Top Post Ad

ते अभागी कामगार-कर्मचारी 'हिंदू' नव्हेत काय

 


शेजारच्या बांगलादेशातल्या हिंदुंविषयी एवढी कणव जर सरसंघचालक खरंच बाळगून असतील...तर, अशा 'संवेदनशील' सरसंघचालकांसमोर, एखाद्या आटपाटनगरीची कहाणी असावी तशी, आपल्याच देशातल्या 'औद्योगिक व सेवा क्षेत्रा'तल्या नगरीतली... करोडो आत्म्यांची करुण कहाणी, आज मांडायचं ठरवलंय (अर्थातच, त्यांना हे सगळं 'ज्ञात' असलं किंवा त्यांच्यासारख्या बड्यांच्याच 'भांडवली-आशिर्वादा'ने ती कहाणी भारतीय-रंगमंचावर घडत आली असली...तरीही  "अन्यायाच्या दारात देखील, एखादवेळेस न्याय मागून बघायला",  कुणाची हरकत नसावी!)_

ही दर्दभरी कहाणी आहे, भारतातल्या औद्योगिक व सेवा क्षेत्रातील करोडो करोडो तरुणांची, ज्यांना 'कंत्राटी-कामगार', हे गोंडस संबोधन आहे; पण, ते वस्तुतः आहेत 'गुलाम'...ते आहेत आजच्या 'भांडवली-व्यवस्थे'तले 'नवअस्पृश्य', ज्यांच्या जगण्यातली माणुसपणाचं लक्षण असलेली 'सुरक्षितता' काढून घेण्यात आलेली आहे व जगण्यातला 'सन्मान' आजमितीस क्रूरपणे लाथाडला गेलेला आहे...जसा तो पूर्वी पदरी सर्रास गुलाम बाळगण्याच्या 'गुलामगिरी-प्रथे'च्या काळात नाकारला गेला होता व जसा तो, भारतीय जाती-व्यवस्थेच्या उतरंडीत बहुजन 'शूद्रां'ना नाकारला गेला होता! आपण,  हे गुलामगिरीचे व नव-अस्पृश्यतेचे भोग भोगणाऱ्या, ज्या करोडो अश्राप जीवांविषयी बोलतो आहोत...ते "९९.९९% हिंदूच" आहेत,  हे ही सरसंघचालकांना मुद्दाम सांगितलं गेलं पाहिजे!

तर, कहाणी अगदी थोडक्यात अशी की, औद्योगिक व सेवा क्षेत्रात त्यांच्यासाठी नोकऱ्या आहेत; पण त्या औटघटकेच्या आहेत; आज आहेत, उद्याची शाश्वती नाही...नोकऱ्या आहेत; पण, त्यांना धड पगार नाहीत, या महागड्या जगात संसाराची फाटकी गोधडी त्यातून शिवता येत नाही...नोकरीच्या ठिकाणी त्यांना व्यवस्थापनाकरवी जाणिवपूर्वक सतत अपमानित केलं जातं असतं, त्यांची 'गुलाम' म्हणून असलेली 'औकात' मुद्दामहून 'जागती' ठेवून त्यांना उठसूठ ती दाखवली जात असते...मग, काय चुलीत घालायच्यात त्या नोकऱ्या, ती असली गुलामिरीतली 'अर्धरोजगारी'?मुळातून नोकऱ्या असतात कशासाठी? जगणं सन्मानाचं करण्यासाठी आणि स्थिरस्थावर ठेवण्यासाठीच ना?? ...तर, हे जगण्याचे दोन्ही बुरुज ढासळवून टाकलेल्या व हातात उरलीसुरली दगडमाती ठेवणाऱ्या नोकऱ्या पत्करुन, कुणी सन्मानाने वा निश्चिंत जगू शकतो, आजच्या जगात? 

आज देशातली, विशेषतः महाराष्ट्र देशातली, नवतरुणाईची परिस्थिती एवढी गंभीर व शोचनीय आहे की, तरुणतरुणींची वयं वाढत चाललीयत; पण, कुणाची लग्न करुन संसार थाटायची हिंमत होत नाही...केलीच हिंमत तर, तकलादू-तुटपुंज्या पगारात भागत नाही म्हणून थाटल्या संसाराचे सर्रास 'विस्कोट व विस्फोट' होतायत..घटस्फोट होतायत, व्यसनाधीनता वाढतेय व कुटुंबासह जागोजागी आत्महत्या होतायत...फक्त, भांडवली-व्यवस्थेकरवी  त्या आत्महत्यांना जाणिवपूर्वक शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारखं, "कंत्राटी-कामगारांची आत्महत्या", असं 'ब्रॅण्डींग' मात्र केलं जात नाही...जेणेकरुन, वस्तुतः 'चोर व दरोडेखोर' असलेल्या कंत्राटदारांविरुद्ध व कंत्राटी-कामगार पद्धतीद्वारे 'कंपनी-दहशतवाद' (Corporate-Terrorism) माजवणार्‍या व्यवस्थापकीय-मंडळींविरुद्ध आणि एकूणच 'कंत्राटी-कामगार पद्धती'विरुद्ध विद्रोह होऊ नये म्हणूनच केवळ! 

...या सगळ्या अखिल भारतीय पातळीवरील, प्रामुख्याने महाराष्ट्रात पसरलेल्या करुणाजनक परिस्थितीबद्दल व तरुणाईच्या अंतरी रौद्रभीषण तांडव माजवणार्‍या या घटनाक्रमाबद्दल, कधि सरसंघचालकांनी अवाक्षर तरी काढलंय? ...पण, कुणी कितीही झाकलं तरी कोंबडं आरवल्याखेरीज रहात नाही. भारतापेक्षाही अधिक वेगात चकाचौंध आर्थिक-प्रगती करुन दाखवणार्‍या; पण, अमानुष शोषण व टोकाच्या आर्थिक-विषमतेने ग्रासलेल्या...आणि म्हणूनच, 'उंटाच्या पाठीवरच्या शेवटच्या काडीसारखं' कुठलं तरी निमित्त गाठून भीषण उद्रेक घडलेल्या, बांगला देशाच्याच वाटेवर आपला भारत देश असताना देखील...  भारताचं नाव जगात उज्वल करणाऱ्या गौतम बुद्धाच्या, 'गौतम' या शिरसावंद्य नावाला भयंकर काळिमा फासून जगभरात भारताचा दुर्लौकिक निर्माण करणाऱ्या 'गौतम' अदानीला जाहीर पाठिंबा देण्याचं राजकीय दुःसाहस सरसंघचालक करतात, पण कंत्राटी-कामगार पद्धतीबद्दल 'क' उच्चारत नाहीत, त्याबद्दल काय बोलावं?  


खरंतरं राऊंड-ट्रिपिंगसारख्या आर्थिक-लांड्यालबाड्या करणे, सत्ताधाऱ्यांकरवी प्रतिस्पर्ध्यांवर बेकायदेशीरपणे जबरदस्ती करुन त्यांचे उद्योगधंदे घशात घालणे, आपल्या मालकीच्या बंदरांमध्ये हजारो कोटींचे अंमलीपदार्थ वारंवार सापडणे, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेली स्वतंत्र-पत्रकारितेची माध्यमं अवैध मार्गाने गोळा केलेल्या राक्षसी अर्थबळावर ताब्यात घेऊन त्यांची मुस्कटदाबी करणे...वगैरे जे असंख्य अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप गौतम अदानीवर आजवर देशविदेशातून चारही बाजुंनी झालेले आहेत...त्यांची  'संयुक्त संसदीय समिती'तर्फे (Joint Parliamentary Committee...JPC) अतिशय पारदर्शक पद्धतीने चौकशी न करता, बनावट 'देशप्रेमा'चं बेगडी प्रदर्शन करत, सत्याला सामोरं जाण्याला बदमाषीपूर्ण नकार देणं ...हा सारा देशघातकी प्रकार म्हणजे,  'सत्यमेव जयते'  हे ब्रीद असणाऱ्या भारतीय-राजनीतिनुसार मोठा दंडनीय अपराध होय! एवढंच नव्हे तर, आपल्या जाज्वल्य हिंदुत्वानुसार अथवा भारतीय-आध्यात्मिक संकल्पनेनुसार ते भयंकर मोठं 'कुकर्म' असल्यामुळेच, तो अक्षम्य अपराध ठरतो! मग, कुठल्या 'हिंदुत्वा'च्या बाता सरसंघचालक व त्यांचे 'बोलबच्चन बगलबच्चे' मारतायत?

ज्या 'वर्णवर्चस्ववादी-शोषक' मानसिकतेनं बहुजनांना 'शूद्र' ठरवून त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले होते, त्यांना सन्मानाचं जीणं नाकारुन पिढ्या न् पिढ्या 'अस्पृश्यता व गुलामगिरी' भोगायला लावली होती...आज मुठभरांच्याच हातात 'सत्ता आणि मत्ता' ठेवण्याची तिचं विकृत-मानसिकता वेगळ्या रुपात; पण, त्याच हिडीस स्वरुपात...कंपन्या-कारखान्यांमधून 'कंत्राटी-कामगार पद्धत' व त्या पद्धतीतूनच प्रसवल्या गेलेल्या OutSourcing, NEEM, FTE, अग्निपथावरील लष्करी अग्निवीर वगैरे 'डोकेबाज व धोकेबाज' असलेल्या 'पिलावळी'मधून दिसतेय...त्याविषयी, कधि बोलणार सरसंघचालक? ते अभागी कामगार-कर्मचारी 'हिंदू' नव्हेत; तर, काय पाकिस्तानी वा बांगलादेशातले कुणी 'आतंकवादी मुस्लिम' आहेत?? ...दूरवरच्या बांगलादेशामधला आक्रोश यांना हलवून सोडतो, बोलका करतो...पण, ज्या करोडो आत्म्यांचा आक्रोश, आपल्याच देशातील ही रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्था (Vampire-State System) आपल्या टाचेखाली दडपून टाकून संपत्तीचे इमलेच्या इमले रचून उभी आहे...तो आजुबाजुचा 'आक्रोश' सरसंघचालकांच्या कानात शिरु शकत नाही, एवढे त्यांचे कान त्याबाबत ठार बहिरे झाले आहेत काय?? करोडो आत्म्यांच्या जीवघेण्या तडफडीची ती करुण स्पंदनं...त्यांच्या हृदयाच्या अंतर्हृदयात पोहोचू न शकण्याएवढं, त्यांचं 'हृदय' म्हणजे, कुठली 'दगडी चाळ' झाली आहे काय...???

_ ...राजन राजे _

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com