Top Post Ad

फुले दांपत्याचे समाजाप्रती योगदान बघता त्यांना भारतरत्न मिळावा - उपमुख्यमंत्री अजित पवार


नाशिक येथील  सावित्रीमाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकातील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. मागील दोन दिवसापासून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालय, मुंबई येथे उपचार सुरू आहे. मात्र आज त्यांच्या संकल्पनेतून  उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ते विशेष विमानाने येऊन उपस्थित राहीले. तसेच कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचार घेण्यासाठी ते रवाना झाले.

  या सोहळ्यास माजी मंत्री महादेव जानकार, खासदार राजाभाऊ वाजे, आ. प्रा.देवायानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढीकले,आ. सरोज आहीरे,आ. दिलीप बनकर,आ. नितीन पवार,माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार वसंत गिते, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार,भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव,समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस समाधान जेजुरकर, लक्ष्मण सावजी, डॉ.शेफाली भुजबळ, अंबादास खैरे, मनपा आयुक्त डॉ.अशोक करंजकर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर व विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

फुले दांपत्याचे कार्य हे सोन्यालाही फिके पडणारे आहे. त्यांच्या आदर्शावर चालणे हे आपले सर्वांचे काम आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अर्धाकृती पुतळा हा महाराष्ट्रात नव्हे तर भारतातील सर्वात मोठा पुतळा आहे. फुले दाम्पत्य हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी वंदनीय होते. त्यांच्या कार्याची उंची फुटपट्टीत मोजता येणार नाही. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांना गुरु मानत. नुसते रस्ते व पूल बांधले म्हणजे विकास होत नाही त्याकरिता सामाजिक भान दाखवायचे असते आणि ते आपले सरकार दाखवत आहे. आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. महात्मा फुले यांच्या स्वप्नाप्रमाणे सर्वसामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आपले सरकार करत आहे. या शिल्पावरून ना. भुजबळ यांची कल्पकता दिसून येते. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महात्मा फुले यांनी 1880 सालात शिवरायांची समाधी शोधून त्यावर फुले वाहिली. त्यांनीच शिवजयंती सुरु करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला त्यावेळी 27 रुपये लोकवर्गणी जमा झाली होती त्यातील 3 रुपये स्वतः फुले यांनी दिले. फुले दांपत्याचे समाजाप्रती योगदान बघता त्यांना भारतरत्न मिळावा हि सर्वसामान्यांची भावना आहे. - उपमुख्यमंत्री अजित पवार 

महात्मा फुले यांनी सतत प्रवाहाच्या विरोधात जाऊन दीनदुबळ्यांसाठी कल्याणकारक कार्य केले त्यामुळे आज आपल्याला परिवर्तन बघायला मिळाले आहे. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महात्मा फुले व सावित्रीबाई यांना जिवंतपणी अनेक समाजाकडून अडथळे निर्माण करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर देखील त्यांच्या विचारांवर हल्ला करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यांचे अभेद विचार कायम राहिले आहे. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावर उभारलेले हे पुतळे अतिशय मजबूत असून ते अभेद्य राहतील. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक शहरात 1931 साली गणेशवाडीत अर्धाकृती पुतळा बसविला आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विशेष कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहचवून ते रुजविण्यासाठी आपल्या संकल्पनेतून मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले चौकात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच भव्य दिव्य स्मारक उभारण्यात आले आहे.  ना.छगन भुजबळ 

  • असे आहे स्मारकातील शिल्प –
  • महात्मा फुले 18 फूट, सावित्रीबाई फुले 16.50 फूट
  • दोन्ही पुतळ्याची रुंदी प्रत्येकी – 14 फूट
  • महात्मा फुले पुतळा 8 वजन टन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा वजन 7 टन
  • धातू – ब्रॉन्झ धातू
  • पुतळ्याची निर्मिती – प्रसिद्ध मूर्तिकार बाळकृष्ण पांचाळ
  • कुडाळ, रत्नागिरी, कोकण येथे निर्मिती
  • पुतळे बनविण्याचा कालावधी – 11 महिने
  • पुतळ्यांचा खर्च – 4 कोटी 68 लक्ष
  • हा पुतळा अतिशय भक्कम होण्यासाठी 8 फुट काँक्रीटचा चौथरा उभा करून त्याला ग्रेनाईट लावण्यात आले आहे. तसेच 30 ते 40 फूट पाईल फाऊंडेशन करण्यात आले आहे.

 मुंबई नाका येथील सावित्रीबाई फुले स्मारक उभे करण्याची अनेक वर्षांची महात्मा फुले समता परिषदेची मागणी होती. त्यासाठी समता परिषदेच्या वतीने नाशिक मनपा प्रशासनाकडे वेळीवेळी पाठपुरावा केला. नाशिक महानगरपालिकेकडे संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर अनेक अडचणीचा सामना केल्यानंतर नाशिक शहरातील महापुरुषांचे पुतळे उभे करण्याबाबत नाशिक महानगरपालिकेकडून अर्थसंकल्पात या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली. मुंबई नाका  येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या मंजूरीनंतर मुंबई नाका परिसरात वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही या दृष्टीने प्रकल्पाचे संकल्पचित्र बनविण्यात आले. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयात मनपा आयुक्तासमवेत वेळोवेळी बैठका होऊन या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. मुंबई नाका येथील वाहतूक बेटामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत असल्याने सुमारे ३३६६ मीटर आकाराचे हे बेट कमी करण्यात येऊन २७१० मीटरवर आणण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक द्वारकाकडे जाण्यासाठी सरळ मार्गिका तयार करण्यात आली. तसेच याठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण न होता वाहतूक सुरळीत रित्या होऊन येथील ट्राफिकचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या स्मारकासाठी संकल्प चित्र तयार करण्यात आल्यानंतर पुतळे उभे किंवा अर्धाकृती करण्यात यावेत यावर विचार विनिमय करण्यात आला. आजवर विविध ठिकाणी उभे पुतळे निर्माण केले गेले आहे. ते अतिशय उंच असल्याने त्याची निगा देखील राखणे कठीण होते. त्यामुळे हे पुतळे अतिशय बोलके वाटावे त्याची व्यवस्थित निगा राखली जावी यादृष्टीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वाधिक उंचीचे अर्धाकृती पुतळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुतळ्यांचे काम कुडाळ येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार बाळाकृष्ण पांचाळ यांच्याकडून अर्धाकृती ब्राँझ धातूचे शिल्प तयार करण्यात आले. या पुतळयांसाठी भव्य असा चौथरा उभा करण्यासाठी राजस्थान येथून ग्रेनाईट मार्बलचा वापर करण्यात येऊन राजस्थानी कारागिरानी ही वास्तु घडवली. ही वास्तु साकार करण्यासाठी आर्किटेक्ट शाम लोंढे यांनी सल्लागार म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. या स्मारकाचे काम होत असतांना मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांनी वेळोवेळी पाहणी करत हे काम अतिशय दर्जेदार तसेच ऐतिहासिक कसे होईल याबाबत वेळोवेळी आढावा घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com