पा_रंजीत दिग्दर्शित आणि अभिनेता चियान विक्रम यांच्या सुरेख अभिनयाने नटलेला हा सिनेमा इतिहासाच्या खोलात जाऊन सत्य बाहेर काढणारा ठरलेला आहे. भारताचा इतिहास हा सिंधू संस्कृतीचा सभ्यतेमध्ये दडलेला आहे. ही सिंधू संस्कृती नंतर नाग लोकांची संस्कृती बनलेली होती. या नाग लोकांचा देश म्हणजे भारत देश आहे आणि या भारताला बुद्धाच्या विचारांचा खजिना लाभलेला आहे. नाग लोकांच्या या देशांमध्ये सिंधू संस्कृती पासून ते तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्धा पर्यंत 27 बुद्ध होऊन गेले आणि या परंपरेतील शेवटचे 28 वें बुद्ध म्हणजे सिद्धार्थ तथागत गौतम बुद्ध आहेत. यांच्या विचारांचा भारताच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर प्रभाव पडलेला आहे. या बुद्धाच्या विचारांचा वारसा जपणारे, त्याला संरक्षित करणारे त्या काळात स्त्रिया होत्या. या स्त्रियांना नागणिका म्हणत असत. बुद्धांना नाग लोकांनी जिवंत ठेवलेला आहे. या भारत देशाचे मूळ मालक नागवंशीय लोक आहेत.
पा. रणजीत दिग्दर्शित थंगलान चित्रपट हा भगवान बुद्धाच्या विचारांना मानणाऱ्या आणि त्या बुद्धाच्या विचारांचा संरक्षण करणाऱ्या नागनिकाचा प्रभाव कसा होता हा या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. ही नागणिका बुद्धाचं कसं संरक्षण करते हे या चित्रपटात आवर्जून प्रमुख रूपात दाखवण्यात आलेला आहे. ब्राह्मण पुरोहित भगवान बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी त्या काळातील क्षत्रिय समजल्या जाणाऱ्या लोकांचा वापर करून बुद्धाच्या विचारांना नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे या चित्रपटात स्पष्ट दाखवण्यात आलेला आहे. याचाच अर्थ बुद्धाची विचारधारा नष्ट करण्यासाठी ब्राह्मणी विचारधारा काम करत आहे आणि या दोघांमध्ये लढाई चालू आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य आणि इतिहास आपल्याला आठवला पाहिजे. सोन्याचा खजिना शोधण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच बुद्धांच्या विचारांचा खजिना आहे. सोन म्हणजेच बुद्धांचे विचार जतन करण्यासाठी नागणिका कशा पद्धतीने ते वाचविण्यासाठी प्रयत्न करते हे यातून दाखविण्यात आलेले आहे.
भारताच्या इतिहासात स्त्रिया ह्या रक्षण करणाऱ्या महानायिका आहेत. म्हणूनच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये महाकाली, तुळजाभवानी, जगदंबा, अशा विविध देव्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या सर्व भारताच्या रक्षण करणाऱ्या महानाईका त्या काळातल्या महाराण्या होत्या. परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामगिरीत अडकल्यानंतर आणि ब्राह्मणांच्या हातात इथली व्यवस्था आल्यानंतर स्त्रियांना गुलाम आणि दास बनवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. ग्रंथ आणि पुराणाच्या माध्यमातून स्त्रियांना गुलाम बनवण्यात आलं आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास,लढवय्या इतिहास गडप करण्यात आला. Thangalan हा चित्रपट पाहायचा आणि समजून घ्यायचा असेल तर भारताचा सिंधू संस्कृती पासून ते तथागत भगवान बुद्ध सम्राट चक्रवर्ती अशोक यांच्या पर्यंतचा आणि आजपर्यंतचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावा लागेल तेव्हाच हा चित्रपट आपल्याला समजू शकतो. महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित न होण्याचं काय कारण असू शकतं हे या इतिहासावरून समजू शकतात. कारण महाराष्ट्रात आज ब्राह्मणी व्यवस्थेचे स्तोम माजलेले आहे आणि त्यामुळे हा चित्रपट इथे पाहू दिल्या जाणार नाही हे पा.रंजीतला चांगले समजले असावे.
