समृध्दी महामार्ग वेळेत पूर्ण करण्यासाठी अनिलकुमार गायकवाड पुन्हा सेवेत

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणारा बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग हा राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. सदरचा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याची निकड विचारात घेवून, अनिलकुमार गायकवाड, सेवानिवृत्त सचिव (बांधकामे) यांची सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्या., मुंबई या पदावर एक वर्षाच्या कालावधीकरिता नियुक्‍ती करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. त्याच्या नियुक्तीमुळे समृद्धी महामार्ग प्रकल्पावर काम करणाऱ्या इतर अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकल्पाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबतची कामे अंतिम टप्प्यात असून दुसऱ्या टप्प्याचे काम पुढील एक वर्षात पूर्ण करुन तो वाहतुकीसाठी खुला करावयाचे नियोजन आहे. यासाठीच अनिलकुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

मुंबई ते नागपूर दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामार्गाची लांबी 700 किलोमीटर आहे. त्यासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.   या महामार्गाचा महत्त्वाचा टप्पा आहे इगतपुरीतील दुहेरी बोगदा.  नांदगाव सदो ते शहापूर तालुक्यातील वाशाळापर्यंतच्या बोगद्याचे काम सप्टेंबर महिन्यातच पूर्ण झाले होते. नियोजित कालावधीच्या आधीच या बोगद्याचे काम अनिलकुमार गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पूर्ण झाले त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनिलकुमार गायकवाड सेवानिवृत्त झाले होते. मात्र त्यांच्या अधिपत्याखाली होत असलेले हे काम नियोजित वेळेत पुर्ण व्हावे यासाठी शासनाने त्यांना पुन्हा एक वर्ष सेवेत घेतले आहे. 


ही अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्याची पोच पावती आहे. मुंबईतील क्लिष्ट उड्डाणपूलं, मुंबईतलं बांधकाम भवन, नवी दिल्लीतलं देखणं, आधुनिक महाराष्ट्र सदन, आगीनंतर मंत्रालयाचं कॉर्पोरेट मेकओव्हर, वैतरणा नदीवरील 276 फूटांवर बांधलेला आव्हानात्मक पूल ही आव्हानात्मक कामं लिलया पूर्ण केली आहेत. सध्या महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख निर्माण केलेल्या बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प, बांद्रा-वर्सोवा सी-लिंक प्रकल्प या प्रकल्पांचं काम प्रगतीपथावर असून या प्रकल्पांची तांत्रिक बाजू समर्थपणे सांभाळण्यासाठी अनिलकुमार गायकवाड पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. महाराष्ट्रातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना यशस्वीरित्या पूर्ण करणारे अनिलकुमार गायकवाड म्हणूनच महाराष्ट्राचा ‘अभियांत्रिकी चेहरा’ ठरतात. असं मत व्यक्त करीत बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

अनिलकुमार. गायकवाड यांच्या करार पध्दतीने नियुक्तीच्या अनुषंगाने महामंडळाच्या संचालक मंडळाची मान्यता घेण्यात यावी. त्यांच्या सदर नियुक्तीबाबत अटी व शर्ती, त्यांना देय असलेले वेतन व भत्ते (मासिक पारिश्रमिक) तसेच त्यांचे प्रशासकीय व वित्तीय अधिकार निश्चित करणे या बाबतची कार्यवाही सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येईल. असे शासनाच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या