८ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगात जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. मानवी समाज सुसंस्कृत बनून समाजाचे शिक्षणाच्या जोरावर मानवी कल्याण होऊन सर्वांना विकासाच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात. ज्ञानी लोकांपासून अज्ञानी लोकांची होणारी पिळवणूक, फसवणूक, शोषण आदीपासून मुक्तता व्हावी. निरक्षर लोकांना साक्षरतेची संधी मिळावी यासाठी राष्ट्रकुलच्या 'युनेस्को' या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रूढ झाली.
आज इतक्या वर्षांनंतरही युनेस्कोने सुरू केलेल्या जागतिक साक्षरता दिनाला जगभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वतःच्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे. शिक्षणाचे महत्व कोणाला नाही? मानवी कल्याणासाठी शिक्षण अतिशय महत्वाचे आहे मात्र केवळ शिक्षण देणे म्हणजेच साक्षरता नव्हे तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तिशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता एक परिणामकारक साधन आहे म्हणूनच युनेस्कोने जगभर साक्षरता अभियान राबवले. युनेस्कोने सुरू केलेल्या या साक्षरता अभियानाला जगभर चांगला प्रतिसाद मिळाला. भारतात सुद्धा या अभियानाचे चांगले फलित दिसून आले असून, एका आकडेवारीनुसार १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाला तेंव्हा भारताचा साक्षरता दर हा १२ टक्के इतकाच होता. १९९१ मध्ये साक्षरतेचे हे प्रमाण ५२ टक्क्यांवर आले तर २०११ मध्ये ते ७५.०६ वर पोहचले. पण आपला देश अजूनही १०० टक्के साक्षर नाही.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी १०० टक्के साक्षरता आपण साध्य करु शकलो नाही. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, बिहार या उत्तरेकडील राज्यात अजूनही साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक नाही त्यामानाने केरळसह दक्षिणेकडील सर्व राज्यात मात्र साक्षरतेचे प्रमाण समाधानकारक आहे. देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत. सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, मध्यान भोजन योजना, प्रौढ शिक्षण योजना, राजीव गांधी साक्षरता अभियान, नवभारत साक्षरता अभियान या सारखे उपक्रम राबवून सरकार देशातील साक्षरतेचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व उपक्रमांना चांगला प्रतिसादही मिळत असल्याने लवकरच आपण १०० टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट साध्य करू. जागतिक साक्षरता दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
0 टिप्पण्या