फाल्गून पौर्णिमेचे महत्व आणि आजचे वास्तव

 धम्मात पौर्णिमेचे अनन्यसाधारण महत्व आहे. पौर्णिमेच्या कालखंडात आकाशात पूर्णाकृती चंद्रामुळे त्याच्या पृष्ठभागावरून परिवर्तीत होणारी किरणं पृथ्वीवर येईपर्यंत त्यातील उष्णता अवकाशातील विविध घटक शोषूण घेतात. त्यामुळे चंद्राच्या किरणांचा मिळणारा प्रकाश शीतल व अल्हाददायक वाटतो, हे विज्ञानाने स्पष्ट केले आहे. चंद्र व पृथ्वी या दोन ग्रहांच्या परिवलन आणि परिभ्रमण क्रियेमुळे मधल्या पंधरा दिवसाच्या अंतराने येणाऱ्या आमावास्या ते पौर्णिमेपर्यंतचा कालखंड नजरेसमोर ठेवून इथल्या धर्मप्रामाण्यवादी व परंपरागत रूढीवाद्यांनी त्याचे अवडंबर केले, इतके की चंद्राला चक्क देवीदेवतांच्या माळेत गोवले. तर इस्लाम धर्माने धर्मध्वजावर स्थान दिले! धर्म कोणताही असो, तो मुलतः स्वच्छ आणि निरामय असतो. स्वार्थासाठी धर्म नियमांच्या नावाखाली धर्माचा वापर केल्याने समाजावर पकड घेता येते. अनुयायांवर अवडंबरात्मक आणि अंधानुकरण लादले की, मानसिक गुलामीद्वारे समाजातील विशेषतः तळागाळातील लोकांना सहज अंकीत करता येते हे धर्माच्या ठेकेदारांनी ओळखल्याने विज्ञानवादी भूमिकेशी फारकत घेतली गेली. बौद्ध धम्माने विज्ञानाच्या कसोट्यांना त्या काळात प्राधान्य दिल्यामुळे धम्माला हितशत्रू निर्माण झाले हे वास्तव होते व आजही ते कायम आहे.

भारतीय समाजीच नव्हे तर जागतिक स्तरावर कोणत्याही राष्ट्रामध्ये जा, समाजाचा आणि संस्कृतीचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचे दिसेल. सांस्कृतिक अध्ययनाची केंद्रे त्याकाळात अस्तित्वात होती. विज्ञानयुगात मात्र अशाप्रकारच्या केंद्रांकडे बहुजनवाद्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. भारताच्या अखंड एकतेचे मर्म सांस्कृतिक उभारणीत असल्यामुळे त्या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. मानवतावाद हाच धम्माचा पाया असल्याचे सांगणाऱ्यांना परिवर्तन म्हणजे नेमके काय या प्रश्नाचे ठोस उत्तर देता येत नाही,  हे आजचे वास्तव आहे.

बौद्ध धम्म विज्ञानाच्या कसोट्यांवर आधारित असून, विज्ञान पुराणमतवादाचा नेहमीच विरोध करीत आले आहे. पण पारंपरिकता जपणाऱ्यांचा विज्ञानापेक्षा चमत्कारावर अधिक विश्वास असल्याने त्यांचा प्रवाह नेहमीच उलट दिशेने राहिल्याचे जाणवते. पौर्णिमेला धम्मात जेवढे महत्व आहे तितकेच किंबहुना त्यापेक्षाही अधिक म्हटले तरी चालेल, अधर्मात मावास्येला दिले जाते. धम्म सत्य ही संकल्पना प्रमाण मानतो, तर अधर्म अनाकलनीय कल्पनेवर भर देतो. धम्म अवतार निषिद्ध मानतो, याउलट अधर्मात अवतार संकल्पना, भूत, प्रेत, आत्मा-परमात्मा जोतिष, भविष्य, कर्मकांड, उपासतापास या प्रकारांना प्राधान्य देतो. स्वर्ग-नरक या संकल्पनेचा प्रचंड पगडा असून त्यात खितपत पडण्यात धन्यता मानणारा मोठा वर्ग पाहवयास मिळतो. याउलट समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय व मानवता या गुणतत्वांना प्राधान्य देत तर्कशुद्ध जीवनमार्गाची प्रस्थापना करण्याचे अतुलनीय कार्य करणारा पहिला सामाजिक क्रांतिकारी विचारवंत म्हणून तथागत गौतम बुद्धांकडे पाहिले जाते. वैशाख पौर्णिमेला तथागतांचा जन्म आणि बुद्धत्वप्राप्ती! आषाढ पौर्णिमेला गृहत्याग, याच पोर्णिमेला सारनाथ येथील मृगदाय वनात कौण्डिन्य, वप्प, भद्दिय, अस्सजित व महानाम  या पाच शिष्यांना धम्मदेसना देऊन तथागतांनी  ' धम्मशासन  ' आणले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. तथागतांच्या सहवासात ज्या,ज्या व्यक्ती आल्या, त्यांचे नाव इतिहासात अजरामर झाले. पत्तीदान गाथेतील हा संकल्प काय सांगतो?

 इच्छितं पत्थितं तुह्य खिप्पमेवसमिज्जतु ।
 सब्बे पुरेन्तु चित्त संकप्पा चन्दोपन्नरसोयथा ।
अर्थ : तुमच्या इच्छित आणि प्रथित सर्व वस्तू तुम्हाला शीघ्र मिळोत. तुमच्या चित्ताचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण व्होवोत.

या गाथेचा आणि फाल्गून पौर्णिमेचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाशी अत्यंत जवळचा संबंध आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. खरेतर पुण्यानुमोदन कार्यक्रमात ही गाथा म्हणण्याचा प्रघात आहे.धम्म संघटनांनी तसे नियम केले असून, प्रथा म्हणून पाळायची की त्याविरूद्ध आचरण करायचे हा प्रश्न कोणा सूज्ञ व्यक्तीस पडला तर ते धम्मविरोधी कृत्य ठरेल काय? याबाबत मंथन होणे गरजेचे आहे. मुळात या गाथेतील  संकल्पानुसार प्रत्येक क्षणात मांगल्याचा विचार अभिप्रेत आहे. तो पुण्यानुमोदनच्याच दिवशी व्यक्त केला पाहिजे असे धम्मसाहित्यात कोठेही म्हटलेले नाही याचाही विचार व्हायला हवा. फाल्गून पौर्णिमेचे महत्वदेखील ह्याच संकल्पनेवर आधारित आहे. भन्ते राहुल व नंद या दोघा भावांना तथागतांनी याच पौर्णिमेस दिक्षा दिली.. राहुल पित्याप्रमाणेच विनयशील होते. तथागतांचे कपिलवस्तुला आगमन होणार असल्याचे वृत्त कळताच त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात येते. पण राजवाड्यात न जाता भगवंत भिख्खूगणांसोबत त्यांच्यासाठी तयार केलेल्या विश्रामगृहाकडे वळतात. लहानग्या कुमार राहुललाही समजते, उपस्थित भिख्खूगणात आपले पिता आहेत, पण ओळखायचे कसे? पुढील वास्तव जीवनातला भाग वाचकांना ज्ञात असल्याने त्याच्या प्रस्तावनेत न जाता आम्ही फाल्गून महिन्यातील पौर्णिमेचे महत्व लक्षात घेऊन, आमच्या परंपरा जपताना वर्तमानातील घटनांच्या बौद्ध म्हणविणाऱ्या आमच्यावर काही कारकांचा परिणाम होत आहे काय?  असल्यास ते कोणत्या प्रकारचे आहेत? या परंपरांचे, पात्रता नसतानाही पाईक होण्याची तत्परता दाखविण्यात  आम्हाला खरेच आनंद वाटतो की, आम्ही त्यापासून फारकत घेण्याची प्रतिज्ञा करतो? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा थोडासा प्रयत्न करूनच लेखाच्या समारोपाकडे वळुया...

