राज्याच्या ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्या महिला मुख्य सचिव पदाच्या मानकरी ठरलेल्या ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीमती सुजाता सौनिक या दलित आहेत. म्हणून दोनच महिन्यांत महाराष्ट्र सरकारला त्या नकोशा झाल्या आहेत काय, असा सवाल बहुजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी आज केला. सुजाता सैनिक या पंजाबातील दलित समाजातील आहेत. विशेष म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात दलित विद्यार्थ्यांची जी एक तुकडी पाठवली होती, त्यातील सी. डी. चिमा यांच्या घराण्यातील सुजाता सौनिक आहेत, याची त्यांनी एका पत्रकाद्वारे आठवण करून दिली आहे. सौनिक यांना हटविण्याच्या हालचालींमुळे शिंदे - फडणवीस - अजितदादा यांच्या सरकारचा दलितद्वेष्टा जातीयवादी चेहरा उघडा पडला आहे, असे चिलगावकर यांनी म्हटले आहे.
शिंदे सरकार सध्या ' लाडकी बहिण ' असे संबोधत महिला वर्गाचे सध्या लांगूलचालन करत आहे. त्यामागे विधानसभा निवडणुकीसाठी मतांची बेगमी करण्याचे निव्वळ राजकारण आहे. प्रत्यक्षात राज्य सरकारचा महीलांबद्दलचा कळवळा नकली आहे, हेच सुजाता सौनिक यांना हटविण्याच्या हालचाली सांगत आहेत, असा आरोप चिलगावकर यांनी केला आहे. गृह खात्यातील विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव आय.एस. चहल यांची मुख्य सचिव पदी वर्णी लावण्यासाठीच शिंदे सरकारने सुजाता सौनिक यांना हटवण्याचे पाऊल उचलले आहे. त्यांचा कार्यकाल पुढील वर्षी जूनमध्ये संपणार आहे. त्यापूर्वी सौनिक यांना हटवण्यात आल्यास शिंदे सरकारला दलितांच्या रोषाला आणि उग्र प्रतिक्रियेला तोंड द्यावे लागेल, असा इशारा बहुजन संग्रामच्या पत्रकाच्या शेवटी चिलगावकर यांनी दिला आहे.
सुजाता सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगड मध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतलीय. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. सुजाता सौनिक यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यानंतर त्यांना मुख्य सचिवपदाची संधी मिळाली. ३० जुन २०२४ रोजी मुख्य सचिवपदाचा कार्यभार हाती घेणाऱ्या सुजाता सौनिक यांना एक वर्षांचा कार्यकाळ लाभणार असून जून 2025 मध्ये त्या निवृत्त होणार आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार, 1987 च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (1988) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (1989) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात असतानाही सुजाता सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. ६४ वर्षानंतर पहिल्यांदाच या पदावर एक महिला अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.
0 टिप्पण्या