भारतीय राजकारणातील झंझावात - कांशिराम

 

१५ मार्च, इ. स. १९३४ रोजी पंजाबमधील रोपड जिल्ह्यातल्या खवासपूर गावी एका दलित रविदासिया/शीख चांभार जमातीतील कुटुंबात जन्म घेतलेले काशिराम पुढे भारतीय राजकारणातील झंझावात बनतील असे त्यावेळेस कदाचित कुणाला वाटलेही नसेल.  कांशीराम  पुण्याच्या दारुगोळा फॅक्ट्रीमध्ये क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत होते. याच ठिकाणी राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणारे दीनाभाना हे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. ते याठिकाणी एससी, एसटी वेलफेअर असोसिएशनशी संबंधित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टीवरुन दीनाभाना यांचा आपल्या वरिष्ठासोबत वाद झाला. या कारणावरुन त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्रातील डी. के. खापर्डे यांना देखील निलंबित करण्यात आलं. ते महार जातीचे होते. कांशीराम यांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते म्हणाले की, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी न देणाऱ्यांची जोपर्यंत मी सुट्टी करत नाही तोपर्यंत मी शांतपणे बसू शकत नाही. तेथूनच कांशीराम  बहुजनांकरीता संघर्षात उतरले. त्यांना देखील निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी त्या अधिकाऱ्याला मारहाण केली ज्यांनी त्यांना निलंबित केलं होतं. ही ती घटना आहे ,ज्यामुळे दलित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी काम करणाऱ्या सर्वात मोठी संघटना बामसेफचा  जन्म झाला. त्यानंतर डीएस-4 आणि बसपाची स्थापना केली. 

बामसेफच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकत्रित करण्याचे काम सुरु होतं. यासोबतच सामान्य बहुजनांचे संघटन करण्यासाठी कांशीराम यांनी 1981 मध्ये डीएस-4ची (दलित शोषित समाज संघर्ष समिती) स्थापना केली. याचा नारा होता 'ठाकूर, ब्राम्हण, बनिया छोड, बाकी सब है डीएस-४'. हे एक राजकीय व्यासपीठ नव्हतं. मात्र या माध्यमातून कांशीराम यांनी फक्त दलित नाही तर अल्पसंख्यांकांना देखील एकत्र करण्यास सुरुवात केली होती. डीएस- 4च्या माध्यमातूनच त्यांनी जनसंपर्क अभियान सुरु केलं. सायकल मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सात राज्यांमध्ये जवळपास 3,000 किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला. या माध्यमातून ते इथल्या बहुजनवर्गाला एकत्र आणत होते. कांशीराम येथेच थांबले नाही. 1984 साली कांशीराम यांनी निर्णय घेतला की, 'राजकीय सत्ता अशी चावी आहे ज्या माध्यमातून सर्व टाळे खोलू शकतो.' कांशीराम यांनी निवडलेल्या या नवीन मार्गामुळे बामसेफचे काही संस्थापक सदस्य वेगळे झाले. अशामध्ये त्यांच्यासोबत असलेले बामसेफ कार्यकर्तेसोबत त्यांनी आपली पुढील लढाई सुरु केली.

कांशीराम यांना आंदोलनातला प्रदीर्घ अनुभव होता आणि राजकारणाचीही उत्तम जाण होती. त्यामुळं बामसेफ सोडण्याच्या आधी 1980 मध्ये एप्रिल ते जून महिन्यात त्यांनी एका मोठ्या कार्यक्रमाची घोषणा केली. तो कार्यक्रम होता " अंबेडकर ऑन व्हील्स " या कार्यक्रमांतर्गत डॉ.आंबेडकरांचे विचार आणि शिकवण देणारं प्रदर्शन त्यांनी तयार केलं होतं आणि सर्व देशभर ते प्रदर्शन नेवून लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोहिमच त्यांनी हाती घेतली. त्यामुळं  समाजात नवी जागृती निर्माण झाली. हे करत असताना त्यांनी त्यात कुठेही राजकारण आणलं नाही की लोकांना मतं मागितली नाहीत. त्यामुळं लोकांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला. "अंबेडकर ऑन व्हील्स" हे प्रदर्शन उत्तरेतल्या 9 राज्यामध्ये 34 ठिकाणांवर दाखवलं गेलं. या मोहिमेमुळं कांशीराम यांना अनेक नवे कार्यकर्ते मिळाले. संघटनेच्या विस्तारासाठी वातावरण निर्माण झालं. लोक वर्गणी देऊ लागले. कांशीराम यांना जे आंदोलन अपेक्षीत होतं तशा वातावरणाची निर्मिती होऊ लागली होती.  याच उपक्रमामुळं कांशीराम यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत कधीही कुणाकडे पैसे मागावे लागले नाही. कार्यकर्त्यांनी दिलेल्या देणगीतूनच संपूर्ण आंदोलनाचा कारभार चालत असे. कांशीराम यांनी दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील दलित कर्मचाऱ्यांची एक मजबूत संघटना स्थापन केली. तेव्हा त्यांनी समाजाला सांगितलं होतं की, 'त्यांना जर स्वत:चा उत्कर्ष साधायचा असेल तर मनुवादी समाज व्यवस्था मोडून काढली पाहिजे.'

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कांशीराम यांचं प्रेरणास्थान. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांनी दिलेल्या त्रिसुत्रीचा आधार घेत त्यांनी राजकारण केलं आणि देशाच्या राजकारणात प्रस्थापित राजकीय पक्षांना जोरदार धक्का दिला. सर्वांना त्याची दखल घ्यावी लागली. ''राजकीय सत्ता ही तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आहे'' हा बाबासाहेबांचा विचार त्यांनी आत्मसात केला होता. त्याच्या प्रत्येक सभेत ते हे वाक्य वारंवार सांगत असतं.    1980चं दशक संपत आलं होतं. आणीबाणी नुकतीच संपली होती. जनता पार्टीतल्या भांडणामुळं लोकांना पुन्हा एकदा काँग्रेस हाच पर्याय वाटत होता. 1980 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला विजयी करून लोकांनी ते दाखवूनही दिलं. पण आता लोक पर्यायांचा विचार करू लागले. दक्षिण भारतात अनेक प्रादेशिक पक्ष पुढं येत होते. त्यांचं अस्मितेचं राजकारण सुरू होतं. ही अस्मितेची लाट उत्तरेतही आली होती. 

संजय गांधींच्या मृत्यूने काँग्रेसला धक्का बसला होता. तरूण नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती.    जातीय आणि अस्मितांच्या राजकारणात काँग्रेसचं अपयश हे नव्या पक्षांसाठी संजीवनी ठरलं.त्या काळात काँग्रेसचा दलित चेहेरा होते बाबू जगजीवनराम. पण जगजीवनरामच काँग्रेसची साथ सोडून जनता पार्टीत सहभागी झाले होते. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी ज्या 'रिपब्लिकन पार्टी' ची स्थापना केली तो पक्षही गटातटात विभागला गेला. सामाजिक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी 'रिपब्लिकन पार्टी'ने राजकारणावरच सगळा भर दिला. सत्तेची चव चाखल्यानंतर जे व्हायचं तेच झाल. नेतृत्वाचा संघर्ष, अहंकारामुळं या पक्षाची अनेक शकले झाली. परिणामी त्याचा जनाधार आटत गेला. 'दलित पॅथर्स' सारख्या आक्रमक संघटनांचा प्रभाव फारसा टिकू शकला नाही. त्यामुळं कांशीराम यांना दलित राजकारणातली पोकळी भरून काढण्याची मोठी संधी मिळाली.  1980 मध्ये मंडल आयोगाने दलितांसाठी 27 टक्क्यांच्या आरक्षणाला मान्यता दिली होती. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना मिळणाऱ्या 22.5 टक्के आरक्षणापेक्षा हे आरक्षण वेगळं होतं. सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळाल्याने अनेक जाती-जमातींमध्ये नवी प्रेरणा मिळाली. लोकांमध्ये नवी जागृती झाली. कांशीराम यांच्यासाठी हे वातावरण अत्यंत पोषक होतं.   आपली सर्व शक्ती त्यांनी संघटनेसाठी दिली होती. आपला आधार वाढत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पक्षाची स्थापना केली. त्यानंतरचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. मात्र 9 ऑक्टोबर 2006 मध्ये बसपाचे संस्थापक कांशीराम यांचं वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. एका झंझावाताचा अंत झाला. कांशीराम यांनी आपल्या कतृत्वानं राजकारणात एक वेगळी छाप टाकली आणि देशातला तिसरा सर्वात मोठा राजकीय पक्ष निर्माण केला. 

- संकलन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1