Top Post Ad

११ हजार २३५.४३ कोटीचा ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा आराखडा तयार


मुंबई - ठाणे ते बोरिवली दरम्यान प्रवासासाठी सद्यस्थितीत जवळपास ६० मिनिटांचा वेळ लागतो. ठाणे-बोरिवली भुयारी मार्गामुळे हे अंतर केवळ १५ ते २०  मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. तर सध्याचे २३.६ किमी. चे अंतर ११.८ किमी. एवढे कमी होणार आहे. त्यामुळे हा भुयारी मार्ग मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे . ठाण्यातील टिकुजीनी वाडीपासून ते बोरिवली जवळील मुंबई वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पर्यंत ११.८ किमीच्या या भुयारी मार्गामुळे इंधना सोबतच वेळेची देखील बचत होईल. तसेच पर्यावरण संवर्धनालाही मदत होईल. या ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा ठाणे व मुंबई उपनगरांमधील नागरिकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. 

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी १६.५४ हेक्टर खासगी जमीन तर संजय गांधी नॅशनल पार्कची (भूमिगत) ४०.४६ हेक्टर अशी एकूण ५७ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. संजय गांधी नॅशनल पार्क ट्रस्टला मोबदल्यात जमिन वितरित करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ११ हजार २३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या भुयारी मार्गाची विशेष बाब म्हणजे हा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा आहे. या प्रकल्पामुळे राष्ट्रीय उद्यानाला धक्का पोहोचू नये, यासाठी मेट्रो भुयारी कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या टनेल बोअरिंगने भोगद्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. 

 या बोगद्यामध्ये ३+३ म्हणजे ६ मार्गिका असून ताशी ८० किमी वेगाने वाहने धावू शकतात अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर क्रॉस टनेल असतील. तसेच हवा शुद्ध व खेळती राहण्यासाठी विशेष सुविधा करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे ड्रेनेज सिस्टीम, स्मोक डीटेक्टर, जेट फॅन सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे १०.५ लाख मेट्रिक टन इंधनाची बचत होणार आहे. या प्रकल्पामुळे ३६ टक्के कार्बन डाय ऑक्साईड कपात करण्यास देखील मदत होईल.

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला असून सद्यस्थितीत भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच या प्रकल्पाला अनिवार्य पर्यावरण मंजुरीपासून सूट देण्यात आली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे काम सुरु आहे. ठाणे ते बोरिवली दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सदर प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्यानंतर हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आला.  भूसंपादनानंतर मार्च २०२२ ला सुरू होणारे प्रकल्पाचे काम साडेपाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. 

 . प्रकल्पाची माहिती

  • -ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाची -एकूण लांबी - ११.८ किमी
  • (१०.२५. किमी दुहेरी बोगदा व १.५५ किमी जंक्शन)
  • -बोगदे : ३+३ मार्गिकांचे प्रत्येकी दोन बोगदे
  • -कनेक्टिव्हिटी: - वेस्टर्न हायवे, एनएच ३,  घोडबंदर रोड (एसएच -४२)
  • -इतर फायदे - इंधन, पैसे व वेळेची बचत, प्रदूषणात घट, इको-टूरिझममध्ये वाढ, पर्यावरण पूरक विकास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com