भारतीय सणांची विविधता लक्षात घेऊन आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून विविध प्रकारची मिठाई बनवून ग्राहकांची चवीची उत्कटता सांभाळत महाराष्ट्रात एक ब्रॅन्ड तयार झाला जो आज सर्वाधिक लोकप्रिय आहे तो म्हणजे प्रशांत काॅर्नर.ठाण्यातील सुप्रसिध्द मिठाई व इतर खाद्यपदार्थाचे दालन आणि त्याचे सर्वेसर्वा प्रशांत सकपाळ यांची मुलाखत ब्रह्मांड कट्टयावर आयोजित करण्यात आली होती. रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमास विविध स्तरावरील दर्जेदार व मान्यवर प्रेक्षक उपस्थित होते आणि सुसंवादक होते विश्वास दामले.
अत्यंत गरीब परिस्थितीत लहानपणापासून मनाशी ठरवलेले ध्येय आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेले अपार कष्ट, मेहनत याची फलश्रुती म्हणजेच *प्रशांत काॅर्नर* निवडणुक लढवण्यासाठी तिकीट मिळत असताना सहज नाकारून फक्त उद्योजक होणार असे म्हणत कोणताही पाठिंबा किंवा अनुभव नसताना एक छोट दुकान थाटून उद्योगाची सुरवात त्यांनी केली. आपल्या स्वप्ना बाबत सांगताना ते म्हणाले की ते आठ वर्षांचे असल्या पासून एका वाण्याच्या दुकानात काम करत होते आणि तेंव्हाच त्यांनी ठरवले होते की मी पण एक दुकान काढणार.
या छोट्याशा दुकानातून त्यांनी सुरवातीला वडा पाव विकण्यास सुरुवात केली नंतर घरोघरी दुध देण्याचा उद्योग केला. त्या नंतर दोन किलो तयार मिठाई विकत आणून ग्राहकांना विकण्यास सुरुवात केली. कोणताही अनुभव किंवा पाठिंबा नसताना फक्त निरीक्षण व प्रामाणिक प्रयत्न यामुळेच ते आज यशस्वी मराठी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. पाचपाखाडी,ठाणे येथील दुकानापासून सुरुवात करून आज संपूर्ण ठाण्यात, मुंबई, नवी मुंबई येथे १७ दुकानांची साखळी तयार केली आणि आता लवकरच ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करणार आहेत
वेळोवेळी ग्राहकांकडून मिळवलेला विश्वास, मदत व पाठिंब्यामुळेच आज ते यशस्वी उद्योजक असल्याचे प्रशांत सकपाळ यांनी विश्वास दामले यांच्याबरोबर सुसंवाद साधताना म्हणाले. पदार्थांचा दर्जा हीच ग्राहकांची विश्वासार्हता असल्याचे सांगितले. आपलेच नाव दुकानाला देण्याबाबत ज्योतिषाने सांगितले म्हणून दुकानाचे नाव प्रशांत काॅर्नर असे त्यांनी सांगितले. नावा प्रमाणेच प्रशांत सकपाळ हे स्वभावाने देखील शांत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. वेगवेगळ्या सामाजिक संस्थाना मदत करीत असतात. ब्रह्मांड कट्ट्याला देखील आर्थिक मदत केली.
प्रशांत सकपाळ यांचे लहानपणापासून उद्योग उभारणीचे स्वप्न होतेच तर त्यांचे ते ध्येय होते अपार मेहनत करून त्यांच्या ध्येयापर्यंत ते पोहचले नावारूपास आले यशस्वी मराठी उद्योजक झाले. नविन मराठी उद्योजकांना किंबहुना सगळ्यांनाच सल्ला देताना म्हणाले आपण ध्येय ठरविण्यात कमी पडतो. ध्येय ठरवा मेहनत करा आणि यशस्वी व्हा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशांत सकपाळ व विश्वास दामले यांचे स्वागत संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी केले. महेश जोशी यांनी परिचय करुन दिला तर आभार प्रदर्शन राजेश जाधव यांनी केले.
ब्रह्मांड कट्टयावरील प्रेक्षकांना प्रशांत काॅर्नर फॅक्टरी भेटीचे आमंत्रण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. तसेच रसिक प्रेक्षकांना प्रशांत काॅर्नर ची शेवपुरी व गुलाब जाम ची मेजवानी देण्यात आली.
0 टिप्पण्या