- गोलमाल है भाई सब गोलमाल है...!
- वादग्रस्त छमछम बंद का होत नाही...?
कोरोनाकाळात उद्योग-व्यवसायावर कडक निर्बंध असले तरी हुक्का पार्लर, डान्स बार, पब यांना मात्र कसलेही निर्बंध लागु नव्हते असेच चित्र साऱ्यांनी पाहिले. ज्यांनी पाहिले नव्हते त्यांनी स्टिंग ऑपरेशनच्या रूपाने ते घरबसल्या बघितले. त्यानंतर हा मुद्दा बराच गाजला. एक दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सोंग दाखवले गेले. नंतर हे प्रकरण हळूहळू शांत झाले अन सारेच छमछम पुन्हा धडाक्यात वाजू लागले. छमछमचा हा चार भिंतीआड धुमाकूळ घालणारा आवाज मात्र पोलिसांपर्यंत पोहचला नसावा. त्याला कारण म्हणजे माहितीच्या अधिकारात उत्तर देतांना ठाणे पोलिसांनी त्यांच्या हद्दीत एकही बार सूरु नाही असे उत्तर दिलंय. त्यामुळे, सब गोलमाल है भाई सब गोलमाल है, हेच वाक्य या साऱ्या परिस्थितीला शोभून दिसतंय.
पोलीस व प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ठाण्यात सर्रास डान्स बार सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार एका चॅनलने काही महिन्यांपूर्वी उघड केला होता. त्यानंतर साखर झोपेतून जागे झाल्यागत पोलीस प्रशासनाने दोघा सिनियर पीआयचे तडफतडफी निलंबन केले. तर दोघा एसीपीची नियंत्रण कक्षात बदली केली. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाची तत्परता जनतेला दिसून आली. हे डान्स बार सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी नागरिकांकडून करण्यात येतात तेव्हा कारवाई करण्यासाठी तत्परता पोलिस का दाखवत नाहीत असा सवाल देखील उपस्थित होऊन गेला. दरम्यान, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली, भिवंडी, कल्याण शीळ रोड यांसारख्या उपनगरांमध्ये कोरोना काळात देखील डान्सबार सर्रास सुरूच आहेत. 2005 साली राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली. याच काळात म्हणजे 2005 ते 2015 या दहा वर्षाच्या कालावधीत ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत तब्बल 176 डान्सबारला मनोरंजनाच्या नावाखाली परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे डान्सबारवर बंदी होतीच कधी असा प्रश्न उपस्थित होतोय.
ठाणे, पनवेल, कल्याण शीळ रोड या परिसरात पूर्वीपासूनच डान्सबारचे जाळे आहे. येथील डान्सबार व त्यातील चालणाऱ्या छमछममुळे कधीकाळी साऱ्या राज्यातील आंबट शौकीन येथे येऊन मोठ्या प्रमाणात नोटांची उधळण करीत असत. त्यानंतर 2005 साली राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर बंदी आणली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. काहींनी डान्सबार बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले तर काहींनी या निर्णयास विरोध दर्शविला. दुसरीकडे संकटात आलेल्या बार चालकांनी या बंदी विरोधात थेट न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयीन कार्यपद्धतीचा वेळखाऊपणामुळे मोठया नुकसानीची कल्पना असलेल्या बार चालकांनी मग यातून कायद्याचा पळवाटा शोधण्यास सुरवात केली.
त्यातून मग पुढे आली ऑर्केस्ट्रा बारची संकल्पना. मनोरंजनाच्या नावाखाली या ऑर्केस्ट्रा बारला सर्रास परवाने देण्यात येऊ लागले. हे परवाने देतांना काही अटी घालण्यात आल्या होत्या. त्यात डीजेवर गाणे न वाजवता स्वत:चे वाद्य वाजवावे, काही मोजक्याच महिला सिंगर बार मध्ये गायक म्हणून ठेवण्यात याव्यात, वेळेचे बंधन पाळण्यात यावेत, अश्लील नृत्य करण्यात येऊ नये आदी नियमांचा समावेश होता. परंतु ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली परवाने घेणाऱ्या बार मालकांनी हे नियम फक्त कागदोपत्रीच पाळले. प्रत्येक्षात मात्र ऑर्केस्ट्रा ही डान्सबारचीच नवी आवृत्ती होती. आजही सुरू असलेल्या अनेक ऑर्केस्ट्रा बार मध्ये वेटर आणि सिंगरच्या नावाखाली शेकडो बारबाला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ठेवल्या जातात. तर वाद्यवृंद फक्त दाखवण्यासाठी असतो आणि मागे डीजे वाजवले जाते.
