मोफत लसीकरण श्रेयवादाच्या गोंधळात ठाणेकर त्रस्त

  मागील काही दिवसापासून पालिकेच्या लसी घेऊन राजकीय मंडळींकडून त्या वाटप केल्या जात आहेत. मोफत मिळणाऱ्या लसींवरदेखील राजकीय मंडळींचे मार्केटींग सुरु असल्याचे चित्र शहरभर दिसत होते. त्यामुळेच अधिकचा गोंधळ होऊन काही ठिकाणी राजकीय मंडळींना नागरीकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळही आल्याचे पहावयास मिळाले. शिवाई नगर भागात लसीकरणाच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे दिसून आले. अखेर येथे पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर वातावरण शांत झाले. परंतु या काळात लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या लसीकरण केंद्रावरही गर्दी होऊन तेथेही पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली होती.

 दुसरीकडे शिवाई नगर केंद्रावर देखील ऑफलाईन पद्धतीने लसीकरण सुरु होते. परंतु शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईनचे सर्वच बुकींग केले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रांगेत उभ्या असलेल्यांना लस मिळत नव्हती. त्यामुळे याच मुद्यावर शिवसेनेच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला. त्यावरुन या ठिकाणी बराच वेळ गोंधळ उडाला होता. अखेर हा गोंधळ शांत होत नसल्याने पोलिसांनी पाचारण करावे लागले. त्यानंतर काही काळ हे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु झाले. 

तर खासदार राजन विचारे यांनीदेखील शनिवारी मोफत लसीकरण ठेवले होते. विचारे यांच्या तर्फे चंदनवाडी येथील शुभम मंगल कार्यालयात लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीपासून स्वत: राजन विचारे या कार्यक्रम स्थळी हजर होते. सुरुवातीला ३०० लोकांचं लसीकरण या कार्यक्रमातून होणार होतं. या कार्यक्रमाला आसपासच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लसीकरणासाठी आलेली संख्या पाहता आणखी २०० जणांचं लसीकरण करण्याचं ठरवण्यात आलं. लसीकरणासाठी कार्यक्रमस्थळी सकाळी ६ वाजल्यापासून लोकांनी रांगा लावल्या होत्या. लसीकरण कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आले होते. या कार्यक्रमातील गर्दीचं नियोजन स्थानिक शिवसैनिक आणि पोलीस प्रशासन करत होते. परंतु गर्दीमुळे गेटवर गोंधळ उडाला. गेट बंद करण्यात आले. ओळखीच्या लोकांना आत सोडलं जात असल्याचं आरोप लोकांनी केला. त्यावेळी गेटवरील प्रकार पाहून खासदार राजन विचारे संतापले. त्याठिकाणी उभे असणाऱ्या शिवसैनिकाला राजन विचारे यांनी फटका मारून ओळखींच्या आत कशाला सोडता? सकाळपासून लोकांनी रांगा लावलेत असं बजावलं

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या राजकीय मंडळींना लस दिल्या जात आहेत. शासनाकडून मोफत लस उपलब्ध होत आहेत. त्याच लस या मंडळींना दिल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच नागरीकांना त्या मोफतच मिळणार आहेत. परंतु असे असेल तरी या नगरसेवकाच्या माध्यमातून त्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मोफत लसीकरणाचे फलक मात्र शहराच्या विविध भागात लागल्याचे दिसून येत असून नगरसेवक तर या माध्यमातून स्वत:चे ब्रॅन्डींग करतांना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या