महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 'आधारस्तंभ ' पुरस्काराने रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील साने गुरुजी स्मारक वडघर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रा प्रवीण देशमुख यांना ज्येष्ठ कवयित्री निरजा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक राजीव तांबे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र ट्रस्टचे विश्वस्त सचिव दीपक गिरमे, सदस्य गणेश चिंचोले, अरविंद पाखले, राज्यकारिणी आणि सदस्या ॲड मुक्ता दाभोलकर, मिलिंद देशमुख, रायगड जिल्हा अध्यक्ष भाऊ सावंत आदि मान्यवर आवर्जून उपस्थित होते.या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या २०० पेक्षा जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली.
प्रा प्रवीण देशमुख यांनी हा पुरस्कार त्यांच्या पत्नी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कृतिशील कार्यकर्त्या सुरेखा देशमुख यांच्या सह स्वीकारला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक श्री राहुल थोरात यांनी प्रा प्रवीण देशमुख आणि कुटुंबीयांच्या श्रम वेळ आणि पैसा या तिन्हीच्या योगदानाबद्दल गौरवास्पद माहिती उपस्थितांना दिली. त्यामध्ये प्राध्यापक देशमुख यांच्या निवृत्ती निमित्त, वाढदिवसानिमित्त आणि मुलाच्या सत्यशोधकी विवाहाच्या निमित्ताने प्रत्येक वेळी एक लाख रुपयाचा धनादेश महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिल्याचा आवर्जून उल्लेख केला. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता मागील दोन वर्षात देशमुख कुटुंबियांनी एकंदरीत तीन लाखाची देणगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जात, धर्म, लिंग,भाषा या आणि अशा कुठल्याच भेदभावांना थारा न देता काम करते आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांची कट्टर पुरस्कर्ती आहे. प्रा प्रवीण देशमुख यांच्या कुटुंबातील सर्वांचे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह आहेत त्यामुळे अशा विवाहांना आणखी कृतिशील पणे प्रोत्साहीत करण्याकरता या निधीचा वापर करावा अशी अपेक्षा प्रा प्रवीण देशमुख आणि कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली. प्रा प्रविण देशमुख यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत त्यांच्याशी संबंधित असलेल्या सर्वच संस्था - संघटनांच्या आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या पुरोगामी चळवळीचे काम शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही करत राहू अशा भावना प्रा प्रवीण देशमुख यांनी यावेळी व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या