Top Post Ad

प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे' पुस्तकाचे ७ ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन


  प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथाचे ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये प्रकाशन होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथाली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रकाशन समारंभात  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणारआहेत. तर उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, कोमसाप अध्यक्ष नमिता कीर, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश हिंगलासपूरकर हे  प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक आहेत.

‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रकांकडून देण्यात आली. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय, सामाजिक तसेच कौटुंबिक जीवनातील संघर्षशील प्रवासाचा लेखाजोखा मांडणाऱ्या या चरित्रग्रंथाचे लेखन सुप्रसिद्ध साहित्यिक व नाटककार प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय, नातेवाईक, सहकारी, समकालीन मंडळी, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतींच्या आधारे हा चरित्रग्रंथ शब्दबद्ध केला आहे. त्यासाठी डॉ. अरुंधती भालेराव, राजन शंकर बने, सान्वी ओक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय सात दशकांपूर्वी साताऱ्याहून मुंबईत आले, तिथून ते ठाणे येथे स्थायिक झाले. हा सारा त्यांचा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला. मात्र कष्टाच्या, निष्ठेच्या आणि सचोटीच्या बळावर एकनाथ शिंदे यांनी सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी विलक्षण झेप घेतली. या त्यांच्या वाटचालीतील विविध प्रसंग, घटना-घडामोडी यांच्या आधारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि नेतृत्वाची घडण कशी झाली, हे महाराष्ट्रीय जनांपुढे मांडण्याच्या प्रांजळ हेतूने ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ हे चरित्र शब्दबद्ध केल्याचे चरित्रलेखक प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले. 

प्रकाशन सोहळ्यास केवळ निमंत्रकांनाच प्रवेश : सदर प्रकाशन सोहळा केवळ निमंत्रितांसाठीच असून सुरक्षेच्या कारणास्तव आणि काटेकोर नियोजनाच्या दृष्टीने केवळ सोहळ्याची प्रवेशिका असणाऱ्यांनाच सभागृहात प्रवेश देण्यात येईल, असे आयोजन समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. मंदार टिल्लू : ९३२२८८००६९ यांच्याशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com