Top Post Ad

कोरेगाव भीमा- शासनाच्यावतीने जय्यत तयारी

 पुणे– जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात येत असून समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. राज्य शासनाने प्रथमच या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे सोपवली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि समाज कल्याण आयुक्तांच्या नियंत्रणाखाली तात्पुरती प्रशासकीय समिती गठित केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध विभागांच्या समन्वयक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या अधिकाऱ्यांकडून केलेल्या तयारीचा  आढावा समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी घेतला.

यावेळी पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालय विभागनिहाय आढावा घेऊन नियोजनासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. प्रथमच हा कार्यक्रम शासनाच्या वतीने होत असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी एकमेकांच्या समन्वयाने कामे वेळेवर पूर्ण करावीत असे यावेळी आयुक्त डॉ. नारनवरे यांनी सांगितले.  कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा देण्यासाठी तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी शासनाच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

बैठकीस बार्टीचे महासंचालक धम्मजोती गजभिये, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोनपे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय भोसले, अनिल ढेपे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पी.एम.पी.एल.च्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे, अन्न व औषध प्रशासनचे सहआयुक्त शिवाजी देसाई, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड, श्रीमती संगिता डावखर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.जयस्तंभास आकर्षक फुलांची सजावट तसेच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून कार्यक्रमाचे  थेट प्रसारण करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) मार्फत नियोजन सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बार्टी, समाज कल्याण आयुक्तालय, महावितरण कंपनी, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडून आवश्यक कामे करण्यात येत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येत असून ५ सुसज्ज रुग्णवाहिका  व  १५ इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.

अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकूण २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे व तेथून जयस्तंभ येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने ३१ डिसेंबर  व १ जानेवारी रोजी २६० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक मार्गात बदल

  • चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल.
  • अहमदनगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावराफाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जडवाहने खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापुर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे  न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी जातील.
  • सोलापुर रस्त्यावरून आळंदी-चाकण भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो ट्रक) ही वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.
  • मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) वाहने वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटामार्गे अहमदनगरकडे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे अहमदनगर येथे जातील.
  • आळंदी- शेलपिंपळगाव बहुळ साबळेवाडी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणारी येणारी दोन्ही बाजूकडील सार्वजनिक तसेच  खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक बदल
  • नाशिककडून येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगाव चाकण चौकातून मोशी व तळेगावकडे जावू शकतील.
  • देहूरोड येथे मुंबई जुन्या महामार्गाने  येणारी वाहने  सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी-चिंचवडकडे न सोडता सेंट्रल चौकाकडून मुंबई बेंगलोर महामर्गाने सरळ वाकडनाका, चांदणी चौकातून इच्छीत स्थळी जावू शकतील.
  • मुंबईकडून एक्स्प्रेस महामार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई बेंगलोर महामार्गाने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) वाकडनाका व राधा चौक येथून पुणेकडे जावू शकतील.
  • मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्याकडे न जाता उर्से  टोल नाका  येथून देहूरोडकडे जाणारा बाह्यवळण रोडने जावू शकतील.
  • नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी नाशिकफाटा मार्गे पुणे शहरकडे जावू शकतील. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com