बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार-२०२४’ या स्पर्धेत सातबंगला, अंधेरी (पश्चिम) येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम पुरस्कार (रुपये ७५,००० आणि सन्मानचिन्ह) पटकावला असून; करीरोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार (रुपये ५०,००० आणि सन्मानचिन्ह) आणि मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाने तृतीय पुरस्कारावर (रुपये ३५,००० आणि सन्मानचिन्ह) आपली मोहोर उमटवली आहे. यंदा शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट श्रीगणेशमूर्तीचा पुरस्कार काजूवाडी (अंधेरी) येथील श्री गणेश क्रीडा मंडळास, तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक श्री. पंकज मेस्त्री यांना भांडूप येथील साईविहार विकास मंडळाच्या श्रीगणेश मूर्तीसाठी, तसेच सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक शिवाजी पार्क येथील शिवाजी पार्क हाऊस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सजावटीसाठी श्री. सुमित पाटील यांना जाहीर करण्यात आले आहे. याव्यतीरिक्त अवयवदान जागृतीसाठी गिरगावातील धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास, तर पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी काळाचौकी परिसरातील रंगारी बंदक रहिवाशी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळास आणि माझगांव येथील ताराबाग मंडळास देखील पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय, १० मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रकेही जाहीर करण्यात आली आहेत. आज १३ सप्टेंबर रोजी महानगरपालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्व्यक प्रशांत सपकाळे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्याच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव सोहळा मुंबई महानगरीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा तसेच जनहितविषयक संदेश नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दरवर्षी श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा या स्पर्धेचे ३५ वे वर्ष असून या स्पर्धेत ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेरींमध्ये ही स्पर्धा पार पडली. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, पर्यावरणपूरक मूर्ती, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये, परिसर स्वच्छता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये – कार्यांमध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरण पूरकता, जनहित संदेशांचा वापर आदी बाबींचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. या पुरस्कारांसाठीची दि. १० आणि ११ सप्टेंबर २०२४ रोजी प्राथमिक, तर दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी अंतिम फेरीदरम्यान परीक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व १७ गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन अंतिम निकाल महानगरपालिकेच्या स्वाधीन केले. उप आयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांनी या स्पर्धेचा निकाल आज जाहीर केला.
- *‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२४’ चा सविस्तर निकाल*
- १. प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) स्वप्नाक्षय मित्र मंडळ, सातबंगला, अंधेरी (पश्चिम)
- २. द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, बावला मस्जिद, करीरोड (पश्चिम)
- ३. तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) युवक उत्कर्ष मंडळ, गेट नंबर ०६, मालवणी, मालाड (पश्चिम)
- ४. सर्वोत्कृष्ट मूर्तीकार (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) श्री. पंकज मेस्त्री यांना साईविहार विकास मंडळ, भांडूप पश्चिम येथील मूर्तीसाठी
- ५. सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (सजावटकार) (रु.२०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) श्री. सुमित पाटील यांना शिवाजी पार्क हाऊस गणेश मंडळ, दादर (पश्चिम) येथील सजावटीसाठी
- ६. उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)
- ....१) नवतरुण मित्र मंडळ, कोकणी पाडा, गावदेवी नगर, दहिसर (पूर्व), मुंबई – ४०० ०६८
- .....२) बर्वेनगर व अखिल भटवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम),
- मुंबई – ४०० ०८४
- ७. प्लास्टिपक बंदी / थर्माकोल बंदी / पर्यावरण विषयक जनजागृती उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र)
- ......१. रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी, मुंबई
- .....२. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग, माझगाव, मुंबई
- ८. शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती पारितोषिक (रु.२५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) श्री गणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, अंधेरी (पूर्व)
- ९. सामाजिक कार्य / समाज कार्य / अवयवदान जागृतीः पारितोषिक (रु.१५,०००/-, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र) धसवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाकूरद्वार, गिरगाव, मुंबई
- *प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे*
- *समाज प्रबोधन*: १) विघ्नहर्ता रहिवाशी मित्र मंडळ, बोरिवली (पूर्व),
- २) शिवगर्जना तरूण मित्र मंडळ, अंधेरी (पूर्व),
- ३) साईदर्शन मित्र मंडळ, बोरिवली (पश्चिम)
- शाडूची सुबक मूर्ती : श्री. श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर पूर्व
- *सामाजिक जनजागृती :* गोकुळगनर सार्वजनिक मंडळ, दहिसर पूर्व
- *पर्यावरण तसेच घनकचरा व्यवस्थापन जनजागृती :* ज्ञानेश्वर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, दहिसर (पूर्व)
- *व्यसनमुक्ती प्रबोधन :* अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, सिद्धीगणेश, घाटकोपर (पश्चिम)
- *मराठी भाषा प्रबोधन :* हनुमान सेवा मंडळ, धारावी
- *रस्ते आणि अपघात जनजागृती :* बालमित्र कला मंडळ, विक्रोळी (पश्चिम)
- *मतदानविषयक जनजागृती (लहान मुलांची सजावट ) :* इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धाराशिव मंदिर, धारावी
श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धेची माहिती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांपर्यंत पोहोचावी व सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, यासाठी महानगरपालिका संकेतस्थळ, समाजमाध्यमे इत्यादींद्वारे देखील माहिती प्रसारित करण्यात येते. तसेच महानगरपालिकेच्या श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिकेतही या स्पर्धेवावत माहिती आणि प्रवेश अर्ज देण्यात येतो. श्रीगणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित विविध बैठकांमध्ये देखील या स्पर्धेची माहिती देण्यात येते. या बैठकांना सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांच्या समन्वय संस्थांची उपस्थिती असते. यंदाच्या स्पर्धेत बृहन्मुंबईतील ५५ सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला आहे. या मंडळांच्या प्राप्त अर्जाची शहर विभाग, पूर्व उपनगरे विभाग आणि पश्चिम उपनगरे अशा तीन ३ गटांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटासाठी तीन मान्यवर परीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. मान्यवर परीक्षकांनी दिलेल्या गुणांकानुसार प्राथमिक फेरीनंतर पुढच्या आणि अंतिम फेरीत १७ मंडळे पोहोचली होती. त्यातून पुरस्कारप्राप्त मंडळांची निवड करण्यात आली.
या निर्धारित गुणांकन पद्धतीमध्ये सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाने देखाव्यासाठी निवडलेला विषय, पर्यावरणक मूर्ती, विषयाची मांडणी, मंडळाने केलेली सामाजिक व विधायक कार्ये, परिसर स्वच्छता, बृहन्मुंबई. महानगरपालिकेच्या विविध मोहिमांमध्ये कार्यामध्ये नोंदविलेला सहभाग, पर्यावरण पूरकता, जनहित संदेशांचा वापर इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात. दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळपासून ते दि. १३ सप्टेंबर २०२४ रोजी पहाटेपर्यंत आयोजित अंतिम फेरीदरम्यान परीक्षक मंडळाने अंतिम फेरीतील सर्व १७ गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यानंतर श्रीगणेश गौरव स्पर्धेचा अंतिम निकाल बंद पाकिटात व स्वाक्षरीसह महानगरपालिका प्रशासनाकडे सादर केला. या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्रा. नितीन केणी, पाटकर महाविद्यालयाचे प्रा. श्री. आनंद पेठे, जे. के. अॅकेडमी ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईनचे प्रा. नितीन किटुकले, ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे, बृहन्मुंबई गणेश मर्तीकार संघाचे सदस्य श्री. वैभव वायंगणकर, श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचे प्रतिनिधी भूषण वाईरकर, अखिल भारतीय श्रीगणेशोत्सव महासंघाचे प्रवीण आवारी, बृहन्मुंबई वक्रतुंड श्रीगणेश मूर्तिकार संघाचे सदस्य परेश कारेकर, आणि महानगरपालिकेचे कलाशिक्षक भूषण उदगीरकर अशा ९ तज्डा परीक्षकांनी परिक्षणाचे कामकाज पाहिले.
- प्रथम पारितोषिक (रु.75,000/-)
- द्वितीय पारितोषिक (रु. 50,000/-)
- तिसरे पारितोषिक (रु. 35,000/-)
- याशिवाय
- सर्वोत्कृष्ट मूर्ती (रु.२५,०००/-)
- सर्वोत्कृष्ट नेपथ्य (रु. २०,०००/-)
- दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)
- शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती - पारितोषिके (रु.२५,०००/-)
- प्लास्टिक बंदी | थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिके (प्रत्येकी रुपये १०,०००/-)
- अवयवदान / आरोग्य जागृतीः पारितोषिक रु. १५,०००/-
0 टिप्पण्या