Top Post Ad

शेतकरी, ओबीसींच्या लढ्यातलं एक वादळी व्यक्तीमत्व

   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नावाचं वादळ घोंघावत असतानाही या वादळाला छेद देत आपलं अस्तित्व जपणारा नेता म्हणजे नाना पटोले. भाजपमधूनच खासदारकी मिळवलेले मात्र पक्षाची मते न पटल्यामुळे आपल्या खासदारकीचा तडक राजिनामा देऊन भाजपच्या मोदी सरकारमधून बाहेर पडणारे नाना त्यावेळेस अनेक जणांचा चर्चेचा विषय ठरले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे, असं सांगत नानांनी थेट भाजप सरकारवर हल्लाबोल चढवला होता.   गोंदिया लोकसभा मतदारसंघातून  2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली. त्यावेळेस त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल ह्यांचा सुमारे १.५ लाख मताधिक्याने पराभव केला.  मात्र ज्या प्रश्नासाठी आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत. त्याच प्रश्नांना भाजप सरकार बगल देत आहे. हे न पटल्यामुळे,  ८  डिसेंबर २०१७ ला त्यांनी  शेतकरी व इतर मागास वर्गाच्या प्रश्नावर, तसेच  स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी भाजपच्या मोदी सरकारने मान्य न केल्यामुळे लोकसभा सदस्य व भारतीय जनता पक्ष मधून राजीनामा दिला. 

नाना पटोले यांच्या राजकारणातील सुरुवातीची कहाणीही खूप रंजक आहे. विद्यार्थी राजकारणात महाविद्यालयीन मित्रांमध्ये नाना खूप लोकप्रिय होते आणि या मित्रांच्या पाठिंब्यामुळे जिल्हा क्षेत्रातील सदस्याच्या निवडीने त्यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. या पहिल्या निवडणुकीत त्यांच्याकडे प्रचाराकरिता देखील पैसे नव्हते. अशा वेळी त्याच्या मोठ्या भावाने मदत केली होती, तीही वडिलांकडून लपून. पंचायत सदस्यांची निवडणूक लढविण्यासाठी नाना यांना पैशांची गरज होती, पण कोणालाही विचारू शकत नव्हते.  शेवटी, त्यानी आपले मोठे भाऊ विनोद पटोले यांच्याकडे आपली व्यथा सांगितली. यावर त्यांचे बंधू तात्काळ म्हणाले,  बर्‍याच मोठ्या सेलिब्रिटींच्या आखाड्यात असलेल्या निवडणुकीत  तु कसं जिंकणार ? यावर नाना तात्काळ म्हणाले, फक्त दोन वाहनांची व्यवस्था करा आणि काही पॉकेट मनीसाठी पैसे, बाकीचे माझ्यावर सोडा. मी निवडणूक जिंकून दाखवून देईन. असा आत्मविश्वास नानांनी आपल्या भावासमोर प्रकट करताच,  पोलिस निरीक्षक पदावर तैनात असलेल्या त्यांच्या मोठ्या भावाने प्रसिद्धीसाठी दोन मोटारींची व्यवस्था केली आणि पॉकेट मनीसाठी काही पैसे दिले. या सर्वाच्या जोरावर नानांनी निवडणुकीचे मैदान जिंकले आणि राजकारणाची सुरुवात झाली. आज महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान होऊन नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद भूष‌वणाऱ्या नाना पटोले यांच्या राजकीय प्रवासाचा पहिला टप्पा १९९९ला सुरु होतो. जेव्हा ते भंडारा जिल्हा परिषद सदस्य झाले होते. पैशांची कमतरता असूनही, निवडणूक जिंकल्यानंतर मोठ्या भावाने विचारले, तुम्ही ही निवडणूक कशी जिंकली ?, तेव्हा नाना म्हणाले, कॉलेजमध्ये इतकी वर्षे विद्यार्थ्यांचे राजकारण केले. त्या सर्व मित्रांनी दिलेल्या समर्थनाच्या जोरावरच निवडणूक जिंकली. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली तहसीलच्या लाखनी गावात ५ जुन १९६२ मध्ये जन्मलेले नाना पाटोळे हे नागपूर विद्यापीठातून 1987 मध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधी झाले. वाणिज्य विषयात पदवी घेतल्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये रुजू झाले . या वेळी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचे मित्र होते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच नाना भंडारा जिल्हा परिषदेचे सदस्य झाले

नानांचे वडील फाल्गुनराव पाटोळे हे एक शेतकरी होते, परंतु गांधी आणि विनोबा भावे यांचा त्यांच्यावर खोल परिणाम होता. ते आपल्या मुलांच्या राजकारण आणि पोलिस विभागात प्रवेशाच्या विरोधात होते. एमएससी पूर्ण केल्यानंतर नानाचा मोठा भाऊ विनोद पोलिस विभागात जॉइन झाला. याचा वडिलांना खूप राग आला. नानाच्या राजकारणातील प्रवेशाचाही त्यांना खूप राग होता. तथापि, ते लोकसेवेला फार महत्त्व देत असत. मोठा भाऊ विनोद पोलिस अधिकाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी गेला असता वडिलांनी खर्चाचे पैसे दिले नाहीत.  तेव्हा आईने गुपचूप हातातील बांगडी विकून विनोदला पैसे दिले होते. नाना निवडणुकीत उभे असताना  देखील आईने पैसे दिले होते. वडील भाऊ विनोदने पोलिसांची नोकरी सुरू केली होती, परंतु बरीच वर्षे तो त्याच्या वडिलांसमोर जाण्याचे धाडस करू शकला नाही. नानाच्या कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा आहे.

 १९९९ ते २०१४ सलग तीन वेळा त्यांनी आमदारकी भूषविली. त्यानंतर २०१६ची लोकसभा निवडणूक लढवून ते भाजपाच्या तिकीटावर खासदारही झाले. मात्र ज्या कामांचा ध्यास घेऊन ते लोकसभेत गेले त्या कामांना मिळत असलेला छेद पाहून त्यांनी भाजपची खासदारकी सोडली. आणि पुन्हा आपल्या स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसने सप्टेंबर २०१८ मध्ये अखिल भारतीय किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तसेच नंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि वनविषयक स्थायी समितीचे सदस्यपदही दिले. त्यानंतर २०१९च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते साकोली मतदारसंघातून विजयी झाले. साकोली मतदारसंघातून भाजपच्या परिणय फुके यांच्याविरोधात झालेल्या या हायव्होल्टेज लढतीत ते विजयी होऊन विधानसभेवर निवडून आले.  आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. 

आज नानांची   शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारा आक्रमक नेता अशी ओळख निर्माण झाली आहे. कुणबी (ओबीसी) समाजातून आलेले,  भाजपमधून स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये परतल्यानंतर महाराष्ट्र भाजपलाही शेतकरी प्रश्नांवरून नांनांनी धारेवर धरलं.  नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला.  2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रा काढली, तेव्हा त्यांना उत्तर देण्यासाठी नाना पटोले यांनी 'महापर्दाफाश' अशी यात्रा काढली होती. तेव्हा नाना पटोले यांनी केलेली एक टीका खूपच चर्चेचा विषय ठरली होती. या यात्रेदरम्यान नाना पटोले म्हणाले होते, "भारतीय जनता पक्षानं वेगवेगळे प्रश्न उपस्थित करत केंद्रात आणि राज्यात सत्ता प्राप्त केली. सत्तेत आल्यानंतर ते प्रश्न बाजूला ठेवून इतर मुद्दे समोर आणले. भाजपकडून केवळ पोकळ आश्वासनं देण्यात येतात. त्याची पूर्तता होत नाही. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात एवढे खोटारडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पाहिले नाहीत. भाजप सोडताना त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आणि या टीकेचं केंद्र होतं शेतकऱ्यांचे प्रश्न.भाजप शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही, असं म्हणत त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. देशभरातून मोदी सरकारविरोधात स्पष्ट नाराजी व्यक्त करत राजीनामा देणारे ते पहिले भाजप खासदार ठरले.

