Top Post Ad

शाळेतील मुलीही असुरक्षित, शाळेला वाचवण्यामागे कोणती शक्ती

  बदलापूरमधील दोन शाळकरी चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राची मान देशात शरमेने खाली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच माता, भगिनी, चिमुकल्या व शाळेत मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. बदलापूरच्या आधी शिळ फाट्याच्या मंदिरात गृहिणीवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करुन हत्या केली. उरणमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली. बदलापूरच्या ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला वाचवणारी शक्ती कोणती असा सवाल मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.    


बदलापूर घटनेप्रकरणी काँग्रेसने मंत्रालयावर मोर्चा काढून  सरकारचा तीव्र निषेध केला.  बदलापूरच्या पीडीत कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. महिलांची तक्रार घेऊन सरकारकडे न्याय मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 यावेळी भाजपा युती सरकारवर तोफ डागत प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दोन चिमुकल्या मुलींवर झालेला अत्याचाराचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. १३ तारखेला घटना घडली असताना शाळा प्रशासानाने त्याची दखल का घेतली नाही. पोलीस स्टेशन मध्ये पीडित मुलीच्या गर्भवती आईला ११ तास ताटकळत का ठेवले, कोणाच्या दबावाखाली पोलीस काम करत होते. कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत होता ह्याचा खुलासा झाला पाहिजे. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली तेव्हा सरकार जागे झाले व थातूरमातूर कारवाई केली. निलंबनाची कारवाई करुन चालणार नाही या प्रकरणी बदलापूर पोलीस स्टेशनमधील संबंधित वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. संबंधित शाळेला वाचवण्यासाठी कोणती शक्ती काम करत होती असा सवाल करून शाळा व्यवस्थानावरही कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली. 

शाळांमध्ये विद्यार्थीनी सुरक्षित नाहीत आणि सरकार मात्र झोपा काढत आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांना बदलापुरच्या घटनेनंतर जाग आली आहे. शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन, विशाखा समिती स्थापन करून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाय योजना करणे व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही लावण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री आता देत आहेत. बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली तिथे सीसीटीव्ही बंद असल्याचे उघड झाले आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांची आताची विधाने म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’, अशा पद्धतीची आहेत  सरकार दखल घेत नाही हे लक्षात आल्यानेच जनतेने आंदोलन केले, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. केसेस टाकण्यात आला व ४० ते ५० लोकांना अटक करुन कोर्टात घेऊन गेले. हे पोलीस पीडितेची तक्रारही दाखल करुन घेत नव्हते. सरकारला मुली, महिला यांच्यावरील अत्याचार दिसत नाहीत पण न्याय मागण्यांवरच कारवाई केली जाते, का कुठला न्याय असा प्रश्न गायकवाड यांनी विचारला आहे.

दरम्यान बदलापूर येथील आदर्श महाविद्यालयात दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज २१ ऑगस्ट रोजी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याचा मुक्काम आता आणखी पाच दिवसांनी वाढला आहे.  आरोपी अक्षय शिंदे याला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी आज २१ ऑगस्टला संपणार होती. पोलीस कोठडीत २६ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरोपीने अश्या प्रकारची आणखी काही लैंगिक शोषण किंवा कृत्य केल्याचा संशय व्यक्त करत आरोपीची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी पोलिसांनी केली होती. मुलींना आरोपी काय सांगून न्यायचा आणि त्यांच्यावर कसा अत्याचार करायचा, या संदर्भात चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. पोलिसांच्या या मागणीनंतर कल्याण न्यायालयाने २६ तारखेपर्यंत अक्षय शिंदे याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आदर्श महाविद्यालयात पोलिसांचा बंदोबस्त अजूनही तैनात आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त आहे. शहरातील बहुतांश भागातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. कालच्या आंदोलनानंतर आज बदलापूरमधील रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरु आहे. पण काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम १६३ लागू करण्यात आलं आहे. तर शहरातील दुकानं देखील बंद आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com