Top Post Ad

मीरा भाईंदरमधील १३०० आसन क्षमता असलेले भव्य नाट्यगृहाचे काम अंतिम टप्प्यात

 आमदार प्रताप सरनाईक आणि आयुक्तांनी केली कामाची पाहणी 

मीरा भाईंदर-  महापालिकेच्या हद्दीत मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ भव्य नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून हे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल व पुढील वर्षी नाट्यगृहात तिसरी घंटा वाजेल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज दिली. त्यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्यासह या कामाच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक कामे करण्याच्या सूचना केल्या. नाट्यगृहाच्या कामाला गती येणार असून कोणत्याही परिस्थितीत पुढच्या वर्षी नाट्यगृहाचे लोकार्पण होणार आहे. . या नाट्यगृहाच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक , मीरा भाईंदर आयुक्त दिलीप ढोले यांनी अधिकार्यांसह पाहणी केली. यावेळी शहरअभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे, उपअभियंता यतीन जाधव, अभियंता प्रफुल वानखेडे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हासंघटक.स्नेहल सावंत, नगरसेवक उपजिल्हाप्रमुख मिरारोड राजू भोईर, उपजिल्हाप्रमुख भाईंदर प. संदीप पाटील, शहरप्रमुख भाईंदर पश्चिम पप्पू भिसे, उत्तर भारतीय प्रमुख सुरेश दुबे, नगरसेवक धनेश पाटील, नगरसेवक कमलेश भोईर, नगरसेविका भावना भोईर, परिवहन समिती सदस्य लक्ष्मन कांदळगावकर उपस्थित होते.

मीरा भाईंदर शहरात एक मोठे नाट्यगृह असावे अशी आमदार सरनाईक यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते सतत पाठपुरावा करीत होते. त्यांच्या अथक प्रयत्न व पाठपुराव्याने मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात मौजे महाजन वाडी , ठाकूर मॉल शेजारी येथे हायवेलगत सुविधा भूखंडावर नाट्यगृह इमारत बांधली जात असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे.  या नाट्यगृहाची बेसमेंट , तळ अधिक चार मजला असे बांधकाम पूर्ण झाले आहे. येथे मुख्य नाट्यगृह १ हजार सीट्सचे असेल.  तर दुसरे छोटे नाट्यगृह हे ३०० सीट्सचे असणार असून मोठे नाट्यगृह व मिनी नाट्यगृह येथे असणार आहे. शहरातील नवोदित कलावंतांना सराव करण्यासाठी , छोटे कार्यक्रम करण्यासाठी मिनी नाट्यगृह उपलब्ध होणार आहे. तर या इमारतीत तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर दोन आर्ट गॅलऱ्या असणार आहेत

पुढील काम कसे असावे याबाबत चर्चा करून सरनाईक व आयुक्तांनी सूचना केल्या. नाट्यगृहाचे आरसीसी काम पूर्ण झाले असून आता नाट्यगृहाच्या इंटेरियरचे काम सुरु केले जाणार आहे. त्यात नाट्यगृहात अंतर्गत सजावट इंटेरियर , साउंड सिस्टीम , सीटिंग व्यवस्था व उर्वरित कामे केली जाणार आहेत. यावेळी नाट्यगृहात आसनव्यवस्था म्हणजे बसण्याची खुर्ची कशी असेल तीही दाखविण्यात आली. या नाट्यगृह इमारतीचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. पुढील वर्षी मार्चपर्यंत नाट्यगृहाचे काम पूर्ण होईल व या नाट्यगृहाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्तेच व्हावे असा आमचा प्रयत्न राहील , असे सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या नाट्यगृहात नाट्यकर्मीना काय हवे आहे, नाट्यगृहाची अंतर्गत सजावट कशी असावी व एकूणच नाट्यकर्मीना त्यात काय हवे यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकार , दिग्दर्शक , नेपथ्यकार यांची एक समिती आत्ताच बनवून त्यांच्या सूचना जाणून घाव्यात असे सरनाईक म्हणाले व तशी एक समिती बनवायचे आयुक्त दिलीप ढोले यांनी निश्चित केले आहे. ही समिती सुचवेल ती कामेही नाट्यगृहाच्या उद्घाटनापूर्वीच पूर्ण केली जाणार आहेत. 

१५० कोटी रुपयांचा नाट्यगृह प्रकल्प !!- या नाट्यगृहाचे आरसीसी बांधकाम विकासकामार्फत करण्यात आले असून या कामावर होणारा खर्च विकास हक्क प्रमाणपत्राच्या (टीडीआर) मोबदल्यात झाला आहे. म्हणजे विकासकाने हे नाट्यगृह बांधले असून त्यासाठी त्याला पालिकेने टीडीआर दिला आहे. नाट्यगृह इमारत बांधकामावर सुमारे ८० कोटींहून अधिक खर्च झाला आहे तर आता अंतर्गत सजावटीचे कामही विकासकाकडूनच करून घेतले जाणार आहे. अंतर्गत सजावटीसाठी व पुढील कामांसाठी जवळपास ६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. नाट्यगृहाची अंतर्गत सजावट व पुढील कामे विकासकानेच टीडीआरच्या मोबदल्यात करून द्यावी यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडून , आमदार सरनाईक यांनी विदेश परवानगी मिळवली आहे. म्हणजे नाट्यगृह इमारत बांधकाम व आता अंतर्गत सजावट हे सर्व काम विकासकच करणार आहे. जवळपास १५० कोटींचा खर्च असलेला हा नाट्यगृह प्रकल्प टीडीआरच्या मोबदल्यात विकासकाकडून पूर्ण होत आहे. त्यासाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही.

मीरा भाईंदर शहरातील नाट्यप्रेमी , कलाप्रेमींसाठी हे भव्य नाट्यगृह म्हणजे आनंदाची पर्वणी ठरणार आहे. मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या नाट्यगृहाची भव्य इमारत पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी या नाट्यगृहाच्या कामाला गती दिल्याबद्दल आमदार सरनाईक यांनी त्यांचे कौतुक केले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com