ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई अंतर्गत शनिवारी कळवा प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. यामध्ये कळव्यातील शंकर मंदिर शेजारी सुरु असलेल्या बांधकामाचे स्लॅब कापून तोडण्यात आला. कळवा नाका, जुम्मा मस्जिद येथे स्लॅब, शास्त्रीनगर, कळवा येथील बांधकामाचे स्लॅब व कॉलम तसेच टाकोळी मोहल्ला, कळवा येथील बांधकामाचे स्लॅब व अंतर्गत बांधकाम तोडण्यात आल्याचे ठामपाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. मात्र या परिसरातील ही सर्व कामे रविवारी नियमितपणे सुरु झाल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे महानगर पालिकेने केलेली ही कारवाई तकलादू स्वरुपाची असल्याने या इमारती अद्यापही जैसे थे च असल्याने पालिका नेमकी काय कारवाई करते असा प्रश्न आता ठाणेकरांना पडला आहे.सुमारे ३० लेबर, २ ब्रेकर व १ गॅस कटरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली. एवढा मोठा फौजफाटा या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी वापरण्यात आला. मागील अनेक वेळा या बांधकामांवर अशाच पद्धतीची कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्धीमाध्यमातून प्रकाशित झाल्या. मात्र कारवाई झालेल्या सर्व इमारती आजही तशाच उभ्या आहेत. काही इमारतींमधून राहण्यासाठी उपलब्धही झाल्या आहेत. मग ठाणे महानगर पालिका हा कारवाईचा फार्स कशासाठी करते. या कारवाईसाठी ठाणेकरांच्या कररूपी निधीतून प्रचंड निधी खर्च करण्यात येतो. याबाबत ठाणे महानगर पालिका कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध करून देत नाही. केवळ एक दोन पिलर आणि आजुबाजूच्या भींती तोडून हा कारवाईचा फार्स पूर्ण करण्यात येतो. मात्र यासाठी पालिकेचा प्रचंड पैसा वाया जात आहे. त्यामुळे या तकलादू कारवाया करण्यामागे पालिकेचा हेतू काय? असा प्रश्न अनधिकृत बांधकाम उभे रहात असलेल्या आजूबाजुच्या परिसरातील लोक करीत आहेत.
अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त (सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या या कारवाईंचे फलित काय? ही बांधकामे दुसऱ्याच दिवशी पुन्हा नव्याने उभी रहात असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
0 टिप्पण्या