भारताचे संविधान व त्यातील मौलिक व मूलभूत तत्वे, संविधान कधीच कोणीच बदलू शकत नाही याची संविधानातच असलेल्या भक्कम तरतूदी याबद्दल समाजाची व्यापक जागृती करण्याच्या उद्देशाने तसेच त्याबद्दलचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व न्याय निवाडे याची सविस्तर माहिती समाजापर्यंत पोहोचावी या उद्देशाने भारतीय राज्य घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्यातील फुले, शाहु, आंबेडकरी चळवळीतील सुमारे २५० पक्ष, संघटना, संस्था, मंडळे यांनी एकत्रीत येऊन संविधान जागर समिती, महाराष्ट्र" स्थापन केली आहे. या समितीच्या माध्यमातून सत्याग्रह भूमी- महाड जि. रायगड ते चैत्यभुमी दादर, मुंबई (मार्गे महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व जिल्हयात) अशी संविधान जागर यात्रा २०२४" सुरू करण्यात येणार असल्याची माहीती संविधान जागर यात्रा संयोजक अॅड. वाल्मिक निकाळजे, नितीन मोरे यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे दिली. . या पत्रकार परिषदेला अॅड. वाल्मिक निकाळजे, नितीन मोरे यांच्यासह शरद कांबळे, संजय कांबळे, स्नेहाताई भालेराव, आकाश अंभोरे, राजेंद्र गायकवाड, योजनाताई ठोकळे, नागसेन पुगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधान लागू झाल्यापासून ज्या ज्या चुकीच्या घटना दुरूस्त्या (संविधान संशोधने) ज्यांनी केल्या आणि संविधानातील मूलभूत आधिकारांची चौकट (ढाँचा) व लोकशाही यांची हत्या करून ती कायमची नष्ट करून देशावर जबरदस्तीने हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न करणा-यांची संपूर्ण पोलखोल या संविधान जागर यात्रेद्वारे करण्यात येणार आहे. या करिता संविधान जागर यात्रेला राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरी विचाराचे, आण्णा भाऊ साठे विचाराचे आणि आदिवासी भटके व विमुक्त संघटना व चळवळी आणि विचारवंत लेखक, साहित्यीक यांचाही सक्रिय पाठिंबा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले
सत्याग्रह भूमी महाड जि. रायगड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथुन "संविधान जागर यात्रेची "सुरूवात होणार असून यात्रेचा समारंभ केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी, व भाजपा प्रदेशाध्यक्ष प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर नेते व इतर ठिकाणी केंद्रीय मंत्री राष्ट्रीय पातळीवरील तथा राज्यातील मान्यवर नेते आणि कोअर समितीचे प्रमुख सदस्य यांच्या उपस्थितीत दि.९ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी सकाळी १० वा. होणार आहे. व त्यानंतर कोकण भूमीतून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ, खान्देश, (उत्तर महाराष्ट्र) मार्गे संविधान जागर यात्रा ठाणे जिल्हयातून चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे दि.८ संप्टेबर २०२४ रोजी सकाळी पोहचणार आहे. चैत्युभूमी, दादर, मुंबई येथे समारोपाच्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सह भाजपाचे केंद्रीय मत्री महायुतीचे राष्ट्रीय नेते आणि राज्याचे नेते, भाजपा महाराष्ट्र प्रभारी केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा राष्ट्रीय मंत्री आमदार पंकजाताई मुंडे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील इ. यांचे अनमोल मार्गदर्शन लाभणार आहे.
संविधान जागर यात्रेत राज्यातील रत्नागिरी, कोल्हापुर, पुणे, सोलापुर, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजी नगर, नागपूर, यासारख्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी संबंधीत अनेक ऐतिहासिक ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील राज्यातील माननीय नेते, मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार व इतर पदाधिकारी सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत. संविधान जागर यात्रेचे ऐतिहासिक महाड-चवदार तळे, छ.शिवाजी महाराजांची राजधानी किल्ले रायगड, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे पतीत पावन मंदिर, आरक्षण जनक छ. राजर्षी शाहू महाराज, समाधी कोल्हापुर, म. फुले वाडा, पुणे, डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठ, छ.संभाजी नगर, दिक्षाभूमी नागपडू, काळाराम मंदिर, नाशिक व चैत्यभुमी दादर, मुंबई या ऐतिहासिक ठिकाणी जाणार असून त्या सर्व ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहेत.
संविधान जागर यात्रेची व्याप्ती सर्व जिल्हा स्थाने व प्रत्येक जिल्हयातील एक तालुका स्थान अशी असेल. संविधान जागर यात्रा विशेषतः युवा वर्ग, महिला, साहित्यिक, विचारवंत, चळवळीचे कार्यकर्ते नेते, संस्था अशा सर्व स्तरावर पोहोचणार आहे. संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे राष्ट्रभक्तीचे विचार समाजात प्रकर्षाने मांडण्यात येणार असून त्यांनी देशाला एकसंघ, एकजीव व एकजिनसी समृध्द (सुपर पॉवर) बनविण्याचे पाहिलेले उदात्त स्वप्न, बंधुता, या विषयी समाजात व्यवस्थीत मांडणी करण्यात येणार असून देशाचे विभाजन करून देश पुन्हा गुलामीत, पारतंत्र्यात लोटण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे आटापिटा करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींची संपूर्ण पुराव्यानिशी पोलखोल करण्यात येणार आहे. देशातील राष्ट्र विरोधी शक्तींचे प्रयत्न समाजानेच पूर्णतः हाणून पाडावेत म्हणुन जाती जातीत धर्मा-धर्मात व्यक्ती व्यक्तीत व कुटुंबा कुटुंबात भेद, द्वेष, तिरस्कार निर्माण करणा-या व्यक्ती, पक्ष व शक्ती यांचा पध्दतीशीर समाचार घेण्याचे व त्यांचे देशविघातक मुद्दे पूर्णतः खोडून काढण्याचे अत्यंत महत्वपुर्ण काम या संविधान यात्रेच्या माध्यमातून होणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
0 टिप्पण्या