मुसळधार पावसात महापालिका आयुक्त आणि महापौरांनी केली नाले सफाईची पाहणी

  ठाणे-  हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शहरात आज सकाळपासून अतिवृष्टी सुरु झाली असून आज मुसळधार पावसात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई तसेच पाणी साचणाऱ्या अनेक ठिकाणांची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पातलीपाडा, बटाटा कंपनी, लोढा लक्झोरीया, थिराणी शाळा, भीमनगर, विवियाना मॉल तसेच लोढा येथील नाल्याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिवृष्टी पार्श्वभूमीवर त्यांनी स्थानिक नगरसेविकांशी संवाद साधत प्रभागातील अडचणी संबंधित तसेच करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. अतिवृष्टीच्या पहिल्याच दिवशी शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणाची पाहणी करून वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही यासाठी सबमर्सियल पंप लावून तसेच पाण्याच्या निचरा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पावसामुळे वाहून आलेला कचरा तात्काळ उचलून नाल्याचे प्रवाह मोकळे करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

        दिनांक 9 जून ते 12 जून, 2021 या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्यानंतर आज पासून शहरात जोरदार पावसाला सुरु झाली आहे. गेले दोन दिवस महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील नालेसफाई कामाची तसेच सखल भाग, रस्ते दुरूस्ती कामाची पाहणी करत आहेत. आज सकाळी 11. वाजता महापालिका आयुक्तांनी ठाण्यातील पातलीपाडा येथून मुसळधार पावसात नालेसफाई तसेच पाणी साठलेल्या ठिकाणांची पाहणी करण्यास सुरूवात केली. या पाहणी दौऱ्यामध्ये स्थायी समिती सभापती संजय भोईर,आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती  निशा पाटील, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा राधिका फाटक, नगरसेवक नरेश मणेरा, सिद्धार्थ ओळवेकर, नगरसेविका साधना जोशी, विमल भोईर, कविता पाटील, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे,  वैद्यकीय अधिकारी बालाजी हळदेकर तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.

 

 दरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने केलेल्या तयारीचा आढ़ावा घेण्यासाठी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्कालीन कक्षाला भेट देवून शहरातील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला तसेच महापालिकेने आपत्कालीन काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्या समवेत महापौर नरेश गणपत म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  या भेटीच्या वेळी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आपत्कालीन कक्षाद्वारे करण्यात येणा-या विविध कार्यवाहींबद्दल सविस्तर माहिती दिली. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष सुयोग्यप्रकारे पावसाळा हाताळेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या टोल फ्री - १८०० २२२ १०८ व हेल्पलाईन - ०२२ २५३७१०१० या  क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.


  हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर महापालिका कार्यक्षेत्रात संभाव्य आपत्कालीन परिस्थ‍िती उद्भवणाऱ्या ठिकाणांची पाहणी आज महापौर नरेश म्हस्के यांनी भर पावसात केली. यावेळी ठाणे शहरातील चिखलवाडी, भांजेवाडी, गडकरी रंगायतन परिसर, आंबेडकर रोड, सिडको परिसर (रेल्वे पुलाखाली) विटावा रेल्वे ब्रिजखालील जागा या ठिकाणची पाहणी केली. महापौरांनी प्रत्यक्ष जागेवर जावून शहरातील ज्या ठिकाणी पाणी साचते अशा संभाव्य ठिकाणांचा आढावा घेतला. पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पंपीगची सोय करणेबाबत सूचना देवूनही प्रशासनाने कार्यवाही न केल्यामुळे आज झालेल्या पावसात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ही बाब निदर्शनास येताच महापौरांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेधर धरले व संपूर्ण पावसाळाभर आवश्यक त्या उपाययोजना सातत्याने राबविण्याबाबतचे निर्देश दिले.  उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, प्रियांका पाटील, पुजा करसुळे, उपायुक्त संदीप माळवी,सहाय्यक आयुक्त बाळासाहेब चव्हाण, सचिन बोरसे, आपत्कालीन विभागाचे व्यवस्थापक संतोष कदम, कार्यशाळा विभागाचे कार्यकारी अभियंता गुणवंत झांबरे आदी उपस्थित होते.
यावेळी चिखलवाडी परिसरातील नागरिकांनी देखील महापौरांशी चर्चा करुन समस्या मांडल्या. तसेच यावेळी आंबेडकर रोड व विटावा ब्रिजखाली साचणाऱ्या  पाण्याचा पंपीगच्या सहाय्याने उपसा करावा व या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थ‍िती निर्माण होणार नाही याबाबत सतर्क राहण्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.   पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच ज्या विभागात पूरसदृश्य परिस्थ‍िती निर्माण झाल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी किंवा संबंधित प्रभाग समिती कार्यालयाशी संपर्क साधावा व महापालिकेने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सूचनांचे पालन करुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA