Trending

6/recent/ticker-posts

Election Duty पोलिसांना अवघे 300 रुपये तर इतरांना अकराशे रुपयांचा भत्ता

  ठाणे  निवडणुकीच्या कामात सहभागी असणारे शासकीय कर्मचारी आणि पोलीस दल यांच्या भत्त्यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे साध्या शिपायास 1 हजार 100 रुपये भत्ता देण्यात येत असतानाच पोलिसांना केवळ 300 रुपये भत्ता दिला जात आहे. ही तफावत दूर करुन पोलिसांच्या निवडणूक भत्त्यामध्ये वाढ करावी, अशी मागणी ठामपाचे माजी स्वीकृत सदस्य नंदकुमार फुटाणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.  

 महाराष्ट्र राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, महापालिका, विधानसभा, लोकसभा व अन्य महामंडळांच्या निवडणुक कार्यक्रमात सरकारी अधिकारी कर्मचार्‍यांसोबत पोलिस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येत असते. मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानाचे दिवशी मतदान केंद्रावर सरकारी कर्मचारी अधिकारी यांचेसोबत पोलिस कर्मचारी यांनासुध्दा त्याठिकाणी पुर्णवेळ ड्युटी दिलेली असते.
 मतदान केंद्रावर शांतता व सुरक्षा राखणे, मतदान केंद्रामध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही; तसेच,  मतदान शांततेने पार पाडावे, याकरिता जबाबदारी या पोलिस कर्मचार्‍यांवर असते. या पोलिसांना केवळ 300 रुपये तर   मतदान केंद्रावरील शिपाई कर्मचार्‍यास रु. 1100/- इतका भत्ता दिला जातो.

 शिपाई व पोलिस कर्मचारी यांना देण्यात येणार्‍या मतदान भत्त्यामध्ये मोठी तफावत चुकीचीच आहे. यामुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे.   मात्र,  पोलिस कर्मचारी या सरकारी यंत्रणेस नियमानुसार विचारणा करु शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सरकारी शिपाई व पोलिस यांच्यामध्ये मतदान केंद्रावर दिल्या जाणा-या भत्ता रकमेतील असमानतेमुळे पोलिस कर्मचारी नाराज होतात व या नाराजीतून यापुढील मतदान केंद्रातील कामकाजावर त्यांचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा विचार करुन पोलिसांनाही इतर कर्मचार्‍यांप्रमाणेच समान भत्ता देण्यात यावा, अशी मागणी फुटाणे यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या