- संजय वैराळ
- -----------------------------------
थंगलान’ तृष्णेवर मिळवलेला सम्यक विजय
तंगलानमधली रुपके तथ्यापेक्षा सत्याच्या शोधात आहेत. धर्मांतरासाठी किंबहुना पुन्हा बुद्धाकडे जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरची भूमी निवडण्यामागे असलेलं कारण ही ‘रंजित पा’ च्या तंगलानची ‘वनलायनर’ आहे. नागपूर ही ही नाग संस्कृती आणि नागवंशियांची मूळ भूमी असल्यानं पुन्हा करुणामय बुद्धाच्या कुशीत जाण्यासाठी ही भूमी निवडली असल्याचं बाबासाहेबांनी धर्मांतरातील भाषणात स्पष्ट केलं होतं. हे सत्य बुद्धाच्या आधीपासूनच ते अलिकडच्या तीनशे वर्षांपर्यंतचं आहे. हे तथ्य आणि सत्य तंगलानच्या पडद्यावर वेळेवेळी ‘मेटाफर’ म्हणून समोर येतं, कल्पना आणि तथ्य आणि त्यातून पुढे जाणारं ‘ संपूर्ण सत्य’ या तीनही कसोटीवर तंगलान त्यामुळेच पुरेपूर उतरला आहे. चित्रपटातला काळ नागवंशिंयाच्या इतिहासाचा आहे. हा इतिहास दडवण्यामागे असलेलं कारस्थान तंगलानने पडद्यावर उघड केलंय, म्हणूनच तंगलानचं कथानक कोलार सुुवर्णखाणींपुरतंच मर्यादीत नाही, बुद्धमूर्तीच्या पायाखाली असलेल्या खाणीतलं सोनं हे बुद्ध शिकवणी आणि धम्माचं ‘मेटाफर’ अर्थात रुपक आहे. संपूर्ण पडद्यावर नागवंशीयांच्या कथा संकल्पनांचे संदर्भ रुपके म्हणून रंजितनं खुबीने उपयोगात आणलेले आहेत.
ज्यांना बुद्धांची शिकवण, आंबेडकरी चळवळ आणि धम्माच्या तत्वज्ञानाची इतिहासाची बर्यापैकी जाण असेल त्यांना थंगलानमधले संदर्भ पुरते लक्षात येतील. केवळ ‘साऊथी’ एन्टरटेन्मेंटच्या अपेक्षेने थिएटरमध्ये जाणार्यांनी तंगलानच्या वाटेला म्हणूनच जाऊ नये, तर त्यापलिकडे आजपर्यंतच्या भारतीय सिनेमांचं सौंदर्यशास्त्र निकालात काढणार्या आणि नव्याने कला, सादरीकरण, अभिनय, तंत्र, सादरीकरणाची ओढ असलेल्यांनी थंगलानसाठी वेळ काढायला हरकत नाही. थंगलनमध्ये आजपर्यंतच्या पडद्यावरचे नायक किंवा नायिका नाहीत, तर सांस्कृतिक स्पर्शाच्या आधीचे अनटच असे नैसर्गिक ‘नर’ आणि ‘मादी’ आहेत, चित्रपटात खलनायकही नाहीच, खलनायकाची जागा माणसातल्या आसक्तीनं घेतलेली आहे, निव्वळ काळ्या पांढर्याच्या पलिकडे ‘ग्रे’ शेडमध्ये असलेल्या मानवी जाणीवांची शेक्सपियरीन ट्रॅजेडीजपेक्षा कित्येक वर्षे जुनी पण हरेक काळात समकालीन ठरलेली ही माणसांच्या जगण्याच्या लढाईची प्राथमिक पायरी आहे. या खाणींचे रक्षणकर्ते इथल्या जमिनी हजारो वर्षांपासून कसणारे ‘नागसर्प’ हे नागवंशियच असावेत, त्यांच्या आपसातील युद्धे ही बुद्धांच्या संबोधीआधी शाक्य आणि कोलियांच्या संघर्षाची आठवण करून देतात.
चित्रपटात गुडघ्यावर झुकलेल्या हत्तीच्या आकाराचा सोन्याच्या खदानीचा डोंगर आहे. हा हत्ती तथागतांच्या असीम करुणेपुढे झुकलेला नलगिरीचं असावा, माणसाचे हे पिसाळलेपण आणि त्यानंतर त्याचे शांत सौम्य शीतल होत जाण्याचे रुपक थंगलनचे वैशिष्ठ्य आहे. बुद्ध शिकवणीतील हत्ती विधायक अर्थाने बल आणि सम्यक शक्तीचे प्रतिक मानले जात असल्याने बाबासाहेबांनी त्याची निवड राजकीय पक्षाचे चिन्ह म्हणून केली होती. तंगलानच्या पडद्यावर असाच दुसरा प्राणी सोन्याच्या खाणीचे रक्षण करणारा नागसर्प सातत्याने समोर येतो. या नागसर्पाचं विष नागवंशिय विक्रमच्या शरिरातही आहे, त्यामुळे त्याचा नागदंशामुळे मृत्यू होत नाही, थंगलानला दंश करणारा नाग आणि संबोधीप्राप्तीसाठी प्रयासरत ध्यानस्त बुद्धांवर वर्षाऋतूत आडोसा धरणारा मुचलिंद नाग हे एकाच कुळातील नागवंशातील आहेत. त्यामुळे हे दोन्ही परस्परांसाठी विषारी ठरत नाहीत, या दोहोंमधला परस्परसंबंध एकाच नाग इतिहास आणि लोकसंस्कृतीशी नाते सांगणारा असल्याचे दिग्दर्शक रंजित पा ने चित्रपटातील अनेक प्रसंगातून स्पष्ट केले आहे.
इथल्या जमिनीचे मालक असलेल्या कष्टकरी शेतकरी आदिवासी नागवंशियांना सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक गुलाम करण्यामागील कारणेही थंगलनमधून समोर येतात. या गुलामीच्या विरोधातच भीमा-कोरेगाव लढ्यात नागवंशिय आणि नंतरच्या काळात अस्पृश्य ठरवलेल्या जात समुहांनी या शोषणातून मुक्त होण्यासाठीच पुरोहितशाहीविरोधात इंग्रजांच्या बाजूने नाईलाजी युद्ध केले होते, हा अलिकडचा थेट ऐतिहासीक संदर्भ जसाच्या तसा तंगलानमध्ये बुद्ध धम्माच्या पाडावानंतरच्या काळात म्हणजेच भीमा कोरेगाव युद्धाच्या जवळपास १०० वर्षे आधी येतो. त्यामुळे केवळ तो काळ वगळल्यास हे रुपक न रहाता तो पुराव्याचा इतिहास ठरतो. त्यामुळेच यातील युद्धे माणूसपणाच्या हक्कासाठी नंतर अस्पृश्य आणि वर्णव्यवस्थेत खालच्या दिशेने ढकलेल्या समाजव्यवस्थेच्या उत्थानासाठीच लढली गेली असल्याचे स्पष्ट व्हावे. मात्र नायक तंगलानला (विक्रम) स्वत्वाची स्वयंप्रकाशित होण्याची जाणीव झाल्यावर तो इंग्रजांच्या विरोधात उभा ठाकतो, ही जाणीव त्याला करून देणारी ‘आरती’ ही मातृसत्ताक समाजरचनेचं प्रतिनिधीत्व करणारी आदिवासी नागवंशीय बुद्धांच्या शिकवणीच्या इतिहासाशी नाते सांगते.
चित्रपटातील नागवंशींच्यांच्या मदतीने बुद्धमूर्तीचा इंग्रजांकडून होणारा ध्वंस हा आरिष्टाची वर्दी देणारा ठरला आहे. हे अरिष्ठ्य दोन हजार वर्षानंतरही अजूनही जगावरून पुर्णपणे नाहीसं झालेलं नाही. पडद्यावर नागवंशीय तंगलानने युद्ध करून आपल्या टोळीसाठी मिळवलेलं सोनं मंगल उद्दीष्टासाठी उपयोगात आणलं नाही तर निश्चितच मातीमोल ठरणार हे आहे. हा थेट संदर्भ बाबासाहेबांच्या ‘जर ही राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती गेलीतर वाईट असली तरी चांगली ठरेल किंबहुना ती वाईट माणसांनी अमलात आणली तर संविधान कितीही उत्तम असले तरी त्याचा उपयोग होणार नाही’ या बुद्ध विचार शिकवणीशी जोडता येईल, तंगलानमध्ये बुद्धमूर्तिच्या पायाखाली असलेले सोने मिळवण्यासाठी होणारे युद्ध हे मेटाफर म्हणून थेट बुद्धांच्या शिकवणीशी थेट जोडलेले आहे. अग्नी दिव्याची ज्योत आणि सोने हे चमकणारे पिवळसर असते, म्हणजेच कमालीच्या रक्तपातानांतर विक्रमच्या हाती येणारे सोने हे त्याला स्वयंप्रकाशित होण्याची जाणीव झाल्यावर विधायक कार्यासाठी वापरले जाणार असल्याने ते अखेरीस मातीमोल होत नाही, हा सोन्याचा प्रकाश विक्रमच्या चित्तात परिवर्तन घडवून आणतो, त्याला स्वतःची सन्मानाने जगण्याची नैसर्गिक इच्छा असलेला माणूस म्हणून ओळख देतो, हे रूपक थेट ‘अत्त दिप भव’शी जोडता येईल, इतके परफेक्ट रंजित पा ने चित्रपटात अखेरीस बसवले आहे, हे कथा पटकथा आणि सादरीकरणातलं यश आहे.