अनेकवेळा पितळ पडले उघडे - गृहमंत्रालयाने बारबंदीचा कायदा लागू केल्यानंतरही ठाणे, नवी मुंबईत रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी बार सुरू असायचे. डायघर परिसरात असलेल्या एका बारवर ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेच्या पथकाने काही वर्षांपूर्वी छापा टाकला होता. यावेळी या बारमध्ये एक डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्या डायरीत अगदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून तर पोलीस शिपाई पर्यन्त हप्ते वाटप करण्यात येत असल्याचा उल्लेख होता. या डायरीची दखल घेऊन तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी तब्बल 76 पोलिसांच्या मुख्यालयात बदल्या केल्या होत्या. त्या व्यतिरिक्त अश्लील नृत्य करणे, नोटा उडवणे, बारबालांना छुप्या खोलीत लपवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणे आदी करणाखाली अनेक वेळा पोलिसांनी विविध बारवर आता पर्यंत कारवाई केल्या आहेत. मात्र कारवाईचा हा फास फक्त काही तासांपुरताच असायचा. पोलिसांची पाठ फिरली की हे बार पुन्हा सर्रास सुरू होतात.
दहा वर्षात 176 बारला परवाने- 2005 साली डान्सबारवर बंदी आली असली तरी ठाण्यात 2005 ते 2015 या दहा वर्षाच्या कालावधीत तब्बल 76 डान्सबारला ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली परवाने देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक परवाने हे झोन 5 मध्ये वितरित करण्यात आले आहेत. वर्तकनगर, वागळे स्टेट, श्रीनगर, कापूरबावडी, कासारवडवली, चितळसर आणि कोपरी आदी पोलीस ठाण्यांचा झोन 5 मध्ये समावेश होतो. याच सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत 25 ऑर्केस्ट्रा बारला परवाने देण्यात आले आहेत. तर त्यापाठोपाठ झोन 3 मध्ये 22 बारला परवाने देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली - कोरोना काळात साऱ्याच गटातील जनता मोठ्या अस्मानी संकटास तोंड देत आहे. अनेकांचे व्यवसाय डबघाईस आले आहेत, अनेकांचा रोजगार हिरावलाय. मात्र तरी देखील अशा बिकटस्थितत शासनाने घालून दिलेले नियम सारेच पाळत आहे. गोर-गरिबांपासून दोन वेळेचे अन्न हिरावून घेणारे हेच शासकीय नियम डान्सबार वाल्यांना मात्र कदाचित लागू नसावेत. कारण, ठाण्यात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क शहरभर डान्सबारचा धांगडधिंगा सर्रास सुरू आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली, भिवंडी, कल्याण शीळफाटा आदी परिसरात कोरोना काळात देखील बार, हुक्का पार्लर, पब सर्रास सूरु आहेत.
अशा नियम धाब्यावर बसवणाऱ्या बार, हुक्का पार्लर विरोधात अनेक नागरिक लेखी अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार करतात. मात्र, तुमची तक्रार संबंधित खात्या पर्यंत पोहचवली आहे, असा रिप्लाय येण्यापलीकडे कुठलीही कारवाई पोलिसांकडून होत नाही. ठाण्यातील मोडेला चेक नाका परिसरात अशाच प्रकारे तीन बार संपुर्ण रात्रभर सर्रास सुरू असतात. या बारच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी असंख्य तक्रारी पोलीस दरबारी केल्या आहेत. परंतु त्यांची कुणीही दखल घेतलेली नाही. फक्त स्टिंग ऑपरेशन झाल्यानंतरच पोलीस त्याची दखल घेतात, सर्वसामान्य नागरिकांची कुणीही दखल घेत नाही हा अनुभव आहे. त्यामुळे, सब गोलमाल है भाई सब गोलमाल है, हेच वाक्य या साऱ्या परिस्थितीला शोभून दिसतंय.
0 टिप्पण्या