ठाणे - केंद्र शासनाच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज २०२१ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेच्यावतीने मलनिःसारण विभागातील सफाई मित्रांना युनिफॉर्म, सुरक्षा किट आणि अभियानातील सहभागाबद्दल प्रशस्तीपत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी जयंतीचे औचित्यसाधून कोपरी मलप्रक्रिया केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळास नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता गुणवंत झांबरे, कार्यकारी अभियंता भारत भिवापुरकर, विभागाचे इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सफाई मित्र उपस्थित होते.
शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत नोव्हेंबर २०२० पासून देशातील २४३ शहरांमध्ये सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियान सुरू करण्यात आले आहे. मलनि:सारण वाहिनी, सेप्टीक टँक व मॅनहोलमध्ये कार्यरत कामगारांना सफाईसाठी अधिकृत आणि शाश्वत यंत्रणेमध्ये समावेश करून घेणे हा मुख्य उद्देश या अभियानाचा आहे. यामध्ये जिवीत हानी टाळण्यासाठी मलनि:सारण वाहिनी, सेप्टीक टँक व मॅनहोलमध्ये मानवी वापर कमी करून यांत्रिकीकरणाव्दारे साफसफाईला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर असणार आहे. मावनी हस्तक्षेप अटळ असल्यास सुरक्षिततेची साधने आणि प्रशासकीय प्रमुखाची लिखीत परवानगी आवश्यक असल्याने या अभियानाद्वारे सफाई कामगारांना एक प्रकारचे सुरक्षा कवच व कायद्याचे संरक्षण मिळाले आहे. केंद्र सरकारच्या सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिकेमार्फत सेप्टीक टँक, मलनि:सारण वाहिनी, मॅनहोल संबंधित तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक आणि व्हॉटसअँप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. परिसरामध्ये सेप्टीक टँक, मलनि:सारण वाहिनी, मॅनहोल साफ करतांना केल्या जाणाऱ्या असुरक्षित प्रथांबाबत नागरिकांनी तक्रार नोंदणीसाठी सफाई मित्र मदत टोल फ्री १४४२० क्रमांक किंवा ७५०६९४६१५५ या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या