थंगलानमध्ये नागवंशीयांमध्ये होणारी बैठक पिंपळ (बोधीवृक्षाच्या) झाडाखाली होते. हा थेट संवाद बुद्धप्रतिक म्हणूनच समोर येतो, तंगलानच्या टोळीतल्या महिलांच्या देहावर बोधीवृक्षाच्या पानांचे जाळीदार गोंदण आहे. थंगलानच्या मुलाचं नाव असोका असल्याचं स्पष्ट व्हावं, याच असोकाला बुद्धाच्या चरणाखाली असलेल्या सोन्याचा शोध लागतो. तर हाच असोका सम्राट अशोकासारखा रक्तापाताला नकार देऊन बाप थंगलानला त्याचे भेसूर परिणाम स्पष्ट करून सांगतो. तर चित्रपटातली मायावी शक्ती ही बुद्धांवर अतिक्रमण करणार्या ‘मारा’ चं प्रतिनिधीत्व करते, मात्र इथं ती सु-हेतूक आहे.
बुद्धाला सैतान ठरवून त्याची मूर्ति पर्यायाने बुद्धविचाराचा ध्वंस केलेला भटकलेला समुदाय रक्त, जखमा, वेदना, युद्ध, आरिष्ठ्य, संकटाच्या मार्गावर जातो, हे मिथक चित्रपटातल्या सर्वच प्रसंगात आहेच, हे सत्य अलिकडच्या तालिबानमधील बामियान बुद्धमूर्ति ध्वंसानंतर झालेल्या घटनांवरून स्पष्ट करता येईल. बुद्धविचार हा शंभर नंबरी सोन्याचा असल्यानं हे मेटाफर कोलार सुवर्णखाणींच्या कथा कोंदणात बसवून पा रंजितनं थंगलानमधून समोर आणलं आहे. या सोन्याच्या खदानीचं रक्षण करणार्या ‘आरती’ चं रक्त ज्या जमिनीवर सांडलं तिथपर्यंतची जमिन सोन्याची होते, हा प्रसंग केवळ कल्पनेचा विलास नसून ही कल्पना अनाथपिंडकाने सुवर्णमोहरा सांडून खरेदी करून भिक्कू संघाला दान दिलेल्या जमिनीची आठवण करून देते, या शिवाय श्रमिकांचं रक्त, घाम म्हणजेच श्रम चांगल्या उद्देशाने ज्या जमिनीवर सांडतात त्या ठिकाणी सोन्याचे पीक अर्थात शेतीसमृद्धी येते, ही कल्पना रंजितने थेट बुद्धविचारातून घेतलेली आहे. त्यामुळे थंगलान हा संपूर्ण सिनेमाच वेगवेगळ्या बुद्ध तत्वज्ञानातील कथा संकल्पनांचा परिणाम आहे. माणूसणाचे इज्जतीचे सन्मानाचे जगणे देण्याच्या मोबदल्यात पुरोहितशाहीविरोधात इंग्रजांच्या बाजूने लढलेल्या बुद्धांच्या पुढे आंबेडकरी चळवळीचा संदर्भ शोधल्यास तंगलनाच्या टोळीवर हल्ला करणार्या चित्त्याला तुम्ही ढसाळ, ढाले, ज. वि. पवारांचा पँथर म्हणू शकता.
चित्रपटातले संवाद ‘पुरुषांसाठी स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता’ असल्याचं स्पष्ट करणारे पुरुषप्रधान पद्धतीआधी मातृसकत्ताक आदिवासी संस्कृती इतिहासाची आठवण करून देणारे आहेत. तंगलानच्या आदिवासी टोळ्यांनी केवळ भुकेसाठी केलेली रानगव्याची शिकार, लंगोटपालिकडे अंग्रेजी साहेबांसारखे अमिर उमरावांसारखे कपडे परिधान करण्याची तंगलानची दाबलेली इच्छा, मिळालेल्या सोन्यातून केवळ भाकरी मिळवण्यासाठीची अनासक्ती तर पुरोहित, संस्थानिक, इंग्रजांचा सोन्यासाठी असलेला निर्दयी हव्यास यातल्या मधोमध मानवी मनातली तृष्णा हेच दुःखाचे अनादी काळापासून कारण ठरले आहे, थंगलानने या तृष्णेवर मिळवलेला विजय हा या चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू आहे.
- संजय सोनवणे
0 टिप्पण्या