फाल्गून सुरू झाला की, अधर्मातील अपप्रवृत्तींंना वेगळ्याच गोष्टींचे वेध लागतात. या प्रवृत्तींच्या समर्थकांनी तो सामाजिक व सांस्कृतिकतेचा भाग म्हणून प्राधान्य देऊन, तिखटमीठ लावण्याचा प्रयत्न करून त्यातील सत्यार्थता पडताळण्याची तसदी घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. सामान्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवीत कर्जबाजारी जनतेकडून दामदुपटीने पैसे वसूल करताना बेहिशोबी मालमत्तेचा संचय करणाऱ्या सावकारशाही अर्थात भटशाहीचा हा गणिती महिना म्हणूनही फाल्गून महिन्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन असे. ' आल्गून फाल्गून होळी आणि शिमगा '  अशी मोजणी करून तिप्पटीने पैसे उकळण्याचे कारस्थान करणारी सोनेरी टोळी आम समाजाचे शोषण करीत होती. गंमत अशी की, याच परंपरेला उरापोटाशी कवटाळणारे लोक आजही होळी पेटवून, दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी करण्याची प्रथा आजही कायम आहे. शहरी भागात त्याला 'रंगपंचमी ' हे गोंडस नाव देण्यात आले आहे. होळी जाळल्यानंतर तोंडावर उलट्या हाताने बोंबा मारण्याची प्रथा आजही पाहवयास मिळते. अनुकरणप्रियतेशी जवळचा संबंध म्हणजे होळी होय!

होळी सणाचा मूळ इतिहास त्या उत्सवाच्या समर्थकांनी तरी वाचला आहे काय? पारंपरिकतेतून निर्माण झालेले सामाजिक आदर्श जपलेच पाहिजेत.  आदर्श आणि नीती ही जुळी भावंडे होत!  असे असले तरी प्राप्तस्थितीत दोन्ही एकत्र नांदतीलच असे नाही. आदर्शांची सामाजिक आणि नैत्तिक अशी रूपे आहेत. याचाच अर्थ दोघेही एकमेकांना पूरक असल्याने त्यांच्यात फारकत झाल्यास दोघांपैकी कोणाला बाजूला करायचे? हा पेच उभा ठाकतो. सामाजिक ऋणानुबंध आणि नाळ हा खूप दूरचा विचार आहे. सणांच्या माध्यमातून समतेचा विचार करणे म्हणजे नेमके काय? या प्रश्नावर खूप चर्चा केली जाते,  पण त्याचा पाठपुरावा करण्याची तसदी घ्यायची मानसिक तयारी नसल्याने अनेक प्रश्न उत्तरांची अपेक्षा बाळगीत हजारो वर्षांपासून रांगेत उभे आहेत! 

ग्रामीण भागात होळी उत्सवाला शिमगा असेही म्हटले जाते. होळीमागे पौराणिक कथांचा ठासून भरलेला मसाला तरी शिमग्याचे तसे नाही. कोकणात गणपतीइतकेच शिमग्याला फार महत्व आहे. येथे ग्रामदैवतेच्या पालखीची मिरवणूक, कुळांचे मानपान हे प्रकार सर्रास चालतात. मानपानात थोडीशी त्रुटी राहिल्यास मारामाऱ्या करण्यापर्यंत लोकांची मजल जाते. रत्नागिरी जिल्ह्यात एका गावी म्हणे भांडणापायी कोर्टात सुमारे ३९ वर्षे प्रकरण पडून होते. त्याचा निकाल २०११ साली लागला! " मोडेन पण वाकणार नाही " ही अहमहमिका जोपासताना, दांभिक अहंकाराला कवटाळल्यावर नेमके कशासाठी हे प्रकार होतात?  देवीदेवतांच्या पुजेचा मान आपल्याकडेच असायला हवा असे मानणारे दैवतांनाच वेठीस धरत असतात असे का वाटत नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.  स्पष्टच सांगायचे तर बहुजनवादी सामाजिक उतरंडीवर उभे असल्याने त्यांची आजही घसरण सुरू आहे.  मानपानामुळे भांडणे ठरलेली. प्रसादाचा मानही अमूक एकाकडे असतो. 

चंगळवादाचे दुसरे नाव ' शिमगा' होय!  आवडीची दारू आणि बोकडाची सागुती (मटण), वडे हा आहार पोटात गेला की, झाले समाधान. थोडक्यात परंपरांचा हा शिमगा साजरा करताना, रूसव्या फुगव्यांना प्राधान्य देण्याने कोणता आदर्श ठेवू शकतो? या प्रश्नाचे उत्तर संबंधितांकडे नसते. होळी जाळताना व जळत असताना, उलट्या हाताची मूठ करून बोंबा मारण्याचा पूर्वार्धात उल्लेख आलेला आहे. अधर्मवाद्यांच्यात मृत मनुष्यावर अंत्यसंस्कार करताना, चितेभोवती फेऱ्या मारण्याची पद्धत आहे. खांद्यावर पाण्याने भरलेल्या मडक्याला भोक पाडून त्याची धार सरणावर असलेल्या प्रेताभोवती फिरवायची आणि शेवटी पाण्याने अर्धवट भरलेले ते  मडके प्रेताकडे पाठ करून सोडून द्यायचे. ते फुटल्यावर नातलगाने बोंब मारायची! यामागील हेतू असा की, आपल्या वाईटावर असलेला जो कोणी असेल त्याचे तळपाट होवो या अर्थाने व्यक्त केलेला आक्रोश, चीड म्हणजे बोंब होय. जो पुढे वाक्रप्रचार म्हणूनही रूढ झाला.

मुंबईत  जे. जे. हॉस्पिटल परिसरात अर्थात जून्या नागपाडा परिसरात ज्ञानवर्धक मंडळाच्या अधिपत्याखाली २६ मार्च १९१० साली महर्षी वि.रा.शिंदे, रावबहादूर सि.के.बोले, आणि भालचंद्र भाटिवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिले होलीका  संमेलन भरले होते. संमेलनाच्या निमित्ताने महर्षी शिंदे यांनी दिलेली माहिती समर्थकांनी वाचावी म्हणजे अज्ञान दूर होण्यास मदत होईल.

" हजारो वर्षांपासून हा होळीचा सण चालत आलेला आहे. जेथे जेथे आर्यांची वस्ती आहे तेथे तेथे हा सण साजरा करण्यात येतो.  सैबेरियात उत्तर किनाऱ्यावर आर्यांची वस्ती होती. ' शिमगा हा सिमगः '  या शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या दिवशी सीमघ म्हणजे सूर्य सीमेवर येतो त्या दिवशी हा उत्सव साजरा करावयाचा असतो. अशी प्राचीनकाळी चाल होती."

महर्षी शिंदे यांनी खूप विस्तारीत असे  वर्णन केले असून मी ते कमी शब्दात अर्थात  संक्षिप्तपणे मांडले मांडले. उत्तरीय सैबेरियन प्रदेशात अनेक महिने सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर सूर्याच्या किरणांचा स्पर्श होताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. हा आनंदोत्सव साजरा करताना रंगांची मुक्त उधळण केली जायची, जी प्रथा खैबरघाटीमार्गे भारतात आल्यानंतरही आर्यांनी सुरू ठेवली! यावरून भारतीय संस्कृतीचे गोडवे गाणारे,  आपण कोणाचे अनुकरण करत आहोत यापासून थोडातरी बोध घेतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. रंगपंचमीच्या नावाखाली विषारी रसायनमिश्रीत रंग फेकण्याने त्वचारोग होतात हा डॉक्टर मंडळी सल्ला देत असतात. तरीदेखील लोकांचा उत्साह कमी होत नाही. 

होळी म्हणजे विकृतीचा अतिरेक होय. रस्त्याने चालणाऱ्या मनुष्याच्या अंगावर गच्चीवरून पाण्याने भरलेला फुगा मारून तोंड लपवणे या प्रकारामुळे आम्ही त्या कृतीला विकृती असे म्हणतो, जी समाजमान्य झालेली आहे. मेंदूला झिंग आणणारी दारू आणि यथेच्छ मांसाहार हे सारे आर्यांचे आदर्श भारतीय कसे होऊ शकतात? या साऱ्या प्रथांना बौद्ध धम्मात थारा नाही. त्यापासून दूर असणाऱ्यांना कोणत्याही व्याधी होत नाहीत. धम्मात बोंब नाही, पण प्रेमाचे कोंब रुजविण्याची शिकवण आहे.. एकमेकांना विचारांची दिक्षा द्या असे सांगणारी ही पौर्णिमा आपल्याही जीवनात मांगल्याच्या किरणांचा कवडसा निर्माण करो भीच मंगलकामना

 गुणाजी काजिर्डेकर,
चेंबूर,मुंबई         ९३२३६३२३२०
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या