डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पित करण्यासाठी एका ठराविक जाती धर्माची व्यक्ती असणे गरजेचे नाही. तो सर्वांचा अधिकार आहे. परंतु, काही लोकांनी नुकतेच या ठिकाणी यायला सुरुवात केली. ही चांगलीच गोष्ट आहे. काही लोक माझ्यासोबत नमाजला यायचे. आता ते प्रथमच चैत्यभूमीवर दिसून आले. यापूर्वी ते कधी या ठिकाणी आले का? याबद्दल मला तरी माहिती नाही. असे खोचक मत अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केले. जात प्रमाणपत्रावरून वादात सापडलेले एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर पोहोचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी वानखेडे येथे पोहोचले असता त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सूत्रांच्या माहितीनुसार, वानखेडे यांनी चैत्यभूमीवर डॉ. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची भेट घेतली. चैत्यभूमीवर वानखेडे यांच्यासह राज्यातील अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक सुद्धा पोहोचले. यावेळी त्यांनी कुणाचेही नाव न घेता वानखेडेंवर निशाणा साधला
चैत्यभूमीतून थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. कोरोनाचे नियम पाळून बाबासाहेबांच्या विचारांवर भीमगीते, जलसा, विचारमंथनाचे कार्यक्रम सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत चैत्यभूमीसह चाळी, वसाहतीत आयोजित करण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या राजगृह निवासस्थान, चेंबूर येथील आंबेडकर उद्यान परिसर, अनेक वसाहतींतून तसेच समाज माध्यमांवर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांच्या चोख बंदोबस्तात चैत्यभूमीवर भीम अनुयायी नतमस्तक
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर देशभरातून अनुयायी दाखल झाले आहेत. दरवर्षी दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळतो. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी न करता कोरोनाचे नियम पाळून बाबासाहेबांना अभिवादन करा असे आवाहन प्रशासनाने केले. त्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट प्रक्षेपण उपलब्ध करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. या बंदोबस्तातच चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी जनसागर लोटतो. कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी निर्बंध असल्याने मोजक्याच लोकांच्या उपस्थित येथे कार्यक्रम पार पडला. या वर्षी मात्र रविवारी सकाळपासूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्य़भूमीच्या दिशेने अनुयायी दाखल झाले. मुंबई महापालिकेनेही सर्व सुविधा, सेवा उपलब्ध केल्या असल्याचे सांगण्यात आले असले तरी सोयी सुविधांचा अभावच दिसून आला. विविध स्टॉल लावू नयेत यासाठी पालिकेने आवाहन केले होते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी - शिवाजी पार्ककडे जाणा-या रस्त्यावरील फेरीवाल्यांना उठवण्यात आले. त्यामुळे रस्ते मोकळे झाले आहेत. अभिवादनासाठी येणा-यांना शिस्तीने जाता येईल अशी सोय प्रशासनाने केली होती.
0 टिप्पण्या