लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाजपाच्या एका माजी आमदाराने जीवे मारण्याची उघड धमकी दिली असतानाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह गप्प बसले आहेत. काँग्रेस पक्ष अशा धमक्यांना घाबरत नाही पण सत्तेच्या मस्तीत जर भाजपाचे नेते अशा धमक्या देत असतील तर त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. मोदी व शाह यांनी याप्रकरणी भूमिका मांडावी व धमकी देणारा भाजपाचा माजी आमदार तरविंदरसिंह मारवाला तातडीने अटक करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या भाजपाच्या दिल्लीतील माजी आमदार तरविंदरसिंह मारवा व भाजपा विरोधात मुंबई काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलन करुन भाजपाचा निषेध केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनीही आंदोलनात भाग घेऊन भाजपावर तोफ डागली. प्रसार माध्यमांशी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, भाजपाच्या एका माजी आमदाराने लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांना जाहीर धमकी देणे हा अत्यंत निषेधार्ह व संताप आणणारा प्रकार आहे. धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह मारवाला अटक करावी या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केले आहे. भाजपा कशासाठी आंदोलन करत आहे ते माहित नाही. आरक्षणांवर राहुल गांधी काय बोलले हे भाजपाने व्यवस्थित ऐकलेले नाही. वास्तविक पाहता राहुल गांधी यांनी नेहमीच एससी, एसटी, मागास समाजाची बाजू मांडली आहे. राहुल गांधी हे आरक्षणाचे समर्थक आहेत, सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा वाढवावी ही त्यांची भूमिका आहे. संसदेतील राहुल गांधी यांच्या भाषणातही आरक्षण व मागास, वंचित घटकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल हीच भूमिका मांडलेली आहे. परंतु भाजपाने कसलीही खातरजमा न करता फेक नेरटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय जनता पक्ष हाच आरक्षण विरोधी व संविधान विरोधी आहे, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रा. वर्षा गायकवाड, श्री सचिन सावंत, श्री प्रणिल नायर, श्री संदीप शुक्ला, श्री युवराज मोहिते, श्री सुरेशचंद्र राजहंस, श्री अखिलेश यादव, श्री कचरू यादव, श्री महेंद्र मुणगेकर, श्री मोहसीन हैदर, डॉ. अजंता यादव व इतर नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाग घेतला.
धारावी पुनर्वसन प्रकल्पातील भ्रष्टाचारामुळेच छुप्या पद्धतीने भूमिपूजन.
धारावी पुनर्वसन प्रकल्पाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, माटुंगा येथे DRPPL कडून धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे भूमिपूजन गुपचूप करण्यात आले आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे, प्रकल्पाला जनतेचा तीव्र विरोध आहे म्हणून घाबरून गुपचूप भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला. DRPPL नावाच्या या खाजगी कंपनीत अदानीची ८० टक्के भागिदारी आहे, या कंपनीकडून गणपती मंडळांना मोठ्या देणग्या देण्यात आल्या, क्रिकेट सामने भरवण्यात आले, नोकरीचे आमिषे दाखवण्यात आली. भ्रष्टाचार लपवण्यासाठी छुप्या पद्धतीने भूमिपूजन झाले आहे परंतु जोपर्यंत धारावीतच घरे मिळणार नाहीत तोपर्यंत आमचा लढा चालू राहिल, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
0 टिप्पण्या