समाजमंदिर गिळंकृत करण्याचा खाजगी संस्थेचा डाव

  ठाणे : वर्तकनगरवासीयांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीचा अविभाज्य भाग असलेल्या 'वर्तकनगर समाजमंदिर सभागृहाच्या' भूखंडाचे श्रीखंड लाटण्याच्या कुटिल डाव खाजगी संस्थेने आखला आहे. याविरोधात आता वर्तकनगर वासीय एकवटले असून 'वर्तकनगर समाजमंदिर संघर्ष समिती'च्या रूपाने याप्रश्नी स्थानिक आवाज उठवत आहेत. स्थानिकांच्या हक्काचे असलेले हे समाजमंदिर खाजगी संस्थेने गिळंकृत करण्याआधी स्थानिकांच्या व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृहनिर्माण मंत्र्यांची याप्रश्नी भेट घेतली. तसेच या  वास्तूच्या माध्यमातून स्थानिकांना पायाभूत सोयीसुविधा पुरवल्या जाव्यात, अशी मागणी या शिष्टमंडळाने दोन्ही मंत्र्यांकडे केली.

कामगार व कष्टकऱ्यांची वसाहत अशी ओळख असलेल्या वर्तकनगरात १९६५ पासून मध्यवर्ती भागात समाजमंदिर सभागृह अस्तित्वात आहे. आण्णासाहेब वर्तक नगर गणेशोत्सव, लग्नसमारंभ, कबड्डी सामने, व्यायामशाळा आदी कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होत असे. माञ काही वर्षांपुर्वी समाजमंदिर सभागृह धोकादायक झाल्याचे कारण देत ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर म्हाडाने 'विहंग महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थे'ला संबंधित भूखंडाच्या पुनर्विकासाची परवानगी दिली. आश्चर्याची बाब म्हणजे, या संस्थेचा व समाजमंदिरांचा काडीमात्र संबंध नसून संस्थेच्या माध्यमातून वर्तकनगरात कोणतेही सामाजिक कार्य केलेले नाही. फक्त आर्थिक फायदा लाटण्यासाठी आणि समाजमंदिराचा मोक्याचा भूखंड गिळंकृत करण्यासाठी या संस्थेने पुर्नविकासाच्या माध्यमातून 'भूखंडाचे श्रीखंड' लाटण्याचा डाव आखल्याचा आरोप वर्तकनगर समाजमंदिर संघर्ष समिती'च्या शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वपक्षीय सदस्य व स्थानिकांनी केला आहे.

याप्रश्नी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दोन दिवसांपूर्वी जानकादेवी मंदिरात झालेल्या एकञित बैठकीनंतर थेट ठाणे जिल्ह्याचे पालकमंञी एकनाथ शिंदे व राज्याचे गृहनिर्माण मंञी डाॅ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या दोघांनीही याबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या