ठामपाचा अजब कारभार, डिजीटल बॅनरमध्येही भ्रष्टाचार

4 हजार 800 चौरस फुटाचे बोर्ड 23 हजार रुपयांच्या दराने लावले

ठाणे - ठाणे महानगर पालिकेच्या वतीने विविध प्रभागांमध्ये लावण्यात आलेल्या डिजीटल फलक अवघ्या 4 हजार 800 रुपये चौरसफुटाने लावण्यात येत असतात. तेच फलक ठामपाने सुमारे 23 हजार रुपये दराने लावले आहेत, या मध्ये प्रचंड मोठा घोटाळा झाला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांनी उघडकीस आणले आहे. याबाबत माहिती देणारे चित्रप्रदर्शन अजय यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आयोजित केले होते.  या प्रदर्शनाला ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

 ठाणे महानगर पालिकेच्या वतीने नगरसेवकांच्या सूचनेवरुन विविध प्रभागांमध्ये डिजीटल फलक लावण्यात आलेले आहेत. या फलकांच्या माध्यमातून नगरसेवक स्वत:ची जाहिरात करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या फलकांची आपण माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मिळवून हे प्रदर्शन आयोजित केले असल्याचे अजय जया यांनी सांगितले.

सबंध ठाणे शहरात सुमारे 50 डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत. हे बोर्ड व्हिजन नावाच्या कंपनीने उभारले आहेत. या कंपनीकडून थेट कोटेशन मिळविल्यानंतर प्रत्येक बोर्डामागे 4 हजार 800 रुपयांचा चौरसफुटांमागे दर देण्यात आला होता. मात्र, ठाणे महानगर पालिकेने हे बोर्ड उभारण्यासाठी 23 हजार रुपयांचा दर दिला आहे. त्यामुळे 3 लाख रुपयांत उभारला जाणारा बोर्ड उभारण्यासाठी ठाणे पालिकेने सुमारे 7 लाख रुपये दिले असल्याचे ते म्हणाले.

त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक कट्ट्यांच्या बाबतीतही असाच घोळ घालण्यात आला आहे. 2.50 लाखात उभारल्या जाणार्‍या ज्येष्ठ नागरिक कट्ट्यासाठी ठाणे पालिकेने चक्क 10 लाख रुपये खर्च केले आहेत. तर, नो पार्किंग बोर्डसाठी 4 हजार 300 रुपये खर्च अपेक्षित असतानाही ठामपाने 21 हजार 100 रुपये खर्च केले आहेत.  हा सर्व प्रकार माहिती अधिकारामध्ये उघडकीस आल्यामुळे ठाणेकरांना या घोटाळ्याची माहिती व्हावी, यासाठी आपण हे प्रदर्शन भरविले असल्याचे अजय जया यांनी सांगितले. या घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करुन हा खर्च वसूल करावा; अन्यथा, आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही जया यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या