समन्वय प्रतिष्ठान, कल्याण आणि आगरी ऍडव्होकेट वेलफेअर तर्फे शालेय साहित्य वाटप

   कल्याण :    मुरबाड तालूक्यातील अति दुर्घम भागातील जि. प. शाळा मुरबेवाडी आणि जि. प. शाळा खुटारवाडी, ता. मुरबाड या दोन्ही शाळेत समन्वय प्रतिष्ठान आणि आगरी ऍडव्होकेट वेलफेअर तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच शिक्षकांचे संकल्पनेने याप्रसंगी शाळा परीसरात वृक्ष लागवड करण्यात आली.   उच्च शिक्षण घेण्याची जिद्द आणि चिकाटी मनात ठेऊन नियमित अभ्यास केल्यास निश्चितच यश मिळते. आणि या वयातच कोणत्याही मैदानी खेळा बरोबरच यशाचे शिखर गाठण्यासाठी मन लावून अभ्यास करुन शिक्षणाची गोडी निर्माण करा असा मोलाचा संदेश देऊन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शालेय साहित्य वाटप करुन मदत करण्याचे हेतूने सदरचा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून दरवर्षी वेगवेगळया शाळेत राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक ऍड. जनार्दन टावरे यांनी केले. 

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे ऍड. गणेश पाटील यांनी सांगितले की, जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षांची लागवड झाल्यास नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होईल. प्रत्येकाने दरवर्षी एक तरी वृक्षाची लागवड केल्यास पर्यावरणात चांगले बदल होईल आणि प्रदुर्षणामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यावर उपाय योजना म्हणून प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करणेबाबत माहिती दिली. यावेळी दोन्ही शाळेतील एकुण 29 विद्यार्थ्यांना संपुर्ण शालेय साहित्य तसेच स्कुल बॅग, रेनकोट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या देशभक्ती गिताने करण्यात आली. 

         याप्रसंगी समन्वय प्रतिष्ठानचे संतोष खेताडे, शंकर पाटील, मंगेश टेंबे, गुरुनाथ भोईर, शेखर सावंत, प्रमोद थूल, अमोल जाधव तसेच आगरी ऍडव्होकेट वेलफेअरचे ऍड. अशोक म्हात्रे, ऍड. अतुल शेळके, ऍड. ज्ञानेश्वर म्हात्रे, ऍड. विलास म्हात्रे, ऍड. विनोद भोईर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुरबेवाडी शाळेतील शिक्षक रुपेश राणे सर, खुठारवाडी शाळेचे शिक्षक सत्यवान शिरसाठ सर, शिक्षिका अश्विनी यशवंतराव, शिक्षिका रंजिता खडसे तसेच मुरबेवाडीतील सरपंच श्रीमती द्वारकाबाई भला, ग्रामस्थ उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्र संचलन ऍड. सुनिल उबाळे यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या