विविध ठिकाणांची १० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, ठामपाची कारवाई सुरूच

    ठाणे -  शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच असून आज विविध ठिकाणांची १० अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.  या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील कोळीवाडा, कासारवडवली येथील स्टील्ट अधिक ५ मजली अनधिकृत इमारत तर वाघबिळ गाव येथील स्टील्ट अधिक ५ मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम निष्कासीत करण्यात आले. बाळकुम पाडा नं. १ येथील स्टील्ट अधिक ६ मजली अनधिकृत इमारतीवर देखील निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली असून सदर इमारतीचे ५ व्या आणि ६ व्या मजल्यावरील स्लॅब तोडण्यात आले. यासोबतच बाळकुम पाडा नं.१ येथील स्टील्ट अधिक ५ मजली अनधिकृत इमारतीचे बांधकाम देखील निष्कासीत करण्यात आले.

        तसेच दिवा प्रभाग समिती अंतर्गत स्टार गार्डन डीपी रोड येथील मुबारख खान यांचे तळ अधिक २ मजली इमारतीचे बांधकाम आणि साबे गाव दिवा येथील अशोक रमधारी यादव यांचे २ गाळे निष्कासित करण्यात आले. तर नौपाडा प्रभाग समितीममधील पांचाली या अतिधोकादायक तळ अधिक ३ मजली  इमारतीचे  ११ दरवाजे तसेच दुकानाचे एकूण ०५ शेटर निष्कासीत करण्यात आले. तसेच कोपरी उपविभाग साई नागरी चाळ क्रं.8 कोळीवाडा येथील खाडी लगत असणाऱ्या १२×१५ चौ.फूट मोजमापाच्या एक खोलीचे बांधकाम तोडण्यात आले.   सदर निष्कासनाची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये  अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त फारुख शेख, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, अलका खैरे आणि यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या