ठाणे स्मार्ट सिटी ; नौपाडा-कोपरी प्रभागात बांधकामे जोरात सुरू

ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत प्रचंड बांधकामे जोरात सुरु आहेत. काही बांधकामे आता शेवटच्या टप्प्यावर आली आहेत तर काही आता सुरु झाली आहेत. मात्र एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात ही कामे सुरु असताना  पालिका प्रशासन नेमके काय करते?  ऐन पावसाळ्यात ही बांधकामे वेगाने सुरु आहेत. याकडे पालिकेतील कोणताही अधिकारी फिरकत नसल्याचे स्थानिक सांगतात. मग अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,  अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन उप. आयुक्त जी. जी गोदेपुरे,  अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन सहाय्यक आयुक्त महेश आहेर, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे विद्यमान सहा.आयुक्त अजय एडके असे एवढे अधिकारी करतात तरी काय?  असा प्रश्न आता ठाणेकरांना पडला आहे

कोविड काळात ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत प्रचंड बांधकामे झाली.  भूमाफियांनी या काळात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे करण्याचा विक्रम केला. काही काळानंतर या बांधकामांवर ठाणे महानगर पालिकेने कारवाई केली. मात्र ज्या बांधकामांवर कारवाई झाली. त्या इमारती नव्याने पुन्हा उभ्या राहिल्या असून उलट त्यावर अधिकचे मजले चढवण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे.  नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील जवाहर बाग लगत असलेल्या बाजारपेठेत सुरु असलेल्या बांधकामांवर मागील वर्षभरापासून कोणतीही कारवाई झालेली नाही. तर तीन वेळा कारवाई करण्यात आलेली इमारत महागिरीतील ती इमारत अद्यापही जैसे थेच दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर महागिरी कोळीवाडा परिसरातही नवीन बांधकामांना सुरुवात झाली आहे. बाजारपेठेतील मच्छीमार्केट जवळचे बांधकाम देखील पूर्ण होत आले आहे. अगदी कमी वेळेत उभ्या राहणाऱ्या या इमारती भविष्यात किती हानीकारक असतात हे लकी कंपाऊंडच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. तरीही ठाणे महापालिकेचे अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.  
 
अनधिकृत बांधकामावर दोन दिवसात गुप्ताचे मजले तयार, बाजारपेठेत लोखंडी आय बिंमच्या सहाय्याने तळ मजला अधिक दोन मजले या मथळ्याखाली ३० मे रोजी प्रजासत्ताक जनताच्या पहिल्या पानावर वृत्त प्रकाशित करण्यात आले. आणि गुप्ताने आपले बांधकाम स्थगित केले. त्यानंतर ठाणे महानगर पालिकेचे सहा.आयुक्त या बांधकामावर नेहमीप्रमाणे तकलादू कारवाई तरी करतील अशी अपेक्षा असतानाही या बांधकामाकडे सहा.आयुक्त एडके फिरकलेच नाही.  उलट गुप्ता म्हणतो, कुछ दिन बंद रखेंगे, थोडा शांती हो जायेगा फिर चालू करेंगे. अशा तऱ्हेने या भूमाफियांना दांडगा विश्वास या अधिकाऱ्यांनी दिल्याचे निदर्शनास येत आहे.  

नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या हद्दीतील महागिरी परिसरात एका इमारतीवर दोन वेळा कारवाई झाली मात्र त्याच इमारतीवर बिनदिक्कतपणे नवव्या मजला बांधण्याचे काम सुरु झाले. याबाबत वृत्त प्रकाशित होताच सदर बांधकाम थांबवण्यात आले. त्यावर महापालिकेने तिसऱ्यांदा कारवाई केली. मात्र आजही हे बांधकाम जैसे थेच दिसून येत असल्याने ठाणे महानगर पालिकेच्या नौपाडा सहा.आयुक्तांनी नेमकी काय कारवाई केली असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही इमारत महागिरीमधील दुसरी लकी कंपाऊंडची आवृत्ती होऊ शकते असे असताना देखील पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करीत  आहे. अशा तऱ्हेने अनधिकृतपणे प्रचंड प्रमाणात बांधकामे सुरू असून ठाण्यात आता स्मार्ट सिटी लवकरच अस्तित्वात येईल असा विश्वास ठाणेकर व्यक्त करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या