घरकाम करणाऱ्या कामगारांबाबत महापौर आणि कामगार विकास आयुक्तांशी सकारात्मक चर्चा

  मुंबई -  महाराष्ट्र राज्य घरकामगार समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने असंघटित कामगार विकास आयुक्त  अश्विनी जोशी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन देऊन चर्चा केली. यात प्रामुख्याने मंडळाच्या सभासद असलेल्या घरकामगारांना १५०० रुपये अर्थसहाय्य मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यातील अडचणी, कामावर जाण्यासाठी कोरोना लसीची व टेस्टची अट घालण्यात येऊ नये, मंडळाशी संबंधित कामकाजावर चर्चा करण्यासाठी घरकामगार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात यावी या सर्व मागण्यांबाबत आज १५ जुलै रोजी सकारात्मक चर्चा झाली. 

मंडळाच्या सदस्य घरकामगारांचे अर्थसहाय्यासाठी ऑफलाईन अर्ज स्विकारण्याचे त्यांनी मान्य केले. मंडळाचा नोंदणी क्रमांक व  आधार क्रमांक व बँक खात्यांचा तपशील दिल्यास अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले. पुढच्या आठवड्यात समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा करण्याचे त्यांनी मान्य केले. घरकामगारांवर सोसायट्यांनी अटी न लादण्याबाबत सहकार विभागाला पत्र लिहिण्याचे त्यांनी मान्य केले. विकास आयुक्त अश्विनी जोशी यांच्या सोबत सह आयुक्त  म्हैसकर उपस्थित होत्या.

तसेच मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेऊन त्यांनादेखील घरकामगार व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर निवेदन दिले व चर्चा केली.  घरकामगारांना लोकलच्या प्रवासाची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी शासनाकडे शिफारस करण्याचे त्यांनी मान्य केले. कामावर जाण्यासाठी कोरोना लसीची अट घालण्यात येऊ नये इत्यादी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.  महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प, शाळा, समाजमंदिरे इत्यादी ठिकाणी अंगणवाड्यांसाठी जागा मिळण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 

शिष्टमंडळात शुभा शमीम, आरमायटी इराणी, त्रिशिला कांबळे यांचा समावेश होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या