रोड सेफ्टी नावाचा प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही. सुमारे 800-800 पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन होणार कसे? मग, हीट अँड रन होणार नाही तर काय? वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार; अशा स्थितीत सामान्य नागरिक कसे काय सुरक्षित राहणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. पुणे, वरळीनंतर मुलुंडमध्ये हिट अँड रन झाला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रश्न उपस्थित केले.
डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, हल्ली पीए , कार्यकर्ते पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा नोंदवावा किंवा नोंदवू नये, असे आदेश देत आहेत. पुणे, वरळीत राजकीय हस्तक्षेप झाला होता. आता मुलुंड प्रकरणात गुन्हाच दाखल केला जात नव्हता. एकीकडे कोणाला एमपीडीए लावायचा, कुणाला तुरूंगात टाकायचे, यासाठी फोन केले जातात. चौकशी पारदर्शक होत नाही. गुन्हेगार वाचविले जातात. मग, काही होत नाही म्हणून मग्रुरी येते अन् गुन्हे वाढत जातात. हे थांबलं पाहिजे. पण, आता सरकारमधील मंत्रीच ठोकून काढण्याचे आदेश देत आहेत. म्हणजेच आता आम्हाला चिलखत, शिरस्त्राण, पॅड बांधूनच बाहेर पडावे लागणार आहे. पण, आता दोन महिन्यानंतर व्यवस्था बदलणार आहे. या लोकांनी केलेली गद्दारी जनता मोडून काढणार आहे. जनता या लोकांना क्षमा करणार नाही, असे ते म्हणाले.
शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे; आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे ते! ईडी, सीबीआय वापरून पक्ष कसे फोडले, 70 हजार कोटींचा आरोप कोणावर झाला होता अन् सध्या ते कुठे आहेत? हे त्यांनी जाहीर करावे. शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपले अस्तित्व दाखवता येत नाही, हे अमीत शहा यांनाही उमगले आहे. याच शहा यांनी इलेक्ट्रोल बाँड, सीबीआय यावरही कधीतरी बोलावे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
विशाळगड आणि गजापूर दंगलीबाबतही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी शासन - प्रशासनाला खडे बोल सुनावले. स्थानिकांनी तहसीलदार, पोलीस प्रशासनाला कळवूनही पोलीस बंदोबस्त देण्यात आला नाही. त्यामुळे स्वतःला शिवभक्त म्हणवून घेणाऱ्यांनी आधी गडावर जाऊन धिंगाणा घातला अन् त्यानंतर गजापूरात पोलीस अधीक्षकांच्या समोरच लूटमार केली. विशाळगडावरील वास्तव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनीही मशिदीशेजारी मुक्काम केला होता. अन् त्यांच्या नावाने दंगल पसरविली जात आहे. ही दंगल पसरवणारे कसले शिवभक्त ते तर दरोडेखोर आहेत.
आरक्षणाच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवारांची भेट घेत आहेत, याबाबत विचारले असता, शरद पवार हे देशातील सर्वात प्रगल्भ आणि परिपक्व नेते आहेत. ते मानव हिताचे राजकारण करीत आले आहेत. पवारांनी जातीपातीचे राजकारण कधीच केले नाही. पण, गेले दोन वर्षे या सत्ताधाऱ्यांनी दोन जाती एकमेकांशी भिडवल्या. त्यात यश न आल्याने त्यांनी आता हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले
0 टिप्पण्या