जेएनपीटीने सुरू केले महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र

  मुंबई,: जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारतातील कंटेनर हाताळणी करणारे एक प्रमुख बंदर असून सुरवातीपासूनच जेएनपीटी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडत आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जेएनपीटीने जनशिक्षण संस्थान (जेएसएस) च्या सहकार्याने महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष  संजय सेठी, भा.प्र.से. यांनी आज ग्रामपंचायत, नवीन शेवा येथे या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष  उन्मेश शरद वाघ, भा.रा.से. व जेएनपीटीचे सर्व विभागाध्यक्ष उपस्थित होते. 

जेएनपीटीने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीअंतर्गत रायगड जिल्ह्यातील 1000 लाभार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधि मंजूर केला आहे. तीन महिन्यांच्या या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिलांचा कौशल्य विकास व त्यांना व्यावसायिक कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करण्यावर भर दिला जाईल ज्यामुळे महिलांना मुख्य प्रवाहात येण्यास आणखी मदत होईल. या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडलेल्या अभ्यासक्रमांमध्ये ब्युटी कल्चर आणि हेल्थ केअर, नर्सिंग होमसाठी मदतनीस, सॅनिटरी पॅड बनवणे, भाजी आणि मासे सुकवणे, वारली पेंटिंग, अगरबत्ती पॅकिंग इत्यादी कौशल्ये समाविष्ट आहेत.

जेएनपीटी ही एक सामाजिकदृष्ट्या जागरूक असलेली संस्था आहे जी या परिसरातील उपेक्षित घटकांना सशक्त बनवण्यासाठीची आपली भूमिका, जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ओळखते. या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी, भा.प्र.से. म्हणाले, “बंदर परिसरातील सर्व लोक हे जेएनपीटी परिवाराचाच एक भाग आहेत आणि आम्ही आमच्या सीएसआर उपक्रमांद्वारे या भागातील लोकांची सेवा करण्यासाठी नेहमीच वचनबद्ध आहोत. या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे महिलांना कौशल्ययुक्त बनवण्याचे आमचे ध्येय असून यादवारे  महिलांना ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होवुन त्यांना उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध प्राप्त होतील. आम्हाला खात्री आहे की या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमामुळे महिलांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाला प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास सुद्धा होईल व पर्यायाने त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास सुद्धा मदत होईल.”

पहिल्या टप्प्यात, जनशिक्षण संस्थान ने जेएनपीटीच्या सहाय्याने रायगड जिल्ह्यातील 450 लाभार्थ्यांना 18 अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले आहे व उपक्रमाच्या या टप्प्यात रायगड जिल्ह्यातील  सुमारे 400 लाभार्थ्यांना 16 वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे ज्यामध्ये उरण तालुक्यातील पाच तुकड्यांच्या समावेश आहे. जनशिक्षण संस्थान ही कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाशी संलग्न एक स्वयंसेवी संस्था असून गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. जनशिक्षण संस्थान ने 40 हून अधिक प्रकारचे व्यावसायिक अभ्यासक्रम तयार केले असून आतापर्यंत 28000 पेक्षा जास्त उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे.

जेएनपीटी आपले सीएसआर उपक्रम अतिशय व्यवस्थित व काळजीपूर्वक निश्चित करते व बंदर परिसरातील तसेच अन्य भागातील विविध सीएसआर उपक्रमांसाठी निधीचे वाटप करते. गेल्या काही वर्षांमध्ये, जेएनपीटीने जलसंधारण आणि स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते विकास, कला व संस्कृतीस प्रोत्साहन सारख्या अनेक प्रकल्पांना सीएसआर निधि अंतर्गत सहाय्य केले आहे. असे सहाय्य करताना जेएनपीटी हे सुनिश्चित करते की हे प्रकल्प स्थानिक लोकांशी संबंधित आहेत व त्याचा समाजाला व्यापक फायदा होणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA