नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. हा पुतळा कोसळला आहे. मात्र यामागचं कारण अजून कळू शकलेलं नाही. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं होतं. पुतळा कोसळल्याने राजकीय वातावरण तापलं असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी हा पुतळा कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली आहे. तर, खासदार सुप्रिया सुळेंनीही कॉन्ट्रॅक्टरसंदर्भात प्रश्न विचारला. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम ठाणे जिल्ह्यातील कंत्राटदाराकडे सोपविण्यात आले होते. त्याने आपले काम कसे केले असावे हे आता उघड झाले आहे. हि व्यक्ती आणि तिची संस्था यांना सर्व खात्यांच्या काळ्या यादीत टाकायला हवे, अशी आमची मागणी असल्याचं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुरुवातीपासून या कार्यक्रमावर व स्मारकाच्या कामावर आक्षेप घेत चौकशीची मागणी केली होती. आता पुतळा कोसळल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज (कोल्हापूर संस्थान) व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षानेही राज्य सरकार व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राष्ट्रवादीने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, आपल्या प्रसिद्धीच्या दिखाव्यासाठी वेळ आणि कामाच्या दर्जाला दुय्यम स्थान देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नीतीचा राम मंदिर आणि संसद भवनानंतर महाराष्ट्राच्या अस्मितेलाचं फटका! राजांचा पुतळा नव्हे, महाराष्ट्रधर्म पडला.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्या देवत आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. विरोधकांना टीका करायला वेळच वेळ आहे, मी त्याकडे लक्ष देत नाही, हा पुतळा नेव्हीने उभारला होता, त्यांनीच पुतळ्याचं डिझाईन केलं होतं. याप्रकरणी, मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी मला सांगितलं की,45 किमी पर अवर असा वारा होता, त्यात हे नुकसान झालं आहे. नेव्हीचे अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत तर तात्काळ आमचे अधिकारी तिथे पोहोचून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्याचं काम आम्ही करू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
. पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई-गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला व घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब दुसरी कोणतीही नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार! आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे”. - संभाजीराजे भोसले (एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर)
सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट ह्याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपाची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करु आणि त्यातून बिनधास्त सुटू असा अहंकार त्यांच्यात आहे. त्याच अहंकारापोटी महाराजांच्या स्मारकाचं गांभीर्य लक्षात न घेता घाईत ते बनवण्यात आलं. केवळ महाराजांच्या प्रतिमेचा वापर करण्याचा हेतू होता, त्यामुळे त्या स्मारकाच्या गुणवत्तेकडे लक्षच दिलं गेलं नाही. स्थानिकांचं म्हणणंही ऐकलं नाही. आज जेव्हा आमच्या महाराजांचा पुतळा पडलेला पाहिला तेव्हा मनाला प्रचंड यातना झाल्या. महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक प्रतिमेला सांभाळायला हवं!", आमदार आदित्य ठाकरे
सिंधुदुर्ग येथील भंग पावलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा सन्मानाने उभारण्यात यावा, यावेळी कोणाच्याही स्वार्थासाठी कामाच्या दर्जासोबत कसलीही तडजोड करू नये ही माझ्यासह तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा केवळ आठ महिन्यातच कोसळणे अतिशय गंभीर आहे. असे नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी. घडलेली घटना दुर्दैवी असली तरी शिवभक्तांनी शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्था भंग होऊन छत्रपती शिवरायांच्या विचारांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी असे माझे आवाहन आहे, नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांसह संबंधित अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी व्हावी - खासदार अमोल कोल्हे
खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की, छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा! पुतळा एवढा जुना ही नाही की, नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला असावा... मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता हा. दहा वर्षांपुर्वींचा नाही, अगदी कालपरवा...इलेक्शनच्या चारपाच महिने आधी...राममंदिराच्या दिड महिना आधी उभारलेला! त्यानंतर, फक्त २६६ दिवसांतच ही नामुष्की आणणारी दुर्घटना घडते? यांच्या हस्ते उद्घाटनं झालेल्या विमानतळांची छतं कोसळताना आपण पाहिली...पूल कोसळताना पाहिले...पुलांना भेगा पडलेल्या पाहिल्या...बोगदे पाण्यानं तुंबलेले पाहिले.. .रस्ते खचलेले पाहिले... राममंदिराचा गाभारा गळताना पाहिला... नवीन संसदेचा मार्ग पाण्याखाली गेलेला पाहिला...नवीन संसद इमारतीच्या छताला गळती लागून बादल्या ठेवाव्या लागल्याचे लाजिरवाणे दृश्य पाहिले... जगापुढे शरमेने मान खाली जावी, अशा या घटना... पण,त्या सगळ्यावर या घटनेनं मात केली! हे मी केलं,हे मी केलं." सांगण्यासाठी घाईघाईत पोकळ कामं करून, फोटो काढून जाहिरातबाजी करून जनतेला गंडा घालणारे पोकळ नेते कधी ना कधी उघडे पडतातच. कसोटीच्या काळात आणि काळाच्या कसोटीत तोच टिकतो, जो 'सच्चा'आहे- अभिनेते किरण माने
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच, 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आले होते. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडलं ही जनभावना आहे, पण त्यांना ही घटना कशी घडली हे भेटून सांगेन, - पालकमंत्री रविंद्र चव्हाण
शिवाची महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे कोसळल आहे. याबद्दल आम्हाला दु:ख होत असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो.सहा महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पुतळा उभरण्यात आला होता . ज्यावेळी काम सुरू होते त्यावेळी स्थानिक लोकांनी सुद्धा कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. पण त्यावेळी पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील काम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे. - आमदार वैभव नाईक.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा 35 फुटांचा होता. 4 डिसेंबर 2023 चा नौदल दिन छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निमित्ताने राजकोट किल्ल्यावर नौदल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरण झाले होते. किल्ले राजकोट परिसराचं सुशोभीकरण तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जमिनीपासून उंची सुमारे 43 फूट एवढी आहे. बांधकाम जमिनीपासून 15 फूट तर त्यावर 28 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असं स्ट्रक्चर आहे. पुतळ्याची किंमत 2 कोटी 40 लाख 71 हजार एवढी रुपये एवढी होती. कल्याणचा शिल्पकार आणि मालवणचा जयदीप आपटे यांनी हे शिल्प बनवलं आहे.
0 टिप्पण्या