Top Post Ad

पेशवाई गाडल्याचे प्रतिक... इतिहास पुसण्याचा प्रयत्न

पेशवाई गाडल्याचे प्रतिक म्हणून भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला लाखोंच्या संख्येने भारतभरातून आंबेडकरी अनुयायी जमा होतात. पेशवाईवर विजय मिळविला तो प्रामुख्याने महार समुदायाच्या लोकांनी म्हणून आपल्याला किती तो अभिमान? अभिमान असलाच पाहिजे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण त्या विजयस्तंभाबाबतच्या मालकी हक्क व अतिक्रमण याबाबत न्यायालयीन लढाई सुरू आहे हे किती लोकांना माहीत आहे?  सदरचा विजयस्तंभ हा खाजगी मालकीचा असल्याबाबतची ही दिवाणी न्यायालयात प्रलंबित दावा आहे. याबाबत संक्षिप्त माहिती देत आहे. माळवदकर यांचे काम विजयस्तंभाची देखरेख करणे, दिवाबत्ती लावणे व साफसफाई करणे हे होते. 

        पेशवाईवर विजय मिळवून इंग्रजांनी ज्या भीमा नदीच्या काठावर ही लढाई झाली तिथे विजयाचे प्रतीक म्हणून विजयस्तंभ बांधण्यास दिनांक २६ मार्च १८२१ सुरवात केली आणि त्याचे बांधकाम दिनांक १३ डिसेंबर १८२४ रोजी पुर्ण झाले. सदरच्या विजयस्तंभाची देखरेख करण्यासाठी खंडोजीबिन यांची नेमणूक केली. या खंडोजी यांचा चरितार्थ चालावा म्हणून इंग्रजांनी वाडेबोल्हाई, केसनंद, पिंपरी,बकोरी,सांडस आदी ठिकाणी जवळपास २६० एकर जमीन दिली. या खंडोजीबिन इंग्रजांनी जयस्तंभाची देखरेख करण्यासाठी खंडोजीबिन यांची निवड केली होती .       कालांतराने म्हणजेच खूप वर्षानंतर माळवदकर कुटुंबियांनी आम्ही खंडोजिबिन यांचे वंशज असून विजयस्तंभाची ३ हेक्टर ८६ आर इतकी जमीन स्वताच्या नावे लावून घेतली. त्या जागेवर अतिक्रमण पण केले. सदरच्या जागेवर अतिक्रमण करून तो जयस्तंभ आपल्याच मालकीचा असल्याबाबतची ही केस आहे. 

 सदरच्या जागेमधील संपूर्ण अतिक्रमण हटवावे यासाठी भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासकीय पातळीवर निवेदने देऊन कारवाईची मागणी केल्यानंतर  जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार हवेली आणि इतर शासकीय कार्यालयांमार्फत २०१२ रोजी अतिक्रमण हटवले आहे तसेच उपविभागीय अधिकारी यांनी २०१७ साली सदरच्या विजयस्तंभाच्या ७/१२ मधून माळवदकर कुटुंबियांचे नाव हटवण्याचा आदेश दिला व नाव हटवण्यात आले आहे . सध्या हे प्रकरण सदरचा विजयस्तंभ आणि त्या स्तंभाच्या भोवतालच्या परिसरासंदर्भात पुणे दिवाणी न्यायालयात निकाल लागला असून तो निकाल माळवदकर यांच्या विरोधात लागला आहे आणि त्याविरुद्ध दिवाणी न्यायालयाच्या अपिलाला सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहे. हायकोर्टात अपील केस सुरू आहे. परंतु मुळ दावा पुण्याच्या दिवाणी न्यायालय पुणे सुरु आहे. सातबाऱ्यावर नाव कमी केले आहे याबाबत हायकोर्टात माळवदकरानी धाव घेतली आहे. 

       

    न्यायालयीन लढाई आणि भीमा कोरेगावच्या युद्धाचे वास्तव या दोन भिन्न गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टी एकत्रित करता येणार नाहीत. पुर्वीच्या काळी मोठमोठ्या वास्तूंची रखवाली, देखरेख करण्यासाठी जमादार (शिपाई अथवा नोकर) नेमले जायचे. जमादाराचे काम त्या वास्तूंची देखरेख करणे असायचे. अशा जमादारांच्या उदरनिर्वाहासाठी जमीन दिली जायची. अशी अनेक उदाहरणे भारतात सापडतील. याचा अर्थ असा नसतो की ती ऐतिहासिक वास्तू जमादारांच्या (नोकरांच्या अथवा शिपायांच्या) नावे केली आहे. कित्येक गड, किल्ले, मंदिरे, पुरातन वास्तूंची देखभाल पिढ्यानपिढ्या एकाच कुटूंबातील सदस्यांकडे असते आणि ही सर्वसामान्य गोष्ट आहे. पण भीमा कोरेगावच्या जयस्तंभाबाबतची हि केस वेगळी आहे. इथे कुंपणच शेत खात आहे. भीमा कोरेगावच्या जयस्तंभाची जागा आणि मालकी हक्क व अतिक्रमण व भीमा कोरेगावच्या लढाईचे वास्तव वेगवेगळे आहे. भारतीय पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, संबंधित खाती यांनी या कामात लक्ष घातले पाहिजे पण शासकीय कार्यालयांचा याबाबतचा उदासीनपणा, खाबुगीरी जबाबदार आहे. सदरचा प्रकरण पुणे जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात व हायकोर्टात आहे पण हे प्रकरण हायकोर्टात लावून धरण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. न्यायालयात बाजू लावून धरणे खर्चिक बाब असते. 

भिमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीमार्फत हे प्रकरण दादाभाऊ अभंग यांनी कोर्टात लावून धरले आहे. आजतागायत सदर प्रकरणात दादाभाऊंनी खूप मेहनतीने लढाई दिली आहे आणि  अनेक निकाल जिंकलेले पण आहेत. 

             इतिहासाची मोडतोड तर होतच आहे पण इतिहासातील वस्तूही आणि वास्तूही माझ्याच मालकीच्या आहेत असे सांगून त्या लाटण्याचा प्रकार करणे अशा पध्दतीची हा पहिलाच दावा असावा. सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याने दादाभाऊंना या प्रकरणी काही विधाने करता येत नाहीत,लिहीता येत नाही अथवा बोलता येत नाही. पण आपली जबाबदारी आहे की या प्रकरणी आपण आवाज उठवला पाहिजे. सदरचा विजयस्तंभ हा खाजगी मालकीचा नसून तो  ऐतिहासिक आहे आणि आपल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक विजयाची निशाणी आहे. त्याच्यावर कोणी व्यक्ती, संस्था दावा करु शकत नाही. माळवदकर कुटुंबासाठी प्रतिगामी शक्ती कामाला लागल्या आहेत. या लढाईत आपल्या विरोधातील यंत्रणा उतरली आहे. भीमा कोरेगावच्या लढाईमुळे ज्यांच्या पूर्वजांची सत्ता गेली ते लोक या कायदेशीर लढाईत अप्रत्यक्षरित्या सहभागी झाले आहेत.

पेशवाई हरली आणि बदनाम झाली या बदनामीची आणि हरण्याची सल आजही त्यांच्या मनात आहे.  ही सल त्यांना बोचत आहे. या ऐतिहासिक घटनेचा बदला घेण्यासाठी नवीन कळसूत्री बाहुले उभे केले आहे. पेशवाई ही वाईट नाही आणि आपल्या कमरेला बांधलेल्या झाडूला आणि गळ्यात  बांधलेल्या मडक्याला पेशवाई जबाबदार नाही अशा पद्धतीची मांडणी केली जात आहे. १८१८ पर्यंत शिवशाही होती आणि अप्रत्यक्षरित्या शिवशाही या जबाबदार होती अशी मांडणी केली जात आहे. पण वास्तव हे आहे का? याची सत्यता पडताळून पाहिली तर ते अत्यंत चुकीचे आहे हे दिसून येईल.भीमा कोरेगावच्या जयस्तंभाची जागा हडप करण्यासाठी खुप मोठी यंत्रणा उभी आहे. माळवदकराने लिहीलेल्या पुस्तकाची प्रती फुकट वितरीत करण्याची जबाबदारी प्रतिगाम्यांनी घेतली आहे. चुकीच्या पद्धतीने मांडलेला इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रतिगामी शक्ती कामाला लागल्या आहेत. आता ही न्यायालयीन लढाई मोठी झाली आहे. आपण सर्वांनी तन मन धन देऊन आपली ताकद उभी करावी लागणार आहे. आपली जबाबदारी वाढली आहे. 

बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १९२७ रोजी भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भेट दिली होती आणि तेव्हा या विजयस्तंभाबाबत गौरवोद्गार काढले होते. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाचा अभिमान होता. त्यांनी या विजयस्तंभाची स्तुती केली होती आणि भीमा कोरेगावच्या लढाईतील पराक्रमी सैनिकांना मानवंदना दिली होती. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाबाबतचे सध्याचे राजकारण आणि न्यायालयीन दावे पाहता आपल्या पराक्रमी पूर्वजांचा इतिहास पुन्हा एकदा मातीमोल करण्यासाठी प्रतिगामी शक्ती कामाला लागल्या आहेत हे स्पष्ट आहे. आपणच आपल्या विजयाची साक्ष देणाऱ्या जयस्तंभाची जपणूक करण्याची गरज आहे. त्यासाठी राजकीय मतभेद दूर करण्याची गरज आहे. सदरच्या जयस्तंभाची कायदेशीर लढाई जिंकायची असेल तर दादाभाऊ अभंग यांना मदत करावी. ही लढाई आता मोठी आहे सध्या माळवदकर कुटुंबाकडून जी यंत्रणा उभी राहत आहे ते बघता आपल्याला पण सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे असून यासाठी तन,मन व धन देऊन प्रत्यक्ष फिल्डवर आपण काम करू या व विजयस्तंभ व परिसरातील जागा हडप करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना न्यायलयाच्या माध्यमातून चारी मुंड्या चीत करू या..

आपल्याला विनंती आहे की या अस्मितेच्या लढ्यात तन,मन व धन देऊन सामील व्हा..

सतिश भारतवासी, कोल्हापूर. 


--------------------


भिमा कोरेगावच्या लढाई संदर्भातील आणखी एक पुरावा !
" The religious life of india THE MAHAR FOLK a study of untouchables of Maharashtra " 
या पुस्तकात "अलेक्झांडर रॉबर्टसन" या ब्रिटीश इतिहासकाराने असं लिहलंय की... 
मराठ्यांच्या घोडदळ सैन्यात खुद्द मराठे तर पायदळ सैन्यात महार व मांग यांचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी महारांच्या नावापुढे "नाक" तर मांगांच्या नावापुढे "राऊत" ही पदवी लावली जात होती.. 
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभावर ज्या जखमी व शहीद वीरांची नावे कोरण्यात आली आहेत त्यातील शहीदांच्या नावापुढे देखील "नाक" ही पदवी लिहलेली आहे..!
तर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे १९४१ ते १९४६ दरम्यान ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या महार रेजिमेंट च्या बॅचवर "कोरेगाव" असं नाव व भिमा कोरेगाव येथील विजय स्तंभाचं चिन्ह लावण्यात आलं होतं. 
भारतातील महाराष्ट्रातील महार समाजातील सैनिक हा ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे आर्मीचा मुख्य आधार होता. हा बिल्ला दुस-या महायुद्धाचा असला तरी, युद्धाचा सन्मान आणि त्यावरील विजयस्तंभ हे 1818 मध्ये झालेल्या कोरेगावच्या लढाईचे स्मरण करते, जेथे महार सैन्याने ईस्ट इंडिया कंपनीला पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करण्यास मदत केली होती. याच विजयाच्या स्मरणार्थ, ईस्ट इंडिया कंपनीने कोरेगावमध्ये 'विजय स्तंभ', उभारला आहे. 
 त्यामुळे वरील गोष्टींवरून हेच सिद्ध होतं की भिमा कोरेगावच्या लढाईत ५०० महार सैनिक सहभागी होते आणि त्यांनीच ब्रिटिशांना हा विजय मिळवून दिला आहे.
सध्या एक पुस्तक छापून काही मनुवादी विचारसरणीचे लोक मुद्दामहून हा इतिहास खोटा ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत..!
पण त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही अशी कितीही पुस्तके छापली तरी महारांचा गौरवशाली इतिहास जगापासून लपवून ठेऊ शकत नाही...!

    





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com