेसने छातीठोकपणे सांगितले पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता मात्र याचे स्वतंत्र ऑडिट करा आणि या तथाकथित कामांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
मुंबईत काल (२५ सप्टेंबर) संध्याकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातील विविध भागांत प्रचंड पाणी साचले होते. यामुळे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ मॅनहोलमध्ये पडून विमल गायकवाड ( वय ४५) या महिलेने जीव गमावला. सीप्झजवळ मेट्रो लाईन-3चे काम सुरू असून तेथील एक मॅनहोलचे झाकण उघडे होते. चालता चालता ती महिला त्या मॅनहोलजवळ पोहोचली, मुसळधार पावसामुळे ते झाकण उघडे असल्याचा तिला अंदाज नव्हता. अचानक ती खाली पडली आणि वाहून गेली. रात्री विमल या काम संपवून रात्री नऊ-साडेनऊच्या सुमारास घरी परत जात होत्या. त्या सिप्झ कंपनीच्या परिसरात पोहोचल्या, रास्ता क्रॉस करत होत्या. तेथेच मेट्रोच्या कामासाठी खड्डा खणण्यात आला होता, मात्र त्यावर कोणतेही झाकण टाकलेलं नव्हतं. क्रॉस करताना विमल यांना त्या खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि त्या धाडकन खाली कोसळल्या. तेथून त्या शंभर ते दीडशे मीटर दूरपर्यंत वाहून गेल्या. महिला खड्ड्यात कोसळल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान तसेच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या शोधार्थ शोधमोहिमही सुरू करण्यात आली. तब्बल एक-दीड तास तिचा शोध सुरू होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला शोधून बाहेर काढल, तिला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेट्रो 3 लाईनचे 5 तारखेला उद्घाटन होणार आहे. मात्र त्या पूर्वीच तेथे एका महिलेचा बळी गेला आहे. या घटनेमुळे नागरिक संतापले असून संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
0 टिप्पण्या