Top Post Ad

मतदार यादी निर्दोष होण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे - राजेश नार्वेकर

 जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी साधला संवाद

ठाणे : आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने 1 नोव्हेंबरपासून छायाचित्रासह मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम होणार आहे. बेलापूर, कळवा-मुंब्रा व ऐरोली मतदारसंघातील मतदार याद्या निर्दोष राहण्यासाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी  सर्व राजकिय पक्षांनी आपले प्रतिनिधी नेमावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज केले. बेलापूर, कळवा-मुंब्रा व ऐरोली विधानसभा मतदारसंघातील सहायक निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिकांचे सहायक आयुक्त, विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी बेलापूर येथे संवाद साधला. यावेळी छायाचित्रासह मतदार यादींचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासंबंधी माहिती सर्व प्रतिनिधींना दिली. यावेळी ठाण्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, बेलापूर विधानसभेचे मतदार नोंदणी अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्यासह नवी मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत दुबार/समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी व त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे घरोघरी भेटी देऊन पडताळणी व तपासणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करणे ही मोहिम राबविण्यात येत आहे. 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावरील हरकती व दावे 30 नोव्हेंबरपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. तर 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेत मतदानकेंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे काम महत्त्वाचे असून त्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

            येत्या काळात जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिकांच्या व काही नगरपालिका/नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यात सुमारे 8 लाख मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत. त्यामध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघातील 98 हजार 575, बेलापूर मतदारसंघातील 64 हजार 507 आणि मुंब्रा कळवा मतदारसंघातील 10 हजार 692 नावांचा समावेश आहे. मतदार यादीत नोंदविलेल्या पत्त्यावर अनेक मतदार राहत नसल्याचे आढळून आले आहे. तसेच अनेकांची छायाचित्रे यादीत नाहीत. अशा मतदारांपर्यंत पोचून त्यांच्या नावाचा व छायाचित्रांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षकांना सर्व पक्षांनी सहकार्य केले तर मतदार यादी निर्दोष व सर्वसमावेशक होईल. तसेच जास्तीत जास्त पात्र तरुणांची नावे मतदार यादीत येण्यासाठीही राजकीय पक्षांनी प्रयत्न करावेत,  पुढील काळात होणाऱ्या निवडणुका चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मतदार यादी पुनरिक्षणाचा हा टप्पा महत्त्वाचा आहे. निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील दोष, त्रुटी दूर करण्याची आताच संधी आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी लोकशाहीची ही प्रक्रिया बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असेही नार्वेकर यांनी सांगितले.

            राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसोबतच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी महोदयांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची बैठक घेतली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदार यादी निर्दोष असणे आवश्यक आहे. त्यामुळे आतापासूनच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना या कामात गांभीर्याने लक्ष घालण्याचे निर्देश द्यावेत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना बदलणार आहे. त्यामुळे मतदार यादी शुद्धीकरणासाठी  सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिक सजगपणे व बारकाईने लक्ष द्यावे. तसेच मतदार यादी शुद्धीकरणाच्या कामासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपलब्ध करून द्यावेत, असेही नार्वेकर यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com