आजच्या स्थितीला भाजप जेवढं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरेल, तितका ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. मग या ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो. नानांमधील आक्रमक चेहरा वेळोवेळी समोर आला आहे. याचाच फायदा घेत काँग्रेसने नानाभाऊंना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी विराजमान केले. याआधीचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणजे बाळासाहेब थोरात यांचं व्यक्तिमत्त्व हे फार मवाळ होतं, त्या तुलनेत तर नानांचं व्यक्तिमत्त्व अधिक आक्रमक असल्याचं काँग्रेसजनही मान्य करतात.  नाना पटोले हे शेतीप्रश्नी केवळ महाराष्ट्रातच परिचयाचे नाहीत, तर देशव्यापी संघटनेचा त्यांना अनुभव आहेत. काँग्रेसच्या कृषिविषयक संघटनेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाब-हरियाणापासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. 

जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावेळी नाना पटोले यांनी ओबीसी समाजात आपली प्रतिमा 'आपला नेता' म्हणून तयार केलीय. विधानसभा सभागृहात अजित पवार यांच्यासारख्यांना दाबून जातनिहाय जनगणना करावी, असा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यासाठी मंजूर करून घेतला. यावेळी त्यांना छगन भुजबळांनी साथ दिली खरी. पण नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरून ही कमाल करून दाखवली, अशी भावना ओबीसी समाजात पसरली आहे. आता जातनिहाय जनगणनेसाठी ज्यावेळी ओबीसी समाजाचे मेळावे होतात, तेव्हा नाना पटोले यांचे आवर्जून आभार मानले जातात. यावरूनच नानाचं व्यक्तीमत्व आणि समाजाप्रति असलेला आदर दिसून येतो.  इतकेच नव्हे तर महाराष्ट्राची येणारी निवडणूक ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर करण्यासाठीही नानांनी तयारी केली होती. विधानसभाध्यक्ष पदाच्या खूर्चीवरून त्यांनी याची बांधणी करण्यास सुरुवात केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शवली होती. मात्र त्याचवेळेस काँग्रेसने त्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने आता हा प्रश्न बासनात गुंडाळल्या गेला. 

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, "नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपानं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील." 

काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून विदर्भातील नेत्यांचीच नावं पुढे आली.  विदर्भातील नेत्यांची नावं पुढे येण्याला कारणं विधानसभा निवडणुकीच्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आहेत. विधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भात मिळालं. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड मानला जात असे. विदर्भात वर्षानुवर्षे काँग्रेसनं वर्चस्व राखलं होतं. मात्र, 2014 मध्ये ही पकड सैल झाली. 2019 मध्ये मात्र पुन्हा आशादायी चित्र निर्माण झालं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसनं विदर्भात महत्त्वाची मंत्रिपदंही दिली.  विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री, तर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं. विदर्भाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेसनं केलेला प्रयत्न म्हणूनही नाना पटोले यांच्याकडे पाहिलं जात आहे. विदर्भात ओबीसी मतांची टक्केवारीही परिणामकारक मानली जाते. अशावेळी नाना पटोले यांच्यासारखा विदर्भातील ओबीसी नेता असा दुहेरी फायदा असणारा प्रदेशाध्यक्ष  देऊन काँग्रेसनेही येणाऱ्या काळात आपली पक्कड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.  आणि नाना देखील या कसोटीला खरे उतरण्याचा प्रयत्न अगदी तन-मन-धनाने करीत आहेत. त्यांच्या या कार्याला येणाऱ्या काळात अधिक गती प्राप्त होवो याच त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा....
- सुबोध शाक्यरत्न

